संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण लेखा विभागाने वित्तीय लवचिकतेची खात्री करून, साधनसंपत्तीचा योग्य विनियोग करुन आणि ऑपेरेशनल सज्जता कायम ठेवल्याने ऑपरेशन सिंदूर हा सशस्त्र दलांसाठी एक निर्णायक विजय ठरला : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह


संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पाचे संरक्षक या नात्याने आपल्या सशस्त्र दलांच्या भविष्यातील क्षमता निर्माण करण्याच्या दृष्टीने संशोधन आणि विकास सक्षम करण्यात आणि प्रोत्साहन देण्यात संरक्षण लेखा विभागाची भूमिका महत्त्वाची आहे: संरक्षण मंत्री

Posted On: 01 OCT 2025 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2025

 

ऑपरेशन सिंदूर दरम्यान ऐतिहासिक आणि निर्णायक विजय संपादन करणाऱ्या आपल्या सशस्त्र दलांचे शौर्य आणि धाडसाचे संपूर्ण जग साक्षीदार होत असताना संरक्षण लेखा विभागाने साधनसंपत्तीचा कार्यक्षम विनियोग, आर्थिक व्यवस्थापन आणि युद्ध सज्जतेत एक मूक तरीही अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. 

नवी दिल्लीत 01 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित संरक्षण लेखा विभागाच्या  278 व्या स्थापना दिन समारंभात ते बोलत होते. भारताच्या सशस्त्र दलांचा आर्थिक कणा म्हणून आपले कर्तव्य चोख बजावल्याबद्दल तसेच विभागाच्या ऐतिहासिक वारशाचा संरक्षणमंत्र्यांनी गौरव केला. संरक्षण लेखा विभाग हा  वित्तीय प्रभुत्व आणि पारदर्शकता सुनिश्चित करतोच शिवाय सशस्त्र दलांना वेळेवर साधनसंपत्ती उपलब्ध करून ऑपेरेशनल सज्जता अधिक बळकट करतो, असे राजनाथ सिंग म्हणाले.

संरक्षण लेखा विभाग ही केवळ लेखा विषयक संस्था नव्हे तर राष्ट्राच्या आर्थिक चक्राचे सुरळीत  कार्य सुनिश्चित करणारा घटक आहे. वित्त आणि सशस्त्र दलांना जोडणारा हा एक अदृश्य सेतू आहे. आपल्या सैनिकांच्या शौर्याच्या पाठीशी तुमचे  निशब्द  कार्य हे एक  निर्णायक योगदान आहे, असे संरक्षण मंत्री म्हणाले.

भक्कम वित्तीय शिस्त

शासनासाठी वित्त म्हणजे जीवनरक्त आहे असे सांगून  राजनाथ सिंह म्हणाले की, राष्ट्राची ताकद त्याच्या आर्थिक पायाच्या मजबुतीमध्ये प्रतिबिंबित होते. राष्ट्रीय प्रशासन आणि संरक्षण यंत्रणेच्या सुरळीत कामकाजासाठी वित्तपुरवठा स्थिर असणे आवश्यक आहे.

लेखा विभागाने 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भांडवली अर्थसंकल्पीय खर्चाच्या 50% आधीच आरक्षित केले आहे हे सुनिश्चित  केल्याबद्दल त्यांनी विभागाचे कौतुक केले, आणि हे कार्यक्षम वापराचे स्पष्ट प्रतिबिंब असल्याचे अधोरेखित केले. याशिवाय मागील आर्थिक वर्षात विभागाने 100% निधीचा वापर साध्य केल्याबद्दल त्यांनी विभागाचे अभिनंदन केले आणि यावर्षीही हीच गती कायम राहील असा विश्वास व्यक्त केला.

