संरक्षण मंत्रालय
ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानच्या हवाई संरक्षणाचा पोकळपणा उघडकीला आणला, भारताची निर्णायक क्षमता सिद्ध केली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
सर क्रीक क्षेत्रात पाकिस्तानच्या कोणत्याही आगळीकीला निर्णयक प्रत्युत्तर दिले जाईल; प्रत्युत्तर इतके जोरदार असेल की ते इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकेल: संरक्षण मंत्री
राजनाथ सिंह यांनी गुजरातमधील भुज येथे शस्त्रपूजनासह विजयादशमी केली साजरी
शस्त्रांचा उपयोग नेहमी न्याय आणि धर्मरक्षणासाठी केला पाहिजे: शस्त्रपूजेदरम्यान संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन
Posted On:
02 OCT 2025 1:07PM by PIB Mumbai
विजयादशमीनिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 02 ऑक्टोबर 2025 रोजी गुजरातमधील भुज येथील भुज लष्करी तळावर शस्त्रपूजा केली. ऑपरेशन सिंदूररम्यान भारताच्या संरक्षण क्षेत्राचे उल्लंघन करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न यशस्वीरित्या हाणून पाडल्याबद्दल भारतीय सशस्त्र दलांचे संरक्षण मंत्र्यांनी कौतुक केले. "पाकिस्तानने लेह ते सर क्रीक क्षेत्रापर्यंत भारताची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय सैन्याच्या त्वरित आणि चोख प्रत्युत्तराने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीचा पोकळपणा उघडकीला आणला त्याचसोबत जगाला स्पष्ट संदेश दिला की भारत त्याला योग्य वाटेल त्या वेळी, त्या ठिकाणी आणि आपल्या पद्धतीने कारवाई करू शकतो," असे ते म्हणाले.
स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही, सर क्रीक क्षेत्रावरून पाकिस्तानने वाद निर्माण करणे सुरू ठेवले असून भारताने वारंवार संवादाद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, याकडे संरक्षण मंत्र्यांनी लक्ष वेधले. सर क्रीक क्षेत्रात पाकिस्तानने अलिकडेच लष्करी पायाभूत सुविधांचा केलेला विस्तार हा त्याचा दुष्ट हेतू दर्शवतो असे सांगून पाकिस्तानने केलेल्या कोणत्याही आगळीकीला निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले, "जर पाकिस्तानने सर क्रीक क्षेत्रात कुठले धाडस केले तर त्याचे उत्तर इतके जोरदार असेल की ते इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलेल."
ऑपरेशन सिंदूर दहशतवादविरोधी होते, संघर्ष चिघळवून युद्ध भडकवण्यासाठी नव्हते. त्यामुळे सामर्थ्य असूनही भारताने संयम दाखवला, याकडे संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले. यावेळी सशस्त्र दलांना संबोधित करताना, शस्त्रपूजा हा केवळ एक विधी नाही तर भारताच्या संस्कृतीच्या तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारतीय संस्कृतीत शस्त्रे ही हिंसाचाराची साधने नसून धर्माची साधने मानली जातात, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्य, नौदल आणि हवाईदल यांच्या एकत्रित कार्यप्रणालीचे कौतुक केले आणि त्यांना भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचे तीन भक्कम स्तंभ असे संबोधले. या क्षेत्रात आयोजित केलेल्या ‘वरणास्त्र’ सरावाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की या सरावाने तिन्ही दलांची संयुक्त कार्यक्षमता व कोणताही धोका परतवून लावण्याची तयारी स्पष्ट झाली आहे.
शस्त्रांच्या महत्त्वासोबतच संरक्षणमंत्र्यांनी देशाच्या सीमांवरील आव्हानांचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, ही आव्हाने कधीच सोपी नसतात; ती नेहमीच वेगवेगळ्या स्वरूपात समोर येतात.
विजयादशमीच्या शुभेच्छा देताना राजनाथ सिंह म्हणाले की, हा सण आपल्याला स्मरण करून देतो की, वाईट कितीही शक्तिशाली वाटले तरी शेवटी धर्माचाच विजय होतो. “या दिवशी शस्त्रपूजा करणे हे भारताच्या राष्ट्रीय जीवनाशी घट्ट जोडलेले आहे, कारण ते राष्ट्राच्या सामूहिक सामर्थ्य, सुरक्षा आणि स्वातंत्र्याचा सन्मान दर्शवते,” असे ते म्हणाले.
संरक्षणमंत्र्यांनी महात्मा गांधींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आणि त्यांना नैतिक धैर्याचा तेजस्वी आदर्श म्हटले. त्यांनी नमूद केले की, गांधीजींनी केवळ आपल्या आत्मबलाच्या जोरावर त्या काळातील सर्वात शक्तिशाली साम्राज्याला नतमस्तक व्हायला भाग पाडले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आभासी पद्धतीने रणनीतिक खाडी क्षेत्रातील ज्वारीय प्रवाहापासून स्वतंत्र नांगर सुविधा आणि संयुक्त नियंत्रण केंद्राचे (the Tidal Independent Berthing Facility and the Joint Control Centre -JCC) उद्घाटन केले. या सुविधा एकात्मिक किनारी उपक्रमांसाठी मोठा आधार ठरणार असून संयुक्त कार्यक्षमता, किनारी सुरक्षा समन्वय व कोणत्याही धोक्याला जलद प्रतिसाद देण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढवतील. संरक्षणमंत्र्यांनी भुज लष्करी तळावर सैनिकांशी संवाद साधला.
या कार्यक्रमाला लष्करप्रमुख जनरल उपेन्द्र द्विवेदी, दक्षिण लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, जोधपूर येथील 12 कोरचे कोर कमांडर लेफ्टनंट जनरल आदित्य विक्रम सिंह राठी आणि भुज हवाई दल स्थानकाचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर केपीएस धाम उपस्थित होते.***
***
जयदेवी पुजारी स्वामी / सोनाली काकडे / नितीन गायकवाड / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2174114)
Visitor Counter : 11