पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 कार्यक्रमाला संबोधित केले
भारताने लोकशाहीच्या भावनेला त्याच्या शासन प्रणालीचा मजबूत आधारस्तंभ बनवले आहे: पंतप्रधान
गेल्या दशकात भारताने तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण साध्य केले, आजच्या भारताने जगातील तंत्रज्ञानदृष्ट्या सर्वात समावेशक समाजांमध्ये स्थान मिळवले आहे: पंतप्रधान
आम्ही डिजिटल तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले आणि त्याला प्रत्येक नागरिकाला आणि देशातील प्रत्येक भागात उपलब्ध होईल असे रूप दिले: पंतप्रधान
तंत्रज्ञान हे केवळ सुविधेचे साधन नाही तर समानता सुनिश्चित करण्याचा तो एक मार्ग देखील आहे हे भारताने दाखवून दिले आहे: पंतप्रधान
इंडिया स्टॅक हा जगासाठी, विशेषतः जगाच्या दक्षिणेकडील देशांसाठी आशेचा किरण आहे : पंतप्रधान
आम्ही इतर देशांशी तंत्रज्ञान केवळ सामायिक करत नाही तर त्या देशांना ते विकसित करण्यासाठी मदत देखील करत आहोत, आणि ही डिजिटल मदत नव्हे तर हे डिजिटल सक्षमीकरण आहे: पंतप्रधान
भारताच्या अर्थतंत्रज्ञान समुदायाच्या प्रयत्नांमुळेच आपली स्वदेशी साधने जागतिक प्रासंगिकता प्राप्त करत आहेत: पंतप्रधान
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात, भारताचा दृष्टीकोन तीन तत्वांवर आधारित आहे- न्याय्य उपलब्धता, लोकसंख्या-प्रमाणात कौशल्य प्राप्ती आणि जबाबदार नेमणुका: पंतप्रधान
भारताने नेहमीच नैतिक कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीच्या जागतिक चौकटीला पाठींबा दिला आहे: पंतप्रधान
आपल्यासाठी एआय म्हणजे सर्वाचा समावेश: पंतप्रधान
जेथे तंत्रज्ञान लोकांना आणि या पृथ्वीला समृद्ध करेल अशा अर्थतंत्रज्ञानयुक्त जगाची निर्मिती करणे हे आमचे उद्दिष्ट आहे: पंतप्रधान
Posted On:
09 OCT 2025 7:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात मुंबई येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत पंतप्रधान मोदी यांनी उर्जावान शहर, उद्योगांचे शहर आणि अमर्याद शक्यतांचे शहर अशा शब्दांत मुंबईचे वर्णन केले. त्यांनी त्यांचे मित्र पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे खास स्वागत केले आणि ग्लोबल फिनटेक महोत्सवाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी वेळ काढल्याबद्दल विशेष उल्लेख केला.
पाच वर्षांपूर्वी जेव्हा ग्लोबल फिनटेक महोत्सव सुरु करण्यात आला होता, त्यावेळी संपूर्ण जग जागतिक महामारीशी झुंजत होते, तेव्हाच्या परिस्थितीचे स्मरण करत पंतप्रधान म्हणाले की आज हा महोत्सव वित्तीय नवोन्मेष आणि सहकार्यासाठीच्या जागतिक व्यासपीठात परिवर्तीत झाला आहे. यावर्षी, युनायटेड किंगडम हा देश सदर महोत्सवात भागीदार देशाच्या रुपात सहभागी झाला आहे याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी दोन प्रमुख लोकशाही देशांच्या दरम्यानची ही भागीदारी जागतिक वित्तीय परिदृष्याला आणखी बळकट करेल हे सांगण्यावर भर दिला. कार्यक्रम स्थळी असलेले उत्साही वातावरण, उर्जा आणि गतिशीलता यावर टिप्पणी करत पंतप्रधान मोदी यांनी त्याला उल्लेखनीय असे संबोधले. ते म्हणाले की यातून भारताची अर्थव्यवस्था आणि विकास यांवर असलेला जगाचा विश्वास दिसून येतो. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी क्रिस गोपालकृष्णन, सर्व आयोजक तसेच सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले.
