रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेल्वे आपत्ती प्रतिसाद मजबूत करण्यासाठी रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि भारतीय रेल्वे आपत्ती व्यवस्थापन संस्था (आयआरआयडीएम) यांच्यात सामंजस्य करार


अतिमहत्त्वपूर्ण अवधीत जीव वाचवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करून या भागीदारीद्वारे एकत्रित मदतीसाठीच्या आराखड्याची स्थापना

Posted On: 06 OCT 2025 10:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 ऑक्‍टोबर 2025

 

रेल्वे आपत्ती प्रतिसाद मजबूत करण्यासाठी रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि भारतीय रेल्वे आपत्ती व्यवस्थापन संस्था (आयआरआयडीएम) यांच्यात आज नवी दिल्ली येथे रेल भवनात त्रिपक्षीय सामंजस्य करार  करण्यात आला. अतिमहत्त्वपूर्ण अवधीत जीव वाचवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करून ही भागीदारी रेल्वे अपघाताच्या परिदृश्याला अनुसरून एकत्रित मदत कार्य आणि क्षमता निर्मितीसाठी सुस्पष्ट संस्थात्मक आराखडा स्थापित करते. आरपीएफच्या प्रशिक्षण विभागाचे महानिरीक्षक बी.व्ही.राव; एनडीआरएफचे महानिरीक्षक नरेंद्र सिंह बुंदेला आणि आयआरआयडीएमचे संचालक श्रीनिवास यांनी संबंधित यंत्रणांतर्फे सदर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. रेल्वे मंडळातील ट्रॅक्शन आणि रोलिंग स्टॉक विभागाचे सदस्य (एमटीआरएस) आर.राजगोपाल; मनुष्यबळ विभागाच्या महासंचालक अरुणा नायर; एनडीआरएफचे महासंचालक पीयूष आनंद; आरपीएफच्या महासंचालक सोनाली मिश्रा यांच्यासह  एनडीआरएफ तसेच आरपीएफचे अनेक ज्येष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

रेल्वे संरक्षण दलाच्या महासंचालक सोनाली मिश्रा म्हणाल्या की सर्व संबंधित भागधारकांमध्ये परिणामकारक सहयोग तसेच समन्वय असला पाहिजे आणि या संदर्भात प्रमाणित कार्यपद्धती निश्चित केली गेली पाहिजे.

याप्रसंगी बोलताना, मानव-निर्मित संकटांसह वादळे, अतिवृष्टी आणि उष्णतेच्या लाटांसारख्या नैसर्गिक आपत्तींवर देखील लक्ष केंद्रित करायला हवे असे मत रेल्वे मंडळाचे (ट्रॅक्शन आणि रोलिंग स्टॉक) सदस्य आर.राजगोपाल यांनी त्यांच्या भाषणात मांडले.जगजीवन राम आरपीएफ अकादमी (जेआरआरपीएफए) तसेच अतिमहत्त्वपूर्ण अवधीवर (गोल्डन अवर) अधिक लक्ष केंद्रित करून बचाव तसेच मदत कार्याशी संबंधित क्षमता निर्मितीसाठी आयआरआयडीएमने हाती घेतलेल्या उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली.

आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी काम करणाऱ्या सर्व संस्थांनी एक संघ म्हणून काम केले पाहिजे, ही बाब राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक पीयूष आनंद यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केली. रेल्वेच्या इतर संस्थांनीही क्षमता निर्माणाशी संबंधित प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

या सहकार्यपूर्ण भागिदारी च्या माध्यमातून एक विस्तारण्यायोग्य आणि पुन्हा पुन्हा अमलात आणता येण्याजोगी परिसंस्था चालवली जाणार असल्याचे ते म्हणाले. यामुळे भारतीय रेल्वेची आपत्तींविरोधातील सज्जता वाढेल असे त्यांनी सांगितले. या परिसंस्थेअंतर्गत प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असलेल्या संकटाच्या काळात, प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना जलद, सुरक्षित आणि अधिक समन्वयित मदत पोहोचवता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ठळक वैशिष्ट्ये:

