सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या कोपरगाव इथे देशातल्या पहिल्या सहकारी मल्टी-फीड कंम्प्रेस बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन


भारताच्या सहकारी साखर कारखान्यांच्या इतिहासात प्रथमच कंम्प्रेस बायोगॅस प्रकल्प आणि पोटॅश ग्रॅन्युल उत्पादन युनिटचा प्रारंभ महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात होत आहे

भारतातला पहिला सहकारी कंम्प्रेस बायोगॅस प्रकल्प दररोज 12 टन सीबीजी आणि गुळापासून 75 टन पोटॅश तयार करेल, त्यामुळे या उत्पादनांची परदेशातून होणारी आयात कमी होईल

सहकारी साखर कारखान्यांची सुरवात महाराष्ट्रात झाली आणि साखर कारखान्यांसाठी 100 टक्के चक्रीय अर्थव्यवस्थेची अंमलबजावणी करण्याचा उपक्रम इथूनच सुरू होत आहे

महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना चक्रीय अर्थव्यवस्थेचे आदर्श उदाहरण आहे

मोदी सरकार येत्या काळात नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सहाय्याने 15 निवडक साखर कारखान्यांना कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्प आणि पोटॅश ग्रॅन्युल उत्पादन युनिट्स स्थापन करण्यासाठी पूर्ण सहयोग देईल

पंतप्रधान मोदींनी अनेक कृषी वस्तूंवरचा वस्तू आणि सेवा कर 5 टक्क्यां पर्यंत कमी केला आहे, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल

Posted On: 05 OCT 2025 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 ऑक्‍टोबर 2025

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथे देशातल्या पहिल्या सहकारी मल्टी-फीड कॉम्प्रेस बायोगॅस (CBG) प्रकल्पाचे उद्घाटन केले. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

CR3_6518 copy.jpg

भारताच्या सहकारी साखर कारखान्यांच्या  इतिहासात कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्प आणि पोटॅश ग्रॅन्युल उत्पादन युनिटची सुरवात प्रथमच  महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात होत आहे असे कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले. एका नवीन उपक्रमांतर्गत, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील   सरकार आगामी काळात नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मदतीने 15 निवडक साखर कारखान्यांना हे दोन्ही प्रकल्प उभारण्यासाठी पूर्ण सहयोग  देईल. हा नवीन उपक्रम देशातल्या साखर कारखान्यांसाठी आगामी काळात एक नवीन मार्ग खुला करेल, असे त्यांनी नमूद केले.

मोदी सरकार देशातल्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित आहे असे शाह यांनी सांगितले. ते म्हणाले की, 1 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डाळी मध्ये आत्मनिर्भरतेसाठी मिशन’ सुरू केले, त्या अंतर्गत येत्या सहा वर्षांमध्ये या  क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी 11,340 कोटी रुपये वापरले जातील. तूर, उडीद आणि मसूर डाळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी जर नाफेड  आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोंदणी केली, तर भारत सरकार त्यांचे संपूर्ण डाळ पीक हमीभावावर विकत घेईल. याचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही होईल, असे शाह यांनी यावेळी सांगितले.

CR3_6020.JPG

अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षांत, ज्वारीचा हमीभाव अडीच पटीने, बाजरीचा अडीच पटीने, तुरीचा 100 टक्के, मुगाचा 100 टक्के, सोयाबीनचा दुप्पट आणि कापसाचा हमीभाव  दुप्पट झाला आहे, असे ते म्हणाले.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितले की, अलीकडील जीएसटी सुधारणांअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या वापरातील अनेक वस्तूंवरील जीएसटी 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे सुटे भाग, कापणी यंत्र, मळणी यंत्र, पाणी फवारणी यंत्र, ठिबक सिंचन यंत्रणा तसेच कुक्कुटपालन व मधमाशी पालनासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीचा समावेश आहे. याशिवाय सेंद्रिय कीटकनाशके आणि नैसर्गिक मेन्थॉलवरील जीएसटी देखील 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या निर्णयाचा लाभ लाखो शेतकऱ्यांना होणार आहे.

अमित शाह पुढे म्हणाले की, आज देशातील पहिल्या सहकारी कॉम्प्रेस बायोगॅस (सीबीजी) प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या प्रकल्पात सुमारे 55 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पातून दररोज 12 टन सीबीजी आणि गूळ/मळीपासून 75 टन पोटॅश तयार होईल. ते म्हणाले की, हे दोन्ही पदार्थ सध्या भारत परदेशातून आयात करतो आणि या नव्या उपक्रमामुळे ही आयात थांबविणे  शक्य होऊन  आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलता येईल.

CR5_3032.JPG

केंद्रीय सहकार मंत्री शाह यांनी सांगितले की, महर्षी शंकरराव कोल्हे  सहकारी साखर कारखाना हा चक्रीय अर्थव्यवस्थेचे आदर्श उदाहरण बनला आहे. त्यांनी इथेनॉल प्रकल्पांना बहुआयामी बनविण्याची गरज असल्याचे सांगितले. शाह यांनी नमूद केले की सहकारी साखर कारखान्यांची सुरवात  महाराष्ट्रातूनच झाली आणि साखर कारखान्यांसाठी 100 टक्के चक्रीय  अर्थव्यवस्था राबविण्याचा उपक्रमही याच राज्यातून सुरू होत आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाला या प्रयत्नात सहयोग करण्याचे आवाहन केले आणि केंद्र सरकारही आवश्यक ती मदत देईल अशी हमी दिली. त्यांनी सांगितले की महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उदाहरण महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांसाठी आदर्श ठरावे, जेणेकरून त्याचाच कित्ता इतर कारखान्यांतही गिरवीता  येईल आणि भविष्यात साखर उद्योग अधिक लाभदायक बनेल. शाह यांनी पुढे सांगितले की, देशातील पहिला ऊसाधारित इथेनॉल प्रकल्प याच ठिकाणी स्थापन झाला होता. त्यांनी असेही म्हटले की, नफ्यात असलेल्या प्रत्येक साखर कारखान्याने फळप्रक्रिया उद्योग सुरू करावा, कारण त्यामुळे फळउत्पादनाला चालना मिळेल आणि साखर कारखान्यांच्या नफ्यातही वाढ होईल.

अमित शाह म्हणाले की, संजीवनी समूहाने हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविले असून त्यांनी महिला स्व-सहायता गटांच्या सबलीकरणासाठीही कार्य केले आहे.

शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन करून देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ दिले आहे. आज सहकार क्षेत्र देशाचा एक मजबूत स्तंभ म्हणून उभे राहत आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

CR5_2981.JPG

शाह यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. शाह यांनी नमूद केले की, पंतप्रधानांनी देशाची अर्थव्यवस्था जगातील 11व्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आणली  आहे आणि आपण आता जगातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर आहोत. परंतु जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी ‘स्वदेशी’चा स्वीकार करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यांनी सांगितले की, देशातील प्रत्येक नागरिकाने स्वदेशी उत्पादनांचा अवलंब करणे गरजेचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक व्यक्तीने आपल्या आईच्या नावाने एक झाड आणि भूमातेच्या नावाने एक झाड लावण्याची शपथ घ्यावी असे आवाहन केले आहे, असे त्यांनी यावेळी नमुद केले.  या उपक्रमामुळे भविष्यातील हवामानबदल आणि जागतिक तापमानवाढ या आव्हानांचा सामना करण्यास मोठी मदत मिळेल, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.

 

* * *

निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/नितिन गायकवाड/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2175160) Visitor Counter : 7
Read this release in: English , Urdu , Hindi , Gujarati