इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते ‘एनआयईएलआयटी’ डिजिटल विद्यापीठाचे उद्घाटन, उच्च दर्जाचे डिजिटल शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी नवे व्यासपीठ
अभ्यासक्रम, उद्योगाच्या गरजांशी सुसंगत राहावेत यासाठी “काय शिकवणार हे तुम्हीच ठरवा!” या घोषवाक्यानुसार ‘एनआयईएलआयटी’ने 500अव्वल कंपन्यांसह संवाद साधून सामंजस्य करार करावेत - अश्विनी वैष्णव
‘एनआयईएलआयटी’चे मायक्रोसॉफ्ट, झेडस्केलर, सीसीआरवायएन, डिक्सन टेक आदींसह सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2025 8:37PM by PIB Mumbai
रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली इथे ‘एनआयईएलआयटी’ डिजिटल विद्यापीठ (एनडीयू) व्यासपीठाचे उद्घाटन केले. हे व्यासपीठ उच्च दर्जाचे डिजिटल शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे.

या व्यासपीठावर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सायबर सुरक्षा, विदा विज्ञान (डेटा सायन्स), सेमीकंडक्टर्स आणि संबंधित क्षेत्रांमधील उद्योग-केंद्रित कार्यक्रम उपलब्ध होणार आहेत. यातून युवकांना डिजिटल शिक्षण पद्धती व आभासी प्रयोगशाळांद्वारे भविष्यासाठी आवश्यक कौशल्ये गरजेनुसार आत्मसात करण्याच्या संधी मिळतील.

केंद्रीय मंत्र्यांनी मुझफ्फरपूर (बिहार), बालेश्वर (ओदिशा), तिरुपती (आंध्र प्रदेश), दमण (दादरा आणि नगर हवेली व दमण-दीव) आणि लुंगलई (मिझोरम) इथल्या पाच नवीन ‘एनआयईएलआयटी’ केंद्रांचे दूरदृश्य माध्यमातून उद्घाटन केले. या नवीन केंद्रांमुळे भारताचे तांत्रिक भविष्य घडविण्यात ‘एनआयईएलआयटी’च्या भूमिकेची व्याप्ती वाढणार आहे. या प्रसंगी ‘एनआयईएलआयटी’ आणि मायक्रोसॉफ्ट, सीसीआरवायएन, डिक्सन टेक आणि फ्युचर क्राइम एक्स्चेंज्ड यांच्यात सामंजस्य करार झाले.
या वेळी बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले, “तीन वर्षांपूर्वी डिजिटल विद्यापीठ स्थापनेचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होते, मात्र ‘एनआयईएलआयटी’चा पर्याय सर्वोत्तम ठरला. आता आपल्याला 500 उद्योग भागीदारांची यादी तयार करायची आहे. हे भागीदार केवळ इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील असण्याची आवश्यकता नाही. आज डिजिटल तंत्रज्ञानांचा वापर जवळपास प्रत्येक क्षेत्रात होत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाच्या वापराला विशिष्ट मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये त्यानुसार पुरवठा करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचे आहे. आज इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात 13 लाख कोटी रुपयांचे प्रचंड उद्योग उभे राहिले आहेत. नजीकच्या भविष्यात ‘एनआयईएलआयटी’ आणखी मैलाचे टप्पे गाठेल, असा मला ठाम विश्वास आहे.”

या सामंजस्य कराराचे महत्त्व अधोरेखित करताना, केंद्रीय मंत्री म्हणाले की, हा सामंजस्य करार उद्योग-शिक्षण सहकार्य आणखी भक्कम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेने सर्वोच्च 500 कंपन्यांबरोबर चर्चा करावी आणि 'तुम्ही ठरवा काय शिकायचे' या ब्रीदवाक्याचे पालन करत, सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करावी, जेणेकरून राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेचे अभ्यासक्रम उद्योगांच्या गरजांना पूरक ठरतील.

ते पुढे म्हणाले की, आदरणीय पंतप्रधानांनी आपल्यासमोर उद्योगांशी जोडलेल्या डिजिटल विद्यापीठाची उभारणी करणे, असा एक भव्य दृष्टीकोन ठेवला होता. वाहतूक क्षेत्रात, थेट उद्योगाशी जोडलेल्या गती शक्ती विद्यापीठाच्या धर्तीवर राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेसाठीदेखील समान स्वप्न बाळगले होतेः औद्योगिक गरजांशी खोलवर जोडलेल्या संस्थेची निर्मिती.
ईशान्येकडील मिझोराममधील लुंगलेईचा विशेष उल्लेख करताना, काही महिन्यांपूर्वी राज्यात रेल्वेचे संपर्क जाळे उभारल्यानंतर आता हा प्रदेश डिजिटल प्रणालीद्वारे जोडला गेला आहे, यावर केंद्रिय मंत्र्यांनी प्रकाश टाकला.
या कार्यक्रमात, भारतभरातील विविध भागातल्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेचे विद्यार्थी, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ यांसह 1500 हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानातील विविध क्षेत्रांमध्ये कौशल्य आणि शिक्षण प्रारूपांमध्ये राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या क्षमतेचे प्रदर्शन करणारे स्टॉल्स लावले होते.
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेविषयी
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक स्वायत्त वैज्ञानिक संस्था कौशल्य विकास आणि डिजिटल सक्षमीकरणात अग्रेसर आहेत.
56 राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेची केंद्रे, 750हून अधिक मान्यताप्राप्त संस्था आणि 9000 पेक्षा अधिक सुविधा केंद्रांद्वारे व्यापकपणे राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेने लाखो विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञानात कुशल आणि शिक्षित केले आहे.
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेने शिक्षण मंत्रालयाकडून अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. त्याचे मुख्य आवार रोपार (पंजाब) येथे आहे. तसेच ऐझॉल, आगरतळा, औरंगाबाद, कालिकत, गोरखपूर, इम्फाळ, इटानगर, अजमेर (केकरी), कोहिमा, पटना आणि श्रीनगर येथे इतर अकरा ठिकाणी आवार आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षणात क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे.
***
शैलेश पाटील / रेश्मा बेडेकर / विजयालक्ष्मी साळवी साने / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2174322)
आगंतुक पटल : 47