सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
सेवा पर्वानिमित्त, खादी महोत्सव 2025 चे भव्य उद्घाटन
Posted On:
21 SEP 2025 1:41PM by PIB Mumbai
- केव्हीआयसीचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसी येथून 17 सप्टेंबर रोजी खादी महोत्सव 2025 चे उद्घाटन केले. खादी महोत्सव 2025 हा देशभरात 17 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर 2025 दरम्यान साजरा केला जाणार आहे
- 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान, मुंबईतील केव्हीआयसी मुख्यालयात स्वदेशी व स्वच्छता या संकल्पनांना समर्पित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
- 18 सप्टेंबर रोजी मुंबईतील जुहू समुद्र किनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेचे नेतृत्व केव्हीआयसीच्या अध्यक्षांनी केले. केव्हीआयसीचेअध्यक्ष म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘हर घर स्वदेशी, घर-घर स्वदेशी’ या मंत्राचा प्रसार करून केव्हीआयसी प्रत्येक घरापर्यंत ‘स्वदेशी क्रांती’ पोहोचवत आहे.”
सेवा पर्वानिमित्त, खादी आणि ग्रामोद्योग आयोग ( केव्हीआयसी) देशभरात 17 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर 2025 दरम्यान खादी महोत्सव 2025 आयोजित करीत आहे. यामागे उद्दिष्ट आहे – “हर घर स्वदेशी, घर-घर स्वदेशी” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे.
17 सप्टेंबर रोजी केव्हीआयसीचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसी येथून महोत्सवाचे उद्घाटन केले. त्यानंतर 18 व 19 सप्टेंबर रोजी मुंबई येथील केव्हीआयसी मुख्यालयात स्वदेशी, स्वच्छता आणि आत्मनिर्भरता यांना लोकसहभागाशी जोडणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन झाले.
सेवा पर्व 2025 च्या अनुषंगाने, 18 सप्टेंबर रोजी जुहू समुद्र किनारा, मुंबई येथे ‘क्लीनलीनेस ड्राईव्ह-05’ चे आयोजन करण्यात आले. या अभियानाचे नेतृत्व केव्हीआयसी अध्यक्ष मनोज कुमार यांनी केले. त्यांनी संदेश दिला – “स्वच्छतेद्वारे राष्ट्रसेवा करा.” तसेच अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना व स्थानिक नागरिकांना स्वच्छ व हिरवेगार भारत घडविण्यासाठी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले. या अभियानात शेकडो केव्हीआयसी अधिकारी व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले.

19 सप्टेंबर रोजी विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना केव्हीआयसी अध्यक्षांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व पारितोषिके प्रदान करण्यात आली.
यावेळी बोलताना मनोज कुमार म्हणाले की, "हर घर स्वदेशी, घर घर स्वदेशी" या मंत्राच्या माध्यमातून, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, केव्हीआयसी प्रत्येक नागरिकापर्यंत स्वदेशीची क्रांती पोचवत आहे. पुढे ते म्हणाले की पंतप्रधानांच्या "सेवा ही संकल्प, राष्ट्र प्रथम ही प्रेरणा" (सेवा हा आपला संकल्प, राष्ट्र प्रथम हीच प्रेरणा) या आवाहनातून प्रेरणा घेत केव्हीआयसी राष्ट्र सेवेच्या मार्गावर प्रगतीपथावर जात आहे. खादीचे महत्त्व अधोरेखित करता, ते म्हणाले, "एकेकाळी प्रसिद्ध ब्रँडला आमचे प्राधान्य होते, मात्र आता खादी आपल्यासाठी प्राधान्य झाली आहे. खादी आता केवळ कापड राहिले नसून; महात्मा गांधींच्या कल्पनेतल्या 'आत्मनिर्भर भारता'चा तो भक्कम पाया आहे.

श्री. मनोज कुमार यांनी असेही सांगितलं की, खादी केवळ आता शेती ते फॅशन पर्यंत मर्यादित न राहाता, इथर सर्व ग्रामीण कारागीरांना जोडून "हर घर स्वदेशी" या खऱ्या भावनेतून विकसित झाली आहे. गेल्या ११ वर्षांत, खादीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे आणि त्या व्यवसायाने ₹1.70 लाख कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. आदरणीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली, केव्हीआयसी कुटीर उद्योगांचा भक्कम आधारस्तंभ म्हणून उदयास आला आहे, जागतिक स्तरावर स्वदेशीला पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्नही केले जात आहेत. पंतप्रधानांचे शब्द उद्धृत करत - "आपल्या राष्ट्रासाठी आपण त्रास सहन करू, पण आत्मनिर्भर भारत निर्माण करू"- त्यांनी केव्हीआयसीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.


या प्रसंगी, केव्हीआयसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. रूप राशी म्हणाल्या की, 'सेवा पर्व' सारख्या पुढाकारामुळे आणि जीएसटीच्या फायद्यांमुळे तरुण पिढीला, खादी आणि स्वदेशी यांचे मूल्य खऱ्या अर्थाने समजले आहे. खादी हे केवळ कापड नसून, कारागिरांच्या समर्पण आणि लोकांच्या सामूहिक पाठिंब्याचे प्रतीक आहे, जे आत्मनिर्भरतेची भावना आणि सांस्कृतिक ओळख यांना मूर्त रूप देते. प्रत्येक बालक खादीचा दूत बनू शकते, यावरही त्यांनी भर दिला.
खादी महोत्सवात, मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 'व्होकल फॉर लोकल' या भावनेतून स्वदेशीशी कटिबद्ध राहाण्याची प्रतिज्ञा केली. पारंपरिक खादी पेहरावात आलेल्या अधिकाऱ्यांनी 'खादी यात्रेत' पायी चालत सहभाग घेतला. तसेच, यावेळी स्वदेशी रांगोळी स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती, त्यामध्येही सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला.

***
शैलेश पाटील / नितीन गायकवाड / विजयालक्ष्मी साळवी-साने / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2169254)