संरक्षण मंत्रालय
मिग-21 हे धैर्य, शिस्त आणि देशभक्तीच्या सातत्याचे प्रतीक; स्वदेशी हलके लढाऊ विमान तेजस आणि भविष्यातल्या प्रगत मध्यम लढाऊ विमानांच्या विकासाला प्रेरणा देईल: संरक्षण मंत्री
1971 च्या युद्धातल्या निर्णायक भूमिकेपासून ते कारगिल संघर्ष, बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये मिग-21 ने आपली क्षमता सिद्ध केली: संरक्षण मंत्री
"मिग-21 ने आम्हाला बदलाला न घाबरता, तो आत्मविश्वासाने स्वीकारायला शिकवले. आज भारताची संरक्षण परिसंस्था हा वारसा पुढे नेण्यासाठी एकजुटीने काम करत आहे"
Posted On:
26 SEP 2025 3:15PM by PIB Mumbai
मिग-21 चा वारसा संरक्षण क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासात जिवंत राहील. हे विमान धैर्य, शिस्त आणि देशभक्तीच्या सातत्याचे प्रतीक आहे, ते तेजस सारख्या स्वदेशी हलक्या लढाऊ विमानांच्या आणि भविष्यातल्या प्रगत मध्यम लढाऊ विमानांच्या विकासाला प्रेरणा देईल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. ते 26 सप्टेंबर रोजी चंदीगड इथे भारतीय हवाई दलाच्या मिग-21 विमानांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याप्रसंगी बोलत होते. या समारंभात मिग-21 ने आपले अखेरचे उड्डाण केले आणि भारतीय हवाई दलाच्या इतिहासातल्या 6 दशकांहून अधिक काळाच्या गौरवशाली अध्यायाची सांगता झाली.

संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात, मिग-21 ने 1971 च्या युद्धातल्या निर्णायक भूमिकेपासून ते कारगिल संघर्ष, बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरपर्यंत विविध युद्धे आणि संघर्षांमध्ये आपली क्षमता कशी सिद्ध केली, या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येक ऐतिहासिक मोहिमेत मिग-21 ने तिरंगा सन्मानाने फडकावला. त्याचे योगदान केवळ एका घटनेपुरते किंवा युद्धापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर अनेक दशकांसाठी ते भारताच्या हवाई सामर्थ्याचा एक आधारस्तंभ राहिले आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

या निरोप समारंभाकडे केवळ एक औपचारिक लष्करी परंपरा म्हणून न पाहता, भारताच्या संस्कृती आणि मूल्यांचा विस्तार म्हणून पाहण्याची गरज आहे, असे सिंह यांनी सांगितले.
या सोहळ्यासाठी चंदीगडच्या विशेष महत्त्वावर भर देताना संरक्षण मंत्री म्हणाले की, याच ठिकाणी मिग-21 विमानाला 28 क्रमांकाच्या स्क्वाड्रन, म्हणजेच 'पहिल्या सुपरसॉनिक विमानां' मध्ये सामील करण्याने भारताचा सुपरसॉनिक विमानांचा प्रवास सुरू झाला होता. आज त्याच ठिकाणाहून त्याच विमानाला निरोप देताना इतिहासाचे एक वर्तुळ पूर्ण होत आहे, असेही ते पुढे म्हणाले.

हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली झालेले लढाऊ विमानांचे औपचारिक उड्डाण हे या समारंभाचे मुख्य आकर्षण ठरले. हा एक दुर्मिळ आणि प्रतिकात्मक कार्यक्रम होता. त्यातून भारतीय हवाई दलाचा या महान विमानाबद्दलचा नितांत आदर दिसून आला. मिग-21 आणि एलसीए तेजस यांच्या संयुक्त उड्डाणाने या महान 'बायसन' विमानापासून स्वदेशी 'तेजस'कडे होणारे स्थित्यंतर अधोरेखित केले.

याप्रसंगी संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते मिग-21 च्या गौरवशाली परंपरेला आदरांजली वाहणारे एक विशेष टपाल तिकीट आणि स्मृतीप्रित्यर्थ छापण्यात आलेल्या मुखपृष्ठाचे अनावरणही करण्यात आले.

***
शैलेश पाटील / निखिलेश चित्रे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2172019)
Visitor Counter : 13