अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2025 चे होणार उद्घाटन
वर्ल्ड फूड इंडिया हे केवळ एक व्यापारविषयक प्रदर्शन नाही तर खाद्यपदार्थ क्षेत्रातील नवोन्मेष, गुंतवणूक आणि शाश्वतता या क्षेत्रात भारताला जागतिक केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी एक परिवर्तनकारी व्यासपीठ आहे: चिराग पासवान
Posted On:
23 SEP 2025 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2025
केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 25 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान वर्ल्ड फूड इंडिया 2025 च्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन केले आहे. हा भव्य जागतिक खाद्यपदार्थ कार्यक्रम 1,00,000 चौरस मीटरच्या विस्तृत क्षेत्रफळावर होणार असून त्यात 21 हून अधिक देश, भारतातील 21 राज्ये/केंद्रशासित प्रदेश, 10 केंद्रीय मंत्रालये आणि 5 सहयोगी सरकारी संघटना सहभागी होणार आहेत. भारतातील अन्न प्रक्रिया क्षेत्रातील भागधारकांचा हा सर्वात मोठा मेळावा असेल.
वर्ल्ड फूड इंडियाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. उद्घाटन सत्राला रशियन फेडरेशनचे उपपंतप्रधान दिमित्री पात्रुशेव, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान आणि अन्न प्रक्रिया उद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू उपस्थित राहतील.
वर्ल्ड फूड इंडिया हे केवळ एक व्यापारविषयक प्रदर्शन नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली खाद्यपदार्थ क्षेत्रातील नवोन्मेष, गुंतवणूक आणि शाश्वततेत भारताला जागतिक केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी एक परिवर्तनकारी व्यासपीठ आहे, असे या कार्यक्रमाबद्दल बोलताना चिराग पासवान यांनी सांगितले. या कार्यक्रमातून शाश्वत, सर्वसमावेशक आणि भविष्यासाठी सज्ज अन्न व्यवस्थेप्रती आपली वचनबद्धता दिसून येते तसेच जगाचे खाद्य भांडार म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट होते, असे ते म्हणाले.
वर्ल्ड फूड इंडिया 2025 ची ठळक वैशिष्ट्ये :
- भागीदार देश : न्यूझीलंड आणि सौदी अरेबिया
- फोकस देश : जपान, युएई, व्हिएतनाम आणि रशिया
- सहभाग: 1700 पेक्षा अधिक प्रदर्शक, 500 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि 100 हून अधिक राष्ट्रांचे प्रतिनिधी
- 45 हून अधिक ज्ञानवर्धक सत्रे- यामध्ये विषयानुरूप चर्चा, राज्य आणि देश यांच्याशी निगडित परिषदा आणि जागतिक कृषी तसेच अन्नपदार्थ क्षेत्रातील 100 हुन अधिक नेत्यांसह CXO गोलमेज परिषदा यांचा समावेश आहे.
इतर समांतर कार्यक्रम :
- तिसरी जागतिक खाद्य नियामक शिखर परिषद - भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) - जागतिक अन्न सुरक्षा मानकांमध्ये एकसंधता राखणे.
- 24वा भारत आंतरराष्ट्रीय सागरी खाद्य महोत्सव (SEAI) - भारताच्या सागरी खाद्य निर्यात क्षमतेवर प्रकाश टाकण्यासाठी
- रिव्हर्स बायर सेलर बैठक (APEDA) - 1000 हून अधिक खरेदीदार होतील सहभागी
- विशेष प्रदर्शने: आंतरराष्ट्रीय मंडप, राज्य आणि केंद्रीय मंत्रालयांचे मंडप, पाळीव प्राण्यांचे अन्न मंडप, तंत्रज्ञान मंडप आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा स्टार्ट-अप नवोन्मेष मंडप
यावर्षीची आवृत्तीची खालील पाच प्रमुख स्तंभांवर रचलेली आहे:
- शाश्वतता आणि निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनावर आधारित अन्नप्रक्रिया
- जागतिक अन्न प्रक्रिया केंद्र म्हणून भारत
- अन्न प्रक्रिया, उत्पादने आणि पॅकेजिंग तंत्रज्ञानातील सीमा
- पोषण, आरोग्य आणि निरामयतेसाठी अन्न
- भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारे पशुधन आणि सागरी उत्पादने
याशिवाय चिराग पासवान यांच्या हस्ते "अन्नप्रक्रियेशी निगडित विविध संकल्पनांविषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न" या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. या क्षेत्रातील उद्योगधुरीण आणि हितधारकांशी सल्लामसलत करुन हे पुस्तक लिहिले असून त्याद्वारे प्रक्रियाकृत अन्नाविषयी असलेल्या भ्रामक गोष्टी दूर करता येतील तसेच ग्राहकांना माहितीपूर्ण निवड करता यावी यादृष्टीने विज्ञानावर आधारित माहिती दिली जाईल.
या महामेळाव्याचे आयोजन यशस्वी करण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, मत्स्यव्यवसाय विभाग, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, एमएसएमई मंत्रालय, अपेडा, एमपीईडीए आणि कमोडिटी बोर्ड यासह विविध सरकारी मंत्रालये, विभाग आणि संघटना यांनी दिलेल्या मौल्यवान योगदानाबद्दल मंत्रालयाने प्रशंसा केली.
वर्ल्ड फूड इंडिया 2025, अन्न प्रक्रियेतील भारताचा परिवर्तनीय प्रवास उलगडणारे तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि गुंतवणुकीच्या संधींना चालना देणारे एक महत्त्वाचे जागतिक व्यासपीठ बनण्याचे आश्वासन देते.

CMU0.jpeg)


शिल्पा पोफाळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2170100)