वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल 6-7 ऑक्टोबर 2025 दरम्यान कतार दौऱ्यावर; दोहा इथे कतार-भारत संयुक्त आयोग बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवणार
Posted On:
05 OCT 2025 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल 6-7 ऑक्टोबर दरम्यान व्यापार आणि वाणिज्यविषयक कतार-भारत संयुक्त आयोगाच्या बैठकीसाठी कतारमधल्या दोहा इथे भेट देणार आहेत. या बैठकीचे सह-अध्यक्षस्थान कतारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री, शेख फैसल बिन थानी बिन फैसल अल थानी भूषवणार आहेत.
हा दौरा कतारशी असलेल्या भारताच्या व्यापार आणि गुंतवणूक संबंधांना किती महत्त्व आहे, हे अधोरेखित करत आहे. गल्फ कोऑपरेशन कौन्सिल मधला कतार हा भारतासाठी एक महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे, त्याच्याशी 2024-25 मध्ये द्विपक्षीय व्यापार अंदाजित 14 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक आहे.
गोयल यांच्या पहिल्याच कतार दौऱ्यात त्यांच्यासोबत विविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी होणार आहेत. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय व्यापाराच्या कामगिरीचा आढावा, सध्याचे व्यापार अडथळे आणि बिगर –शुल्क समस्यांवर विचार करणे, तसेच व्यापार आणि गुंतवणुकीचा प्रवाह वाढवण्याच्या मार्गांवर व्यापक चर्चा अपेक्षित आहे.
या चर्चेत प्रस्तावित भारत-कतार मुक्त व्यापार करारावर विचारमंथन होण्याची शक्यता आहे. तसेच, दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठी विचारात घ्यायचे मुद्दे निश्चित करण्यावरही चर्चा होईल. अर्थ, कृषी, पर्यावरण, पर्यटन, संस्कृती आणि आरोग्यसेवा यांसारख्या अन्य प्रमुख क्षेत्रांमधले सहकार्य हा सुद्धा या चर्चेचा अविभाज्य भाग असेल. त्याचा उद्देश भारत आणि कतारमधील बहुआयामी भागीदारी अधिक दृढ करणे हा आहे.
केंद्रीय मंत्र्यांसोबत भारत कतार संयुक्त व्यापार परिषदेच्या पहिल्या बैठकीसाठी उद्योगांच्या वरिष्ठ प्रतिनिधींचे व्यापारी शिष्टमंडळही उपस्थित आहे. हे व्यापारी शिष्टमंडळ कतारच्या व्यवसाय आणि संस्थांसोबत सक्रियपणे संवाद साधेल.
या दौऱ्यात, गोयल कतारमधल्या इतर मान्यवर व्यक्ती आणि कतार चेंबर तसेच कतारियन बिझनेसमेन असोसिएशनमधील महत्वाच्या उद्योगपतीचीही भेट घेतील. याव्यतिरिक्त, ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची दोहा इथली शाखा, कतारमधल्या इंडियन बिझनेस अँड प्रोफेशनल्स कौन्सिल च्या प्रतिनिधींशी, तसेच कतारमधले ज्येष्ठ उद्योगपती आणि भारतीय समुदायाच्या वरिष्ठ सदस्यांशी संवाद साधतील.
* * *
निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2175139)
Visitor Counter : 5