  • गोल्डन-अवर अर्थात तातडीने प्रतिसाद देण्याच्या काळातील बचाव कार्याच्या परिणामकारतेवर भर: डब्यामध्ये जलद गतीने प्रवेश, उपचारा़ना प्राधान्य, आणि सुटका यासाठी महत्त्वाचा प्रत्येक क्षण वाचवण्यावर भर देणे हे याअंतर्गतच्या प्रत्येक मॉक ड्रिल आणि मानक प्रक्रियेचे उद्दिष्ट आहे.
  • रेल्वेद्वारा विशिष्ट प्रथम प्रतिसाद: घटनास्थळी होणारी पहिली कृती योग्य असावी या उद्देशाने रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने रेल्वेचे डबे आणि मार्गिकांवर आधारित आणि विशेषतः अत्यंत छोट्या जागेतील बचाव कार्यासाठी अधिक परिणामकारक क्षमता निर्मितीचे काम केले जाईल.
  • पिडीतांची डब्यातून सुटका करण्यासाठीची प्रमाणित, सामायिक मानक कार्यपद्धती: भारतीय रेल्वे आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या वतीने प्रवेशाचा क्रम, थांबण्याची वेळ, कापण्याची नियोजन, रुग्णांना सुरक्षित हलवण्याचे नियोजन आणि हस्तांतरण या बाबतीतील सुसंगतता मानक कार्यपद्धती तयार करेल.
  • परस्पर समन्वयीत कार्यान्वयनाला अनुसरून असलेली संरचना: रेडिओ वापराविषयक सामान्य शिष्टाचार, सामायिक कार्यसूची आणि परस्पसमन्वयीत मॉक ड्रिलच्या माध्यमातून बचाव आणि मदत कार्यादरम्यान संस्था एकच संघ असल्याप्रमाणे काम करतील याची सुनिश्चिती केली जाईल.
  • प्रगतीशील क्रमावर आधारीत त्रिस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी: कनिष्ठ रेल्वे पोलिस बल अकादमीत मूलभूत प्रशिक्षण (Module A), नामनिर्देशित राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल बटालियन इथे क्षेत्रीय संवेदनशीलता प्रशिक्षण (Module B), आणि भारतीय रेल्वे आपत्ती व्यवस्थापन संस्थेत संयुक्त प्रगत, अनुकरण करता येण्यायोग्य प्रशिक्षण (Module C), अशा स्वरुपातील प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून मूल्यमापन करता येण्यायोग्य आणि पुन्हा पुन्हा अमलात आणता योग्य क्षमता निर्माण केली जाणार.

कनिष्ठ रेल्वे पोलिस बल अकादमी हे समन्वय केंद्र म्हणून काम करेल, तर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल बटालियन स्तरावरील संवेदनशीलतेशी संबंधित प्रशिक्षणाचे आयोजन करेल तसेच भारतीय रेल्वे आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या संयुक्त अभ्यासक्रमात सहभागी होईल ही बाब या सामंजस्य कराराअंतर्गत स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. याचबरोबरीने भारतीय रेल्वे आपत्ती व्यवस्थापन संस्था ही प्रगत, विविध परिस्थितीत कामी येऊ शकतील अशा स्वरुपाचे अभ्यासक्रम तयार करण्याची, ते अद्ययावत करण्याची आणि त्याचे दस्तऐवजीकरण करण्याची जबाबदारी सांभाळेल असेही यात नमूद केले आहे. या आराखड्याचा रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये विस्तार करता येणार असून, येत्या काही वर्षांमध्ये त्याचे पुनरावलोकन करण्याच्या आणि त्यात सातत्यपूर्ण सुधारणा करता येण्याच्या दृष्टीनेच त्याची आखणी केली गेली आहे.

 

* * *

शैलेश पाटील/संजना चिटणीस/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2175611) Visitor Counter : 10