"भारत लोकशाहीची जननी आहे आणि भारतातील लोकशाही केवळ निवडणुका किंवा धोरण निर्मितीपुरती मर्यादित नसून, ती समाज जीवनाचा एक मजबूत स्तंभ म्हणून स्थापित झाली आहे," असे मोदी यांनी तंत्रज्ञानाला या लोकशाही भावनेचे प्रमुख उदाहरण म्हणून अधोरेखित करताना सांगितले. जगात बऱ्याच काळापासून तंत्रज्ञानातील दरीवर चर्चा होत आहे आणि एकेकाळी भारतालाही याचा फटका बसला होता. मात्र, गेल्या दशकात भारताने यशस्वीरित्या तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले आहे, असे त्यांनी नमूद केले. आजचा भारत हा जगातील तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सर्वात सर्वसमावेशक समाजांपैकी एक आहे, असे मोदी म्हणाले.
भारताने डिजिटल तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करून ते देशातील प्रत्येक नागरिकासाठी आणि प्रत्येक प्रदेशासाठी सुलभ केले आहे, हे अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की, हे आता भारताच्या सुशासनाचे प्रारुप बनले आहे. या मॉडेलमध्ये सरकार सार्वजनिक हितासाठी डिजिटल पायाभूत सुविधा विकसित करते आणि खाजगी क्षेत्र त्या प्लॅटफॉर्मवर नाविन्यपूर्ण उत्पादने तयार करते असे त्यांनी सांगितले. भारताने हे दाखवून दिले आहे की तंत्रज्ञान केवळ सोयीचे साधन म्हणून नव्हे, तर समानतेचे माध्यम म्हणूनही काम करू शकते, असे मोदी म्हणाले.
"भारताच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाने बँकिंग परिसंस्थेत परिवर्तन घडवले आहे," असे पंतप्रधानांनी देऊन सांगितले. एकेकाळी बँकिंग हा एक विशेषाधिकार होता, मात्र डिजिटल तंत्रज्ञानाने त्याला सक्षमीकरणाचे माध्यम बनवले आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी अधोरेखित केले की, भारतात डिजिटल व्यवहार आता नित्याचा झाला आहे, याचे श्रेय त्यांनी जॅम ट्रिनिटी—जन धन, आधार आणि मोबाईल यांना दिले. केवळ यूपीआय द्वारे दरमहा 20 अब्ज व्यवहार होतात, त्यांचे मूल्य 25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जागतिक स्तरावर होणाऱ्या दर 100 प्रत्यक्ष काळातल्या डिजिटल व्यवहारांपैकी 50 व्यवहार एकट्या भारतात होतात, असे मोदी यांनी सांगितले.
या वर्षीच्या ग्लोबल फिनटेक महोत्सवाची संकल्पना भारताच्या लोकशाही भावनेला बळकट करुन पुढे नेते, असे नमूद करून मोदी यांनी सांगितले की, भारताच्या डिजिटल स्टॅकविषयी जागतिक स्तरावर चर्चा होत आहे. त्यांनी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस, आधार सक्षम मोबदला व्यवस्था, भारत बिल पेमेंट व्यवस्था, भारत-क्यूआर, डिजिलॉकर, डिजियात्रा, आणि गव्हर्नमेंट ई-बाजारपेठ या प्रमुख घटकांना भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून उद्धृत केले. 'इंडिया स्टॅक'मुळे आता नवीन खुल्या परिसंस्था (open ecosystems) उदयाला येत आहेत याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी नमूद केले की, ओएनडीसी—ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स—हे लहान दुकानदार आणि सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योगांसाठी एक वरदान ठरत आहे, ज्यामुळे त्यांना देशभरातील बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळत आहे. ओसीईएन—ओपन क्रेडिट एनेबलमेंट नेटवर्क—मुळे लहान उद्योजकांसाठी कर्ज मिळवणे सोपे होत आहे आणि सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योगांसाठी कर्जाच्या कमतरतेची समस्या दूर करत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. आरबीआयद्वारे सुरू असलेल्या डिजिटल चलन उपक्रमामुळे परिणाम आणखी वाढतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, हे सर्व प्रयत्न भारताच्या अप्रयुक्त क्षमतेचे देशाच्या विकासाच्या गाथेसाठी एका प्रेरक शक्तीत रूपांतरित करतील.
