आयुष मंत्रालय
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयुर्वेद दिवस 2025 च्या प्रमुख उपक्रमांची माहिती देण्यासाठी वार्ताहर परिषदेला केले संबोधित
Posted On:
19 SEP 2025 3:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2025
आयुष मंत्रालयाने आज नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयुर्वेद दिवस 2025 च्या संदर्भात माहिती देण्यासाठी एक वार्ताहर परिषद आयोजित केली. आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री, प्रतापराव जाधव, यांनी माध्यमांना संबोधित केले आणि 10 व्या आयुर्वेद दिवसासाठी आखलेल्या प्रमुख उपक्रमांची माहिती दिली. गोव्याच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत(एआयआयए) 23 सप्टेंबर 2025 रोजी 10 वा आयुर्वेद दिवस साजरा होणार आहे.
आयुर्वेदाची एक समग्र, परिणामसिद्ध आणि पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत आरोग्यसेवा प्रणाली म्हणून असलेली क्षमता आयुष राज्यमंत्र्यांनी अधोरेखित केली. आयुर्वेद केवळ एक वैद्यकीय शास्त्र नाही, तर ती एक जीवनशैली आहे जी व्यक्तीला पर्यावरणाशी एकरूप करते, असे त्यांनी सांगितले. आयुषवरील पहिल्या अखिल भारतीय एनएसएसओ सर्वेक्षणाचा संदर्भ देत, जाधव यांनी ग्रामीण आणि शहरी भारत या दोन्ही ठिकाणी आयुर्वेदाला मिळालेल्या व्यापक पसंतीवर भर दिला, जिथे ती सर्वाधिक वापरली जाणारी उपचार पद्धती ठरली आहे.
भारत सरकारने 23 सप्टेंबर ही आयुर्वेद दिवसाची निश्चित वार्षिक तारीख अधिसूचित करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे, ज्यामुळे तिला सार्वत्रिक कॅलेंडरमध्ये स्वतःचे स्थान मिळाले आहे. या वर्षीची ‘जनतेसाठी आणि आपल्या ग्रहासाठी आयुर्वेद’ ही संकल्पना जागतिक आरोग्य आणि पर्यावरणाच्या कल्याणासाठी आयुर्वेदाला एक शाश्वत, समावेशक तोडगा म्हणून पुढे आणण्यासाठी भारताची कटिबद्धता दर्शवते, असे त्यांनी सांगितले.
आयुर्वेद दिवस 2025 साजरा करण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुरू केलेल्या अनेक लोक-केंद्रित उपक्रमांचीही प्रतापराव जाधव यांनी घोषणा केली. यात विद्यार्थ्यांसाठी "लिटिल स्टेप्स टू वेलनेस", खोट्या जाहिरातींना तोंड देण्यासाठी "लीड द मिसलिड", "लठ्ठपणा टाळण्यासाठी आयुर्वेद आहार" आणि वनस्पती आणि पशु आरोग्यासाठी आयुर्वेदावरील कार्यक्रमांचा समावेश आहे. "कर्करोग निगा एकात्मिकरण", "आयुर्वेदाचे डिजिटल परिवर्तन", आणि "संहिता से संवाद" ही या ग्रहावरील निरामयतेला प्रोत्साहन देण्यासाठीची माध्यम भागीदारी यावरही विशेष लक्ष दिले जाणार आहे.
यावेळी, AIIA चे संचालक डॉ. प्रदीप कुमार प्रजापती, यांनी आगामी कार्यक्रमांचे तपशील सादर केले. 10व्या आयुर्वेद दिवस सोहळ्यात जागरूकता कार्यक्रम, डिजिटल मोहिम, आंतर-मंत्रालयीन सहयोग, राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार 2025 आणि लठ्ठपणा प्रतिबंध, कर्करोग जागरूकता, विद्यार्थी जागरूकता, प्राणी आणि वनस्पती आरोग्य आणि डिजिटल एकीकरण यांसारख्या उप-संकल्पनांचा समावेश असेल. "मायगव्ह" आणि "मायभारत" प्लॅटफॉर्मवरील "आय सपोर्ट आयुर्वेद" सारख्या उपक्रमांद्वारे सार्वजनिक सहभागालाही प्रोत्साहन दिले जाईल, अशी माहिती प्रजापती यांनी दिली.


निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168471)