गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हरियाणामध्ये रोहतक येथे आयोजित खादी कारीगार महोत्सवात प्रमुख पाहुणे
महात्मा गांधी यांनी खादीचा वापर सुरू केला, त्यामुळे देशातील लाखो विणकरांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडले: अमीत शाह
मोदी यांच्या 'खादी अपनाओ, स्वदेशी अपनाओ' या प्रमुख मोहिमेद्वारे देश पुन्हा एकदा आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत आहे
खादीपासून मिळणारा नफा थेट देशाच्या विणकरांकडे जातो आणि महिलांसाठी रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन देतो
प्रत्येक भारतीय कुटुंबाने वर्षाला किमान 5,000 रुपयांची खादी खरेदी करायला हवी असे अमीत शाह यांचे आवाहन
Posted On:
03 OCT 2025 6:40PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज हरियाणातील रोहतक येथे खादी कारीगर महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले.

कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीदरम्यान महात्मा गांधी यांनी गरिबी निर्मूलनासाठी, देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी, स्वदेशीच्या कल्पनेला चालना देण्यासाठी आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खादीचा वापर केला. महात्मा गांधी यांनी खादीची चळवळ सुरु केली, त्यामुळे देशभरातील लाखो विणकरांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडून आला. ते पुढे म्हणाले की, खादीचा मंत्र आपल्या देशातील लोकांसाठी आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी एक आधारस्तंभ बनला. स्वातंत्र्यानंतर विरोधी पक्षाच्या सरकारांनी खादीकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्या विकासासाठी काहीही केले नाही, असे अमित शाह म्हणाले. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी खादीचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प केला. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील लोकांना खादीचा वापर करायला प्रोत्साहन दिले. 2014-15 मध्ये खादी आणि ग्रामोद्योगाची उलाढाल 33,000 कोटी रुपये होती, ती आता वाढून 1.70 लाख कोटी रुपये झाल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, आज कारागिरांना विजेवर चालणारे चरखे, पारंपरिक चरखे, शिलाई मशीन आणि चामडे दुरुस्तीचे टूलकिट अशा 12 साधनांचे वाटप करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातील सर्व नागरिकांना आवाहन केले की, प्रत्येक कुटुंबाने वर्षाला 5,000 रुपयांची खादी खरेदी करावी. यामुळे देश स्वावलंबी होईल, असे ते म्हणाले. अमीत शाह म्हणाले की खादीचा शरीराला, गरिबांच्या घरांना आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने "खादी फॉर नेशन" हा उपक्रम पुढे नेला आहे, आणि पंतप्रधान मोदी यांचे "खादी फॉर फॅशन" हे घोषवाक्य अंगिकारले आहे, असे ते म्हणाले.

***
गोपाळ चिप्पलकट्टी / राजश्री आगाशे / परशुरांम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2174666)
Visitor Counter : 9