"इंडिया स्टॅक ही केवळ भारताच्या यशाची गाथा नाही, तर जगासाठी, विशेषतः ग्लोबल साऊथमधील देशांसाठी आशेचा किरण आहे," असे पंतप्रधानांनी सांगितले. आपल्या डिजिटल नवकल्पनांद्वारे भारत जागतिक स्तरावर डिजिटल सहकार्य आणि डिजिटल भागीदारी वाढवू इच्छितो असे ते म्हणाले. भारत आपले अनुभव आणि मुक्त स्रोत प्लॅटफॉर्म दोन्ही जागतिक सार्वजनिक वस्तू म्हणून सामायिक करत आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. मोदी यांनी भारतात विकसित झालेल्या मॉड्युलर ओपन-सोर्स आयडेंटिटी प्लॅटफॉर्म (MOSIP) चे प्रमुख उदाहरण दिले आणि 25 हून अधिक देश त्यांच्या सार्वभौम डिजिटल ओळख प्रणाली तयार करण्यासाठी ते स्वीकारत आहेत असे नमूद केले. भारत तंत्रज्ञान केवळ सामायिक करत नाही, तर इतर राष्ट्रांना ते विकसित करण्यासाठी मदतही करत आहे, असेही त्यांनी सांगितले. ही डिजिटल मदत नव्हे, तर डिजिटल सक्षमीकरण आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
भारताच्या फिनटेक समुदायाच्या प्रयत्नांमुळेच स्वदेशी उपाययोजनांना जागतिक प्रासंगिकता प्राप्त झाल्याची बाब पंतप्रधानांनी नमूद केली. परस्पर कार्यान्वयीत क्यूआर नेटवर्क्स, मुक्त व्यापार आणि मुक्त वित्तीय आराखडे अशा प्रमुख क्षेत्रांमधील भारतीय स्टार्टअप्सच्या प्रगतीची आज जगभर दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत, भारताने जागतिक स्तरावर सर्वाधिक निधी प्राप्त करणाऱ्या पहिल्या तीन फिनटेक परिसंस्थांमध्ये स्थान मिळवले असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.
केवळ व्याप्ती हीच भारताची ताकद नाही, तर त्या ही पलिकडे जात समावेशकता, लवचिकता आणि शाश्वतता या सर्व पैलुंचे एकात्मिकीकरण ही भारताची ताकद असल्याचे ते म्हणाले. अंदाजित जोखीमांची तीव्रता कमी करण्यात, तसेच वास्तविक वेळेत फसवणूक ओळखण्यात आणि विविध सेवांमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या प्रक्रियेतील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. या क्षमतेचा पूरेपूर उपयोग करून घेता यावा यासाठी माहितीसाठा, कौशल्ये आणि शासन प्रक्रिया या क्षेत्रात संयुक्त गुंतवणुकीचे आवाहनही त्यांनी केले.
समन्यायी उपबद्धता, व्यापक लोकसंख्येचा कौशल्य विकास आणि जबाबदारपूर्ण अवलंब, या तीन प्रमुख तत्त्वांवरच भारताचा कृत्रिम बुद्धिमत्तेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आधारलेला असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. भारत-एआय मिशन अंतर्गत, प्रत्येक नवोन्मेषक आणि स्टार्टअपसाठी परवडणारी आणि सुलभ संसाधने उपलब्ध असतील याची सुनिश्चिती करण्यासाठी सरकार उच्च-कार्यक्षमतेची संगणकीय क्षमता विकसित करत आहे असे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेचे लाभ प्रत्येक जिल्ह्यापर्यंत आणि प्रत्येक भाषेतून पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. हे लाभ सर्वदूर पोहोचतील याची सुनिश्चिती भारताची उत्कृष्टता केंद्रे, कौशल्य केंद्रे आणि स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्स सक्रियपणे करत आहेत, ही बाबही त्यांनी नमूद केली.
