अर्थ मंत्रालय
राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली आणि अटल पेन्शन योजनेची विक्रमी कामगिरी : 9 कोटींहून अधिक ग्राहक, मालमत्ता 16 लाख कोटींच्या पार
प्रविष्टि तिथि:
09 OCT 2025 9:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2025
राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) आणि अटल पेन्शन योजनेने (APY) आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला. या दोन्ही योजनांमधील एकत्रित व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्तेने (AUM) 16 लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. भारताच्या निवृत्तीवेतन क्षेत्रातला हा एक महत्त्वाचा टप्पा असून, या योजनांच्या ग्राहकसंख्येनेही 9 कोटींचा आकडा पार केला आहे.
निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीला अधिक मजबूत करण्यासाठी आणि निवृत्तीवेतनाचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. यामध्ये 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू झालेल्या 'मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क' (MSF) चा समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांना गुंतवणुकीचे अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यासोबतच, अस्थायी स्वरूपाचे काम करणाऱ्यांना योजनेत सामावून घेण्यासाठी ' राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली प्लॅटफॉर्म वर्कर्स मॉडेल' सुरू करण्यात आले आहे.
याशिवाय, निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने 'NPS सुधारणांवर सल्ला-मसलत प्रस्ताव' सादर केला आहे, त्यामध्ये निवृत्तीनंतरची आर्थिक सक्षमता वाढवण्यासाठी टप्प्याटप्प्याने परतावा आणि लवचिक वार्षिकी अशा पर्यायांचा समावेश आहे. तसेच, शेतकरी, सूक्ष्म-लघु-मध्यम क्षेत्रातले कामगार, बचत गटांचे सदस्य आणि इतर असंघटित क्षेत्रातल्या लोकांना योजनेत समाविष्ट करण्यासाठी एक लक्ष्यित मोहीम राबविण्यात येत आहे.
या विक्रमी कामगिरीसह, निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण सर्व भारतीयांसाठी वृद्धापकाळातल्या उत्पन्नाची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या आपल्या ध्येयाविषयी कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
गोपाळ चिपलकट्टी/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2177081)
आगंतुक पटल : 36