आयुष मंत्रालय
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या सहकार्याने राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाकडून, नवी दिल्ली येथे ‘अस्थि मर्म’ या विषयावर दोन दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
27 SEP 2025 12:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2025
राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ (RAV), नवी दिल्ली, आणि अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) यांच्या सहकार्याने नवी दिल्ली येथील AIIA मध्ये ‘अस्थि मर्म’ या विषयावर दोन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन, RAV च्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि पद्मश्री तसेच पद्मभूषण सन्मान प्राप्त वैद्य श्री देवेंद्र त्रिगुणा यांनी केले. AIIA चे अधिष्ठाता डॉ. महेश व्यास, यावेळी उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनीय भाषणात वैद्य श्री देवेंद्र त्रिगुणा यांनी आधुनिक आरोग्यसेवेत आयुर्वेदाच्या महत्त्वावर भर दिला आणि वर्तमान काळातील आरोग्यविषयक आव्हानांवर मात करण्यासाठी पारंपरिक ज्ञानाच्या उपयुक्ततेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी आयुर्वेद चिकित्सकांसाठी उपलब्ध असलेल्या विपुल संधींचाही उल्लेख केला आणि अशा विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांचे, रुग्णांना कुठल्याही प्रकारच्या उपचार केंद्रात थेट वैद्यकीय देखभाल आणि उपचार देण्याची प्रक्रिया (क्लिनिकल प्रॅक्टिस) सुधारण्यात होणारे योगदान महत्वाचे असल्याचे सांगितले.

प्रशिक्षण सत्रांचे नेतृत्व नामवंत तज्ञांनी केले. यात डॉ. सी. सुरेश कुमार आणि डॉ. एन. व्ही. श्रीवत्स हे दोघेही केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था वडोदरा (CRAV) मधील गुरु, NIA जयपूरचे प्र-कुलगुरु डॉ. पी. हेमंत कुमार, आणि AIIA, नवी दिल्लीच्या पंचकर्म विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख, डॉ. आनंदराम शर्मा, यांचा समावेश होता.
पहिल्या दिवशी सहभागींना शिस्तबद्धरीत्या, अस्थि मर्म ची (हाडांवरील संवेदनशील बिंदू ज्यावर योग्य उपचार किंवा दाब दिल्यास आरोग्य सुधारता येते, आणि इजा झाल्यास समस्या निर्माण होऊ शकते) तत्त्वे आणि पद्धती याबाबत सखोल माहिती मिळाली.यामध्ये सैद्धांतिक चौकट आणि क्लिनिकल अनुप्रयोग म्हणजेच वैद्यकीय उपचारात किंवा रुग्णांवर प्रत्यक्ष वापर करता येणारी माहिती, तत्त्वे किंवा तंत्रे, यांचा समावेश होता. नामवंत तज्ञांनी मांडलेले ज्ञान, पुढील संवादात्मक आणि व्यावहारिक सत्रांसाठी भरीव पाया निर्माण करणारे ठरले.
हा दोन दिवसांचा कार्यक्रम, सहभागींचे कौशल्य आणि ज्ञानात वृद्धी करेल अशी अपेक्षा आहे. यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या तपासलेल्या आयुर्वेदिक उपचारांचा प्रसार होईल आणि सर्वांगीण आरोग्यसेवेत ( आजार आणि आजाराशी निगडित इतर सर्व बाबी यांचा पूर्ण विचार करून दिलेली आरोग्य सेवा) आयुर्वेदाची भूमिका अधिक बळकट होईल.
* * *
शैलेश पाटील/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2172075)
Visitor Counter : 16