तंत्रज्ञान-सक्षम सुधारणा

डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी विभागाचे  कौतुक केले. त्यांनी ई-रक्षा आवास प्रकल्पाचे यश, निधी 1.0 चे निधी  2.0 मध्ये अपग्रेडेशन आणि ट्यूलिप 2.0 मध्ये सुरू असलेल्या संक्रमणावर प्रकाश टाकला, ज्यामुळे आर्थिक प्रक्रियांमध्ये कार्यक्षमता वाढेल. नियम आणि प्रक्रियांबद्दल अचूक माहिती देण्यासाठी डिझाइन केलेल्या एआय चॅटबॉट 'ज्ञान साथी' च्या अंतर्गत विकासाचे  राजनाथ सिंह यांनी कौतुक केले. "या प्रगतीशील सुधारणा कार्यक्षमता आणि पारदर्शकतेसाठी तंत्रज्ञान स्वीकारण्यात संरक्षण लेखा विभागाच्या  सक्रिय भावनेचे प्रदर्शन करतात तसेच ते डिजिटली सक्षम संरक्षण वित्त प्रणालीकडे वाटचाल करण्याच्या भारताच्या दृढनिश्चयाला देखील अधोरेखित करतात," असे ते पुढे म्हणाले.

संशोधन आणि विकासाला चालना

तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या आधुनिक, युद्धातील  वाढती गुंतागुंत ओळखून,  राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकासाकडे नव्याने जोर देण्याचे आवाहन केले. "आजच्या युगातील  युद्धात, नवीन तंत्रज्ञान हे बहुतेकदा आश्चर्यचकित करणारे आहे. ते वर्षानुवर्षे केलेल्या संशोधन आणि विकासाचे परिणाम आहेत. यामुळे संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला समर्थन देणारी एक नाविन्यपूर्ण परिसंस्था तयार करणे आपल्यासाठी अत्यावश्यक बनते," असे त्यांनी अधोरेखित केले.

संरक्षण मंत्र्यांनी आय-डेक्स, तंत्रज्ञान विकास निधी आणि डीआरडीओ प्रकल्पांसारख्या सरकारी उपक्रमांचा उल्लेख केला. तसेच विभागाने अर्थसंकल्पीय शिस्त कायम ठेवून  संशोधन आणि विकास प्रक्रियेतील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन त्यांनी केले. "संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पाचे संरक्षक या नात्याने  आपल्या सशस्त्र दलांच्या भविष्यातील क्षमता निर्माण करण्याच्या दृष्टीने संशोधन आणि विकास सक्षम करण्यात आणि प्रोत्साहन देण्यात संरक्षण लेखा विभागाची भूमिका महत्त्वाची आहे," यावर त्यांनी भर दिला.

सशस्त्र दलांमधील एकता

तिन्ही सेवादलांमध्ये संयुक्तता आणि एकात्मतेवर सरकारचा भर आहे याकडे लक्ष वेधून, राजनाथ सिंह यांनी डीएडीला या प्रक्रियेत आर्थिक सक्षमकर्ता म्हणून काम करण्याचे आवाहन केले. "तुम्ही तळागाळातील पातळीपासून तिन्ही सेवांच्या मुख्यालयापर्यंत अस्तित्वात असलेल्या काही संस्थांपैकी एक आहात. मी तुम्हाला सेवांसोबत जवळून काम करण्याचे आणि आर्थिक प्रक्रियांद्वारे संयुक्तता आणि एकात्मता कशी वाढवता येईल याचा अभ्यास करण्याचे आवाहन करतो. यामुळे आमच्या त्रि-सेवा समन्वयासाठी सकारात्मक परिणाम मिळतील," असे त्यांनी अधोरेखित केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विभागाच्या आर्थिक व्यवस्थापन आणि लेखापरीक्षण क्षमतांना एका नवीन युगात नेण्यासाठी डिझाइन केलेल्या अनेक ऐतिहासिक प्रकाशने आणि डिजिटल उपक्रमांचे अनावरण केले. प्रमुख प्रकाशनांमध्ये  संरक्षण खर्चावरील व्यापक सांख्यिकी हँडबुक (COSHE) 2025 आणि अद्ययावत आर्मी लोकल ऑडिट मॅन्युअल (ALAM) यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, NIDHI 2.0 आणि ज्ञान साथी हे दोन प्रगत डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आले.