नितीमत्ताधारीत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक आराखडा तयार करण्याचे भारताने कायमच समर्थन केले असल्याचेही त्यांनी पुन्हा एकदा नमूद केले. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमधील भारताचा अनुभव आणि त्यासंबंधीचे भारताचे ज्ञान भांडार जगासाठी मौल्यवान ठरू शकते असे ते म्हणाले. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये भारताने जो मार्ग अवलंबला आहे, त्याच दृष्टिकोनातून भारताला कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातही प्रगती साधायची आहे, असे ते म्हणाले. भारतासाठी, AI चा अर्थ All Inclusive म्हणजेच सर्वसमावेशक असा असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
आज जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत विश्वासार्हता आणि सुरक्षिततेच्या नियमांविषयी चर्चा सुरू आहे, अशावेळी भारताने मात्र याआधीच विश्वासार्हतेचा स्तर तयार केला असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारताचे एआय मिशन माहितीसाठा आणि गोपनीयता अशा दोन्हींशी संबंधित समस्यांची हाताळणी करण्याच्या दृष्टीने सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. नवोन्मेषकांना समावेशक ॲप्लिकेशन्स तयार करण्याच्या दृष्टीने सक्षम करू शकतील अशी व्यासपीठे विकसित करणे हाच भारताचा उद्देश असल्याची बाबही त्यांनी स्पष्ट केली.देयकांच्या बाबतीत भारताने गती आणि आश्वासकतेला प्राधान्य दिले आहे, वित्त पुरवठ्याच्या बाबतीत भारताचा भर मंजुरी आणि किफायतशीरपणा यावर आहे, विम्यामध्ये प्रभावी योजना आणि दावे वेळेत निकाली निघणे हेच लक्ष्य भारताने समोर ठेवले आहे, आणि गुंतवणुकीच्या संदर्भात उपलब्धता आणि पारदर्शकता हीच भारताची उद्दिष्टे असल्याचे त्यांनी सांगितले. या परिवर्तनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रेरक शक्ती ठरू शकते, आणि त्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्ताधारीत ॲप्लिकेशन्सची रचना ही लोकांना केंद्रस्थानी ठेवून केली पाहिजे ही गरजही त्यांनी व्यक्त केली. पहिल्यांदाच डिजिटल वित्तीय सेवा वापरणाऱ्यांना चुका त्वरित सुधारल्या जातील, याबद्दलचा आत्मविश्वास मिळायला हवा, हाच आत्मविश्वास डिजिटल समावेशकता आणि आर्थिक सेवांवरील विश्वास अधिक दृढ करेल, असे ते म्हणाले.
काही वर्षांपूर्वीच ब्रिटनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षितता शिखर परिषदेला सुरूवात झाल्याचा संदर्भ त्यांनी दिला. आता पुढच्या वर्षी भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता परिणामकारकता शिखर परिषद आयोजित केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सुरक्षिततेवरील संवाद ब्रिटनमध्ये सुरू झाला, परंतु आता परिणामाकारतेवरील चर्चा भारतात होईल असे ते म्हणाले. जागतिक व्यापारात भारत आणि ब्रिटनने जगाला परस्पर लाभाच्या भागीदारीचे प्रात्यक्षिकच दाखवले आहे, आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच फिनटेक या क्षेत्रांतील या दोन्ही देशांचे परस्पर सहकार्य या भावनेला आणखी दृढ करणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ब्रिटनचे संशोधन आणि जागतिक वित्त कौशल्य तसेच भारताची व्याप्ती आणि प्रतिभा यांच्या एकत्रित येण्यामुळे जगासाठी संधींचे नवे दरवाजे उघडू शकतात, यावर पंतप्रधानांनी भर दिला. स्टार्ट-अप्स, संस्था आणि नवोन्मेष केंद्र यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याच्या नव्याने बांधिलकीची पंतप्रधानांनी घोषणा केली. ब्रिटन-भारत फिनटेक कॉरिडॉर नवीन स्टार्ट-अप्सच्या प्रायोगिक प्रकल्पांना आणि त्यांच्या विस्ताराला चालना देईल तसेच लंडन स्टॉक एक्सचेंज आणि गिफ्ट सिटी यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत करण्याचा मार्ग मोकळा करेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. दोन्ही देशांमधील आर्थिक एकत्रीकरणामुळे कंपन्यांना मुक्त व्यापार कराराचे फायदे जास्तीत जास्त प्रमाणात घेता येतील, असेही ते म्हणाले.
सर्व भागधारकांवर असणाऱ्या मोठ्या जबाबदारीचा उल्लेख करताना मोदी यांनी व्यासपीठावरून ब्रिटनसह सर्व जागतिक भागीदारांना भारताशी सहयोग करण्यासाठी आमंत्रित केले. भारताच्या विकासासोबत स्वत:ची प्रगती साधण्यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराचे स्वागत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाच्या समारोपात, अशा फिनटेक जगाच्या निर्मितीचे आवाहन केले जिथे तंत्रज्ञान, मानव आणि वसुंधरा या तिन्हींच्या समृद्धीसाठी कार्य केले जाईल, जिथे नवनवेष केवळ वाढीसाठी नाही तर सद्भावनेसाठी ही असेल, जिथे वित्त केवळ आकड्यांचे नव्हे तर मानव प्रगतीचे प्रतिक असेल. या प्रेरणादायी आवाहनासह त्यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
ग्लोबल फिनटेक महोत्सव 2025, हे जगभरातील नवोन्मेषक, धोरणकर्ते, केंद्रीय बँकर्स, नियामक संस्था, गुंतवणूकदार, शिक्षणतज्ञ आणि उद्योग नेते यांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. या परिषदेचा मुख्य विषय - ' एका चांगल्या जगासाठी सक्षम वित्त - ज्या मागे कृत्रिम बुद्धिमत्ता, वर्धित बुद्धिमत्ता, नवोन्मेष आणि समावेशकता हे प्रेरक घटक आहेत. हा विषय तंत्रज्ञान आणि मानवी अंतर्दृष्टी यांचा संगम घडवून नैतिक आणि शाश्वत आर्थिक भविष्य घडवण्यावर भर देतो.
या वर्षीच्या आवृत्तीत 75 हून अधिक देशांमधून 1,00,000 हून अधिक सहभागी येण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वात मोठ्या फिनटेक परिषदांपैकी एक ठरणार आहे. या कार्यक्रमात सुमारे 7,500 कंपन्या, 800 वक्ते, 400 प्रदर्शक तसेच भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अधिकारक्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 70 नियामक संस्था सहभागी होतील.
सहभागी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सिंगापूरची मोनेटरी अथॉरिटी, जर्मनीची डॉयशे बुंडेसबँक, बँक डी फ्रान्स आणि स्विस फायनान्शियल मार्केट सुपरवायझरी अथॉरिटी (FINMA) सारख्या प्रसिद्ध नियामकांचा समावेश आहे. त्यांच्या सहभागामुळे वित्तीय धोरण संवाद आणि सहकार्यासाठी जागतिक व्यासपीठ म्हणून ग्लोबल फिनटेक फेस्टचे वाढते स्थान अधोरेखित होते.
निलीमा चितळे/गोपाळ चिपलकट्टी/संजना चिटणीस/निखिलेश चित्रे/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर
(Release ID: 2177022)
Visitor Counter : 38
Read this release in:
Odia
,
Punjabi
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada