गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थविरोधी दलांच्या (एएनटीएफ) प्रमुखांच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले
केंद्रीय गृहमंत्र्यांनी अंमली पदार्थ नियंत्रण मंडळाच्या (एनसीबी)अंमली पदार्थ विल्हेवाट मोहिमेची सुरुवात केली आणि 11 ठिकाणी 4,800 कोटी रुपये किंमतीच्या 1.37लाख किलो अंमली पदार्थ नष्ट केले
Posted On:
16 SEP 2025 9:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थविरोधी दलांच्या (एएनटीएफ) प्रमुखांच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनपर सत्राला संबोधित केले. या प्रसंगी अमित शाह यांनी अंमली पदार्थ नियंत्रण मंडळाचा (एनसीबी)वार्षिक अहवाल-2024 जारी केला आणि अंमली पदार्थ विल्हेवाट मोहिमेची ऑनलाइन सुरुवात केली. दिनांक 16 आणि 17 सप्टेंबर, 2025 या काळात आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय परिषदेत 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या एएनटीएफ प्रमुखांसह इतर संबंधित सरकारी विभागांतील अधिकारी सहभागी झाले आहेत. आज झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय ग्रह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक आणि एनसीबीच्या महासंचालकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना, केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अंमली पदार्थ मुक्त भारताच्या निर्मितीचा निर्धार आणि अंमली पदार्थविरोधी लढाई तेव्हाच यशस्वी होऊ शकते, जेव्हा एनसीबी, केंद्रीय गृह मंत्रालय(एमएचए), केंद्र आणि राज्य सरकारांचे सर्व विभाग तसेच एएनटीएफ पथके त्या निर्धाराला स्वतःचा निर्धार मानतील.पंतप्रधान मोदी यांनी 2047 पर्यंत महान आणि विकसित भारताच्या निर्मितीची कल्पना केली आहे आणि ही कल्पना वास्तवात साकार करण्यासाठी तरुण वर्गाचे अंमली पदार्थांपासून संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यावर शाह यांनी अधिक भर दिला. ते म्हणाले की तरुण हे कोणत्याही देशाचा पाया असतात आणि जर भविष्यातील पिढ्याच खिळखिळ्या झाल्या तर देश त्याच्या मार्गापासून भरकटेल.
सुमारे 10 कोटी व्यक्ती आणि 3 लाख शैक्षणिक संस्थांच्या सहभागासह देशभरातील 372 जिल्ह्यांमध्ये अंमली पदार्थ-मुक्त भारत अभियान सध्या सक्रीय आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. मात्र हे पुरेसे नसून, सदर अभियान देशातील प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक शैक्षणिक संस्थेपर्यंत पोहोचले पाहिजे असे त्यांनी ठासून सांगितले. केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की अलीकडच्या वर्षांमध्ये एनसीबीच्या पथकांनी अंमली पदार्थांच्या जाळ्याची माहिती देणारा तक्ता तयार केला आहे आणि त्याचा उपयोग राज्यांना होऊ शकेल. त्यासोबतच, देशभरातील विद्यापीठे आणि संस्थांमध्ये अंमली पदार्थ-मुक्त परिसर अभियान राबवण्यात येत आहे, तसेच डार्कनेट आणि क्रिप्टोकरन्सी यांच्याशी संबंधित प्रशिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि मानस (मादक पदार्थ निषेध व सूचना केंद्र) हेल्पलाईनच्या वापराचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांच्या अवैध वाहतूक प्रतिबंधक (पीआयटीएनडीपीएस) कायद्याखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए)18 प्रकरणे नोंदवली असून त्यासंदर्भात सर्वंकष तपासणी सुरु केली आहे हे शाह यांनी नमूद केले. त्याच प्रमाणे एनसीबीने देखील राज्यांकडून प्राप्त झालेल्या 35 पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये सर्व बाजूंनी तपास सुरु केला आहे. ते पुढे म्हणाले की, प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून हजारो लोकांना यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे.

अंमली पदार्थ विरोधी कृती दल (ANTF) आणि राष्ट्रीय अंमली पदार्थ समन्वय पोर्टल (NCORD) हे अंमली पदार्थ मुक्त भारत मोहिमेत निर्णायक भूमिका बजावतात, यावर अमित शाह यांनी भर दिला. या मोहिमेचे यश प्रत्येक जिल्हा, जिल्ह्यातील पोलिस आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेवर अवलंबून आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. या मोहिमेत धार्मिक नेते आणि युवा संघटनांना सहभागी करून घेण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. जिल्हास्तरीय राष्ट्रीय अंमली पदार्थ समन्वय बैठकांची संख्या वाढली असली तरी, देशातील 272 जिल्ह्यांनी राष्ट्रीय अंमली पदार्थ समन्वयाची आजवर एकही बैठक घेतलेली नाही, असे शहा यांनी सांगितले. सर्व अंमली पदार्थ विरोधी कृती दल प्रमुखांनी या बैठका आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे आणि या बैठकींच्या आयोजनाची खात्री करण्यासाठी मुख्य सचिवांशी समन्वय साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
येत्या काळात सिंथेटिक अंमली पदार्थ आणि प्रयोगशाळांचा ट्रेंड वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिला. प्रत्येक राज्यातील अंमली पदार्थ विरोधी कृती दल प्रमुखांना सतर्क राहण्याचे, अशा प्रयोगशाळा किंवा सिंथेटिक अंमली पदार्थ ओळखण्याचे आणि ते नष्ट करण्याचे आवाहन शहा यांनी केले. या क्षेत्रात गेल्या वर्षभरात झालेल्या लक्षणीय प्रगतीची दखल शाह यांनी घेतली परंतु अशा प्रयोगशाळा आणि अंमली पदार्थांची निर्मिती पूर्णपणे रोखण्याची गरज यावर त्यांनी भर दिला. जेव्हा अंमली पदार्थांची उपलब्धता संपेल तेव्हाच अंमली पदार्थाचे व्यसन असलेले लोक वैद्यकीय मदतीसाठी पुढे येतील, असेही त्यांनी सांगितले.

देशभरातील 11 ठिकाणी सुमारे 4,800 कोटी रुपये किमतीचे अंदाजे 1,37,917 किलोग्रॅम अंमली पदार्थ नष्ट करण्यात आल्याची माहिती अमित शहा यांनी दिली. पोलिसांच्या ताब्यात अंमली पदार्थ ठेवणे धोकादायक असल्याने प्रत्येक राज्यात दर तीन महिन्यांनी जप्त केलेले अंमली पदार्थ नष्ट करण्याची वैज्ञानिक परंपरा प्रस्थापित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. अंमली पदार्थांचा वापर या समस्येचे निराकरण करण्यासाठी ‘टॉप टू बॉटम’ आणि ‘बॉटम टू टॉप’ दृष्टिकोन आवश्यक आहे यावर शहा यांनी भर दिला. अंमली पदार्थ मुक्त भारत मोहिमेचे ध्येय आकडेवारी तयार करणे नाही तर असा भारत निर्माण करणे आहे जिथे अशी आकडेवारीच अनावश्यक असेल. हे केवळ ‘टॉप टू बॉटम’ आणि ‘बॉटम टू टॉप’ दृष्टिकोन स्वीकारून साध्य करता येऊ शकेल, असे ते म्हणाले.
शैलेश पाटील/संजना चिटणीस/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2167401)
Visitor Counter : 2