आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिलांचे आरोग्य आणि कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार राबवल्या जाणार असलेल्या आरोग्यसंपन्न महिला, सक्षम कुटुंब (स्वस्थ नारी सशक्त परिवार) या राष्ट्रीय आरोग्य अभियानात आयुष मंत्रालयही सहभागी होणार


महिलांसाठी आरोग्य विषयक तपासणी, मातृत्व विषयक आरोग्य सेवा, जीवनशैली विषयक समुपदेशन, योग आणि आयुष - आधारित उपचार आणि उपायांना बळकटी देणारे देशव्यापी अभियान

महिलांच्या सर्वांगीण आरोग्य सेवेसाठी राज्ये, केंद्रशासित प्रदेश, बचत गट आणि विविध संस्थाद्वारे समुदायांना एकत्र आणले जाणार

Posted On: 14 SEP 2025 10:40AM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राबवल्या जाणार असलेल्या आरोग्यसंपन्न महिला, सक्षम कुटुंब (स्वस्थ नारी सशक्त परिवार) या राष्ट्रीय आरोग्य अभियानात आयुष मंत्रालयही सहभागी होणार आहे. या अभियानाअंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची प्रशासने, आयुष संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था, उद्योग जगत आणि खाजगी क्षेत्र, विविध संघटना, स्वयंसेवी संस्था आणि सहकारी संस्थांच्या परस्पर सहकार्याने महिलांच्या आरोग्य संपन्नतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच विविध आजारांसंबंधी तपासणीसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

हे अभियान 16 दिवस राबवले जाईल. या अभियानाअंतर्गत मंत्रालयाच्या वतीने असंसर्गजन्य रोग  कर्करोग, ॲनिमिया, क्षयरोग आणि सिकल सेल या आजारांशी संबंधित आरोग्य विषयक तपासणी आणि चाचणी शिबिरांचे आयोजन केले जाईल. यासोबतच माता आणि बाल आरोग्य विषयक सेवा, पोषण आणि स्वच्छतेसंबंधी जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. सार्वजनिक आरोग्यासाठीच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने या अभियानाच्या काळात ऐच्छिक रक्तदान मोहीमही राबवली जाणार आहे. या अभियानांतर्गत महिला आणि मुलांमधील ॲनिमिया, असंसर्गजन्य रोग आणि बहुकोषीय अंडाशय विकार (पॉली सिस्टिक ओव्हेरियन डिसीज - PCOD) यांसारख्या आजारांवरच्या आयुष अंतर्गतच्या उपचार पद्धतींवरही भर दिला जाणार आहे.

या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत महिलांची आरोग्य संपन्नता आणि सक्षमीकरणावर भर दिला जाईल, यादृष्टीने जीवनशैलीविषयक समुपदेशन, योग सत्रे आणि प्रकृती परीक्षण विषयक उपक्रमांची विशेष दालने उभारली जाणार आहेत.  याशिवाय  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील शाळांमध्ये जागृतीपर शिबिरे, रेडिओ आणि दूरचित्रवाणीवर विशेष कार्यक्रम तसेच समाज माध्यमांवरच्या मोहीमा असे विविधांगी उपक्रम राबवून या अभियान अधिक व्यापक स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याचबरोबरीने नागरिकांना घरच्या घरीच करता येणारे उपचार आणि पोषणासंबंधीच्या संचाचे वाटपही केले जाईल, तर महिलांच्या आरोग्यविषयक कल्याणाच्यादृष्टीने सामान्य औषधी वनस्पती आणि आयुर्वेदिक चहाचे आरोग्यविषयक लाभ विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अधोरेखित केले जातील. या अभियानाअंतर्गत आयुर्वेदापासून प्रेरणा घेत आरोग्य कल्याण विषयक कार्यक्रम आणि योग - आधारित मनस्वास्थ्य विषयक आसनांच्या माध्यमातून कॉर्पोरेट बर्नआउटचा अर्थात ताणावर मात करण्यावरही भर दिला जाणार आहे.

या अभियानाकरता विविध समुदायांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने पंचायत स्तरावरील बचत गटांद्वारे जागरूकता रॅली आणि शपथ घेण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातील. या अभियानाअंतर्गत महिलांसाठी गर्भधारणेपासून ते उपशामक उपचारांपर्यंत (पॅलिएटिव्ह) सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध होतील याची सुनिश्चिती केली जाणार आहे. यासोबतच ॲनिमिया-मुक्त महिला, सुदृढ माता, तणावमुक्त महिला, हर्बल पोषण आणि हाडांचे आरोग्य यांसारख्या विषयांवरची आयुष आरोग्यविषयक उपयुक्त माहिती दररोज समाज माध्यमावरून सामायिक केली जाणार आहे. या माहितीचा महिलांना त्यांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक समस्या प्रभावीपणे सोडवण्यात मदत होणार आहे.

***

हर्षल अकुडे / तुषार पवार / