गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मोदी सरकार पंजाबमधील जनतेच्या खांद्याला खांदा लावून उभे असून राज्यातील पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Posted On: 30 SEP 2025 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 सप्‍टेंबर 2025

 

मोदी सरकार पंजाबमधील जनतेच्या खांद्याला खांदा लावून उभे असून राज्यातील पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज संध्याकाळी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली, आणि त्यांना मान्सूनच्या काळात आलेल्या पुरामुळे राज्यात झालेल्या नुकसानीची माहिती दिली. आपत्ती निवारण आणि पुनर्वसनाकरिता राज्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये (एसडीआरएफ) राज्याकडे 12,589.59 कोटी रुपये इतका पुरेसा निधी आहे, जो भारत सरकारच्या निकषांनुसार बाधितांना मदत आणि तात्काळ पुनर्वसन करण्यासाठी वापरता येईल,अशी माहिती या बैठकीत मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. 

राज्यात अलिकडच्या काळात आलेल्या पुरात शोध, बचाव आणि तात्काळ पुनर्वसनासाठी केंद्र सरकारने केंद्रीय संस्थांकडून राज्य प्रशासनाला सर्वतोपरी मदत पुरवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 सप्टेंबर 2025 रोजी पंजाबला भेट दिली होती आणि राज्यातील पूर परिस्थिती आणि पूरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला होता. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 1,600 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीपैकी 805 कोटी रुपये (एनएचएआयने मंजूर केलेल्या 170 कोटी रुपयांसह) विविध योजनांअंतर्गत राज्य सरकार आणि इच्छित लाभार्थ्यांना आधीच जारी करण्यात  आले आहेत आणि उर्वरित रक्कम राज्याकडून संबंधित माहिती मिळाल्यानंतर देण्यात येणार आहे.

शिवाय, पंजाब राज्याकडून निवेदन मिळण्याची वाट न पाहता 1 सप्टेंबर 2025 रोजी एका आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाची (आयएमसीटी) स्थापन करण्यात आली. केंद्रीय पथकाने 3 ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यातील नुकसानीचे प्रत्यक्ष मूल्यांकन करण्यासाठी बाधित भागांना भेट दिली. राज्य सरकारने अद्याप तपशीलवार निवेदन सादर केलेले नाही. निवेदन प्राप्त झाल्यानंतर, केंद्र सरकार,  स्वीकृत  निकषांनुसार त्यावर विचार करेल.

 

* * *

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2173416) Visitor Counter : 7