राष्ट्रपती कार्यालय
भारतीय सांख्यिकी सेवा, भारतीय कौशल्य विकास सेवा आणि केंद्रीय अभियांत्रिकी सेवेच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली
Posted On:
29 SEP 2025 5:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2025
भारतीय सांख्यिकी सेवा, भारतीय कौशल्य विकास सेवा आणि केंद्रीय अभियांत्रिकी सेवेच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज (29 सप्टेंबर 2025) राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

भारतीय सांख्यिकी सेवेतील अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, योग्य धोरण आखून त्याची अंमलबजावणी करणे, हे अचूक सांख्यिकीय विश्लेषणावर अवलंबून असते. त्या म्हणाल्या की, आजच्या डेटा-संचालित जगात, आकडेवारीची प्रासंगिकता प्रचंड वाढली आहे. अधिकृत डेटा संकलन आणि त्याचे विश्लेषण करण्यात सांख्यिकी अधिकारी म्हणून असलेली त्यांची महत्त्वाची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. त्या पुढे म्हणाल्या की, त्यांच्या कामामध्ये सांख्यिकी पद्धतींमधील प्राविण्य आवश्यक असून, त्याचा वापर ते देशाच्या वाढत्या डेटा आणि माहितीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतील.
भारतीय कौशल्य विकास सेवा अधिकाऱ्यांना (आयएसडीएस) संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, कौशल्य आणि ज्ञान कोणत्याही देशाचा आर्थिक विकास आणि सामाजिक प्रगतीची खरी इंजिने आहेत. उच्च कुशल मनुष्यबळ विकसित करणारे देश जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि विकासाच्या विविध क्षेत्रांमधील नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी अधिक सुसज्ज असतात. भारत तंत्रज्ञान-चालित विकासाच्या मार्गावर प्रगती करत असताना, आपल्या तरुणांनी प्रगत तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे आणि त्याच्याशी जुळवून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आयएसडीएस चे तरुण अधिकारी विशेष कौशल्य असलेल्या प्रशासकांची तुकडी म्हणून उदयाला येतील आणि एक मजबूत, भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय अभियांत्रिकी सेवेच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, देशाची तांत्रिक प्रगती आणि आर्थिक विकासात अभियंते महत्त्वाची भूमिका बजावतात. सरकारने मोठ्या प्रमाणातील पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे, अभियांत्रिकी क्षेत्र, लक्षणीय विकास साधण्यासाठी सज्ज आहे. या उपक्रमांसाठी तांत्रिक पाया उभारण्यामध्ये केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागासारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. विकास शाश्वत आहे, याची खात्री करणे देखील महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग पर्यावरणपूरक उपाययोजनांचा अवलंब करत आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

राष्ट्रपतींनी सांगितले की अधिकारी केवळ धोरण अंमलबजावणीतच नव्हे तर प्रभावी प्रतिसादाद्वारे धोरण ठरवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतील. सेवेप्रति, तसेच सर्वांच्या, विशेषतः दुर्बल आणि उपेक्षित घटकांच्या विकासाप्रति असलेली त्यांची वचनबद्धता, देशाच्या विकासाची गती निश्चित करेल. तळमळीने आणि सचोटीने सेवा करून, अधिकारी, अधिक समृद्ध, लवचिक आणि समावेशक राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान देऊ शकतील, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांद्वारे, ते भारताला जगासमोर सामर्थ्य आणि प्रगतीचे मॉडेल म्हणून प्रस्थापित करू शकतील, असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2172762)
Visitor Counter : 18