NIDHI 2.0 ही जनरल प्रॉव्हिडंट फंड (GPF) सबस्क्रिप्शनसाठी एक एकात्मिक व्यवस्थापन प्रणाली आहे, जी 1.7 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना सेवा देते. ही प्रणाली रिअल-टाइम सिंक्रोनाइझेशन, ऑडिट ट्रेल्स, ऑटोमेटेड बिल प्रोसेसिंग आणि अखंड डिजिटल परस्परसंवाद यासारख्या वैशिष्ट्यांसह आर्थिक व्यवहार सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

ज्ञान साथी डीएडीच्या मॅन्युअल आणि नियमांच्या विस्तृत संग्रहातून माहिती पुनर्प्राप्तीसाठी एआय-संचालित सहाय्य आणते, जे भागधारकांना त्वरित, अधिकृत मार्गदर्शन प्रदान करते.

COSHE-2025 ही एक व्यापक हँडबुक आहे जी भारताच्या संरक्षण खर्चाचे तपशीलवार विश्लेषण देते, ज्यामध्ये राष्ट्रीय आणि जागतिक अर्थसंकल्प तुलना सादर करण्यासाठी आणि संरक्षण वित्त क्षेत्रातील माहितीपूर्ण निर्णय सुलभ करण्यासाठी शेकडो तक्ते आणि आलेख आहेत.

   

ALAM हे आर्मी युनिट्स आणि फॉर्मेशन्समधील स्टोअर आणि कॅश अकाउंट्सचे ऑडिट आणि तपासणी करण्यासाठी आवश्यक सूचना प्रदान करते आणि संरक्षण आर्थिक ऑपरेशन्समध्ये जबाबदारी आणि पारदर्शकता राखण्यासाठी अद्ययावत प्रक्रियांची रूपरेषा देते.

या कार्यक्रमादरम्यान, प्रमुख सुधारणा आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये संघ आणि व्यक्तींनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेण्यासाठी 2025 साठीचे रक्षा मंत्री उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आले. हे पुरस्कार संरक्षण आर्थिक व्यवस्थापनातील नावीन्यपूर्णता, व्यावसायिकता आणि कार्यक्षमता साजरे करतात, संस्थात्मक क्षमता मजबूत करणाऱ्या आणि सशस्त्र दलांना विभागाच्या सेवेत पारदर्शकता वाढवणाऱ्या योगदानावर प्रकाश टाकतात.

   

278 वर्षांच्या सेवेचा आनंद साजरा करत, डीएडीची उत्पत्ती 1747 मध्ये लष्करी वेतन मास्टरच्या नियुक्तीपासून झाली आणि भारताच्या सशस्त्र दलांच्या आणि संबंधित संघटनांच्या आर्थिक व्यवस्थापन गरजा पूर्ण करण्यासाठी सतत विकसित होत आहे. आज, डीएडी अंतर्गत लेखापरीक्षण, देयक, लेखा, आर्थिक सल्ला आणि पेन्शनमध्ये कौशल्य प्रदान करते, तसेच संरक्षण वित्त आणि अर्थशास्त्रात संरक्षण मंत्रालयाला एक महत्त्वाचा 'ज्ञान भागीदार' म्हणून देखील काम करते.

या कार्यक्रमाला नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग, सचिव डीडीआर अँड डी आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत, आर्थिक सल्लागार (संरक्षण सेवा) डॉ. मयंक शर्मा, संरक्षण लेखा महानियंत्रक राज कुमार अरोरा, संरक्षण मंत्रालय आणि सीजीडीएचे वरिष्ठ अधिकारी आणि डीएडीचे  कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

 

* * *

गोपाळ चिप्‍पलकट्टी/भक्‍ती सोनटक्‍के/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2173910) Visitor Counter : 3