संरक्षण मंत्रालय
93 व्या भारतीय हवाई दल दिनाच्या सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
08 OCT 2025 8:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2025
भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) 93 व्या वर्धापन दिनाच्या, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी सर्व हवाई दलाचे कर्मचारी, निवृत्त सैनिक, नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. हवाई शक्ती रणनीतीला कसा आकार देऊ शकते हे वारंवार दाखवल्याबद्दल त्यांनी भारतीय हवाई दलाचे कौतुक केले, विशेषतः ऑपरेशन सिंदूर दरम्यान, जिथे शत्रूच्या प्रदेशात दूरवर अचूकतेने मारा करण्याची आपली क्षमता पुन्हा सिद्ध केली.
शत्रूची विमाने, हवाई शस्त्रे आणि ड्रोनचा प्रभावीपणे मारा करण्यासाठी आणि नजर ठेवण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या सेन्सर्स आणि रडारच्या जटील नेटवर्कचे सीडीएस यांनी कौतुक केले. भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण युनिट्सद्वारे समर्थित आयएएफचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (एसएएम) आणि काउंटर-अनमँड एरियल सिस्टम्स (सियुएएस) युनिट्स एकात्मिक हवाई कमांड आणि नियंत्रण प्रणाली (आयसीसीएस) अंतर्गत अखंडपणे काम करत असल्याचे सांगत, ऑपरेशन सिंदूर दरम्यान याचे उत्कृष्ट परिणाम अनुभवास आल्याचे त्यांनी नमूद केले.
युद्धाच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकताना जनरल अनिल चौहान म्हणाले की, "युद्धाचे स्वरूप गहन होत आहे, भविष्यातील संघर्ष तंत्रज्ञानावर आधारित, जलद आणि विविध क्षेत्रांमध्ये संघर्षांचे असतील अशी अपेक्षा आहे. या परिस्थितीत, आधुनिक युद्धात हवाई शक्ती हा प्रमुख घटक असेल." युद्ध आणि मानवतावादी मोहिमांमध्ये राष्ट्रासाठी धैर्य, निपुणता आणि सेवेच्या विशिष्ट वारशाबद्दल सीडीएस यांनी आयएएफची वाखाणणी केली.
सीडीएसनी मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) मोहिमांमध्ये विश्वासार्ह प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून आयएएफच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरही भर दिला. "संघर्षग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना वाचवून आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये महत्त्वाची मदत पोहोचवून आयएएफने सातत्याने आपली पोहोच आणि प्रतिसाद दर्शविला आहे," असे त्यांनी निदर्शनास आणले. दशकांपासून, आयएएफ शौर्याचे प्रतीक म्हणून उभे ठाकत देशाच्या आसमंताचे रक्षण करत आहे आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये नागरिकांच्या मदतीला येत आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
निलीमा चितळे/वासंती जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2176514)
अभ्यागत कक्ष : 29