दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
पंतप्रधानांच्या हस्ते देशव्यापी स्वदेशी 4G नेटवर्कचे लोकार्पण होणार: मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती
"बीएसएनएलचे स्वदेशी 4G नेटवर्क हे विकसित भारता'च्या दिशेने उचलेले एक ऐतिहासिक पाऊल" - ज्योतिरादित्य शिंदे
Posted On:
26 SEP 2025 3:55PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा प्रारंभ करणार आहेत, केंद्रीय दूरसंचार आणि ईशान्येकडील प्रदेशांचे विकासमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशभरात सुमारे 98,000 मोबाईल 4G मोबाईल टॉवर्सची सुरुवात हा यातला पहिला उपक्रम असून, संपूर्णपणे सॉफ्टवेअर-चलित, क्लाउड आधारित आणि 5G मध्ये सहजपणे अपग्रेड करता येणाऱ्या स्वदेशी 4G नेटवर्कचे लोकार्पण हा दुसरा उपक्रम असेल. "भारताचा कोणताही भाग विकासापासून वंचित राहणार नाही," असे शिंदे यांनी सांगितले. हे 4G टॉवर्स देशभरातील 2 कोटी 20 लाख ग्राहकांना आधीच सेवा देत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.


यामुळे भारतासाठी दूरसंचार क्षेत्रात एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे, कारण भारताने आता जगातील आघाडीच्या दूरसंचार उपकरण निर्मात्यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेअंतर्गत बीएसएनएल ने हे तंत्रज्ञान स्थापित केले आहे. यामध्ये तेजस नेटवर्कने विकसित केलेले रेडिओ ऍक्सेस नेटवर्क, सी-डॉट द्वारे निर्मित कोअर नेटवर्क आणि टीसीएस द्वारे एकीकरण केलेल्या संपूर्ण स्वदेशी 4G तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

याचा अर्थ असा की, बिहारमधील विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाचे ऑनलाइन शिक्षण सहज उपलब्ध होईल. पंजाबमधील शेतकऱ्यांना मंडईतील भावांची थेट माहिती मिळेल. काश्मीरमध्ये तैनात असलेले सैनिक आपल्या प्रियजनांच्या संपर्कात राहतील आणि ईशान्येकडील उद्योजक आंतरराष्ट्रीय कौशल्य आणि निधी मिळवण्यासाठी सक्षम होतील, अशी माहिती शिंदे यांनी दिली. ही 4G पायाभूत सुविधा प्रत्येक भारतीयाचे, मग तो कोणत्याही भौगोलिक प्रदेशात किंवा पार्श्वभूमीचा असो, जीवनमान उंचावण्यासाठी तयार करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
यासोबतच, आम्ही डिजिटल भारत निधी अंतर्गत भारताचे संपूर्ण 4G सॅचुरेशन नेटवर्कसुद्धा सादर करत आहोत, त्यात 4G सॅचुरेशन प्रकल्पाचा भाग म्हणून सुमारे 29,000 गावांना जोडण्यात आले आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. बीएसएनएलच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हे होत आहे, ही एक विशेष बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले.
***
शैलेश पाटील / निखिलेश चित्रे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2171989)
Visitor Counter : 17