आयुष मंत्रालय
आयुष मंत्रालयाने एआयआयए गोवा येथे "लोकांसाठी आणि पृथ्वीग्रहासाठी आयुर्वेद" या संकल्पनेसह 10 वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन केला साजरा
गोव्यामध्ये आयुर्वेद-आधारित आरोग्य पर्यटनाचे जागतिक केंद्र बनण्याची क्षमता आहे : गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू
लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आधुनिक जीवनशैलीच्या व्याधींवर आयुर्वेद हे उत्तर आहे : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
23 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा आयुर्वेद दिन निसर्गाच्या संतुलनाशी सुसंगत असून; मूळ आयुर्वेदिक तत्वे प्रतिबिंबित करतो : प्रतापराव जाधव
आयुर्वेद आजच्या काळातील आरोग्य आणि पर्यावरणशी निगडित संकटांवर काळाच्या कसोटीवर टिकणारे उपाय प्रदान करतो : राज्यमंत्री श्रीपाद नाईक
आयुर्वेद आणि संबंधित विज्ञानात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार 2025 प्रदान
Posted On:
23 SEP 2025 5:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2025
आयुष मंत्रालयाने आज अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआयआयए), गोवा येथे 10 वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा केला. या कार्यक्रमाला गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आयुषचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव आणि केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

M5AO.jpeg)
हा कार्यक्रम आयुर्वेदाला आरोग्य आणि कल्याणाची समग्र प्रणाली म्हणून प्रोत्साहन देण्याच्या मंत्रालयाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरला जो शाश्वतता आणि नैसर्गिक जीवनशैलीवर आधारित आहे.

या प्रसंगी बोलताना, गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू यांनी आयुर्वेदाच्या जागतिक विकासाचा उल्लेख केला आणि सांगितले की, एका दशकापेक्षा कमी कालावधीत, आयुर्वेद दिन राष्ट्रीय स्तरावरून एका जागतिक आरोग्य चळवळीत विकसित झाला आहे. त्यांनी नमूद केले की 150 हून अधिक देश आता हा दिवस साजरा करतात आणि आयुर्वेदाला केवळ पर्यायी उपचार पद्धती म्हणून नव्हे तर एक व्यापक आरोग्य सेवा प्रणाली म्हणून मान्यता दिली आहे. राजू यांनी या वर्षीची "लोकांसाठी आणि ग्रहासाठी आयुर्वेद", ही संकल्पना संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी काळानुरूप आणि प्रासंगिक असल्याचे गौरवोद्गार काढले.

गोवा हे आयुर्वेद-आधारित आरोग्य पर्यटनाचे जागतिक केंद्र बनू शकते, असे राज्यपाल म्हणाले. टाटा स्मारक केंद्राच्या सहकार्याने गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत एकात्मिक कर्करोगशास्त्र विभागाची स्थापना झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. कर्करोगावरील सर्वंकष उपचारासाठी आयुर्वेदाचे आधुनिक कर्करोगशास्त्रासोबत एकात्मिकीकरण घडवून आणणे हा या विभागाचा उद्देश आहे. गोव्याच्या जैवविविधतेसोबत पारंपरिक औषधांचे मिश्रण करण्यासाठी एक सर्वांगीण दृष्टिकोन असावा, असे आवाहन त्यांनी केले. स्थानिक औषधी वनस्पतींचे संरक्षण आणि संवर्धन केला तर रोजगार वाढेल आणि प्रादेशिक अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल, ही बाब त्यांनी त्यांनी अधोरेखित केली.
CGY7.jpeg)
गोव्याचे मुख्यमंत्री, प्रमोद सावंत यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले. लठ्ठपणा, मधुमेह आणि ताणतणाव यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित वाढत्या विकारांवर मात करण्यासाठी आयुर्वेदाची उपयोगिता त्यांनी अधोरेखित केली. दिनचर्या आणि ऋतूचर्या यांसारख्या जुन्या संकल्पनांतून प्रतिबंधात्मक आरोग्यासाठी शाश्वत प्रारूपे मिळतात असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लठ्ठपणाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल वेळोवेळी चिंता व्यक्त केली असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावर आयुर्वेदात शरीराची शुद्धी (डिटॉक्सिफिकेशन), संतुलित आहार, औषधी वनस्पती आणि योग अशा सुलभ आणि अत्यंत परिणामकारक उपाययोजना असल्याचे त्यांनी सांगितले.
X29I.jpeg)
यावेळी सावंत यांनी गोवा राज्य सरकार, टाटा स्मारक केंद्र आणि गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था यांच्यात एकात्मिक कर्करोगशास्त्र केंद्र स्थापन करण्यासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याची घोषणा केली. हे सहकार्यातून पारंपरिक आणि आधुनिक वैद्यकीय प्रणालींचे एकात्मिकीकरण घडून येईल, हे रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि सर्वांगीण उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रगतीशील पाऊल आहे, असे ते म्हणाले.
K399.jpeg)
आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या कार्यक्रमात बीजभाषण केले. सर्वंकष आरोग्य प्रणाली म्हणून आयुर्वेदाला मिळत असलेली वाढत्या जागतिक मान्यता त्यांनी अधोरेखित केली. 23 सप्टेंबर हा दिवस आयुर्वेद दिन म्हणून निश्चित करण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले. हा दिवस निसर्गातील संतुलनाचे प्रतीक असलेल्या शरद संक्रांतीसोबत जुळणारा आहे आणि, हेच आयुर्वेदाच्या तत्त्वज्ञानाचे मूळ आहे असे ते म्हणाले.
यावेळी जाधव यांनी गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या देश का स्वास्थ्य परीक्षण अभियानाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दलही सांगितले. अशा प्रकारचे उपक्रम पारंपरिक ज्ञान प्रणालींना आधुनिक आरोग्यसेवेसोबत जोडण्यासाठी पाया रचत आहेत, यामुळे भविष्यवेधी, प्रतिबंधात्मक आणि वैयक्तिक वैद्यकीय उपाय विकसित करता येतील, असे जाधव यांनी नमूद केले.
केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक, यांनी आपल्या भाषणात अससंर्गजन्य आजार, मानसिक आरोग्याच्या समस्या आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांसारख्या वाढत्या जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आयुर्वेदाचे वाढते महत्त्व विशद केले. आयुर्वेदाची तत्त्वे जागतिक समस्यांशी सुसंगत आहेत आणि प्रतिबंधात्मक आणि शाश्वत आरोग्यसेवेसाठी काळाच्या कसोटीवर खरी उतरणारी संरचना प्रदान करतात असे त्यांनी सांगितले.
यावर्षीच्या आयुर्वेद दिनाच्या उदघाटनासोबतच अनेक नवीन उपक्रमांची सुरुवात झाली. यामध्ये देश का स्वास्थ्य परीक्षण अर्थात आरोग्य मूल्यांकन मोहीम हा राष्ट्रव्यापी कार्यक्रम आणि आयुर्वेदिक पदार्थांसाठी एक डिजिटल व्यासपीठ असलेल्या द्रव्य पोर्टलचा शुभारंभ यांचा समावेश होता. आयुर्वेदाबद्दलच्या ज्ञानाची पोहोच सर्वदूर पसरावी, सामुदायिक आरोग्य मूल्यांकनानात सुधारणा आणि आयुर्वेद क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे.

या संकल्पनेला अनुसरून रानभाजी उत्सव देखील सुरु करण्यात आला असून त्यामाध्यमातून आयुर्वेदिक आहारशैलीचा पाया असलेल्या वैविध्यपूर्ण तसेच आरोग्यवर्धक रानातील भाज्यांचा महोत्सव साजरा करण्यात आला. याव्यतिरिक्त, आयुर्वेद आणि संबंधित विज्ञान शाखांमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल प्रा. बामवारी लाल गौर, वैद्य ई.टी नीलकंठन मूस आणि वैद्य भावना प्राशर यांना प्रतिष्ठित राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला गोवा विधानसभेचे सदस्य प्रवीण आर्लेकर; आयुष मंत्रालयाचे सचिव आणि पद्मश्री पुरस्कार विजेते वैद्य राजेश कोटेचा; अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआयआयए), नवी दिल्लीचे संचालक प्रा. (वैद्य) प्रदीप कुमार प्रजापती; अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोवाच्या अधिष्ठाता प्रा.(डॉ.) सुजाता कदम; आणि पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांची उपस्थिती होती.
भारतात आणि जागतिक स्तरावर आरोग्यसेवेतील आयुर्वेदाचे महत्त्व अधिक उंचावण्यासाठी सुरु असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमध्ये या दहाव्या आयुर्वेद दिनाच्या उदघाटनाच्या रूपाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. नवनवीन उपक्रम, संशोधन आणि लोकसहभाग यांची सांगड घालून आयुर्वेद हा भारताच्या आरोग्यसेवेचा आधारस्तंभ असेल हे सुनिश्चित करण्याचा आयुष मंत्रालयाचा निर्धार आहे.
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/तुषार पवार/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2170176)