संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

1965 च्या युद्धाचे हिरक महोत्सवी जयंती : भारताच्या पाकिस्तानवरील विजयानिमित्त संरक्षणमंत्र्यांनी युद्धात सहभागी सैनिक आणि युद्धवीरांच्या कुटुंबियांशी साधला संवाद

Posted On: 19 SEP 2025 1:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2025

भारताने पाकिस्तानवर 60 वर्षांपूर्वी मिळवलेल्या विजयाच्या हिरक महोत्सवी जयंतीनिमित्त, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 19 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्ली इथल्या साऊथ ब्लॉकमध्ये भारतीय लष्कराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, 1965 च्या युद्धातील शूर सैनिक आणि वीरमरण आलेल्या योद्ध्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी उपस्थितांनाही संबोधित केले. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या आणि भारताचा विजय सुनिश्चित करणार्‍या शूर जवानांना त्यांनी आपल्या संबोधनातून आदरांजली वाहिली. घुसखोरी, गनिमी कावा आणि अचानक हल्ले करून भारताला घाबरवता येईल, असे पाकिस्तानला वाटले होते. पण प्रत्येक भारतीय सैनिक राष्ट्र, सार्वभौमत्व आणि अखंडतेशी कधीही तडजोड करणार नाही, आणि या भावनेनेच ते मातृभूमीची सेवा करतात याची कल्पना त्यांना नव्हती असे ते म्हणाले.

यावेळी राजनाथ सिंह यांनी भारताच्या जवानांनी असळ उत्तरची लढाई, छाविंडाची लढाई आणि फिलोराच्या लढाईमध्ये दाखवलेल्या अतुलनीय शौर्य आणि देशभक्तीचाही गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांनी परमवीर चक्र विजेते कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद यांच्या अदम्य धैर्य आणि शौर्याचाही विशेष उल्लेख केला. असळ उत्तरच्या लढाईत मशीन गन आणि रणगाड्यांच्या गोळीबारात त्या़नी शत्रूचे अनेक रणगाडे नष्ट केले, याच प्रयत्नांत त्यांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती त्यांनी दिली. शौर्य हे शस्त्राच्या आकारावर अवलंबून नसते, ते हृदयाच्या ताकदीवर अवलंबून असते ही शिकवण शूर अब्दुल हमीद यांनी आपल्याला पराक्रमातून दिली, अत्यंत कठीण परिस्थितीतही, धैर्य, संयम आणि देशभक्ती यांच्या संयोगाने अशक्यही शक्य करता येते ही शिकवणही आपल्याला त्यांच्या पराक्रमातून मिळते असे ते म्हणाले.

देश स्वतःच स्वतःचे भविष्य घडवतो ही बाब भारतीयांनी वेळोवेळी सिद्ध करून दाखवली असल्याचे त्यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर हे याचे ठळक उदाहरण असल्याचे ते म्हणाले. पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ला आजही आपल्या हृदयाला वेदना आणि दुःख देतो. त्या हल्ल्याने आपल्याला हादरवून सोडले, पण आपला धीर खचला नाही ही बाब त्यांनी नमूद केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना त्यांनी विचारही केला नव्हता असा धडा शिकवण्याची शपथ घेतली. ऑपरेशन सिंदूरने आपल्या शत्रूंना आपण किती मजबूत आहोत हे दाखवून दिले. आपल्या सैन्याने हे अभियान समन्वय आणि धैर्याने पार पाडले. हा विजय आता आपल्यासाठी अपवाद राहिलेला नाही, ती आपली सवय बनली आहे. आपण ही सवय नेहमी जपली पाहिजे असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, वेस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार, दिल्ली क्षेत्राचे जनरल कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट जनरल भावनीश कुमार, इतर वरिष्ठ अधिकारी, निवृत्त सैनिक, शौर्य पुरस्कार विजेते आणि 1965 च्या युद्धातील वीरांचे कुटुंबीय उपस्थित होते.

सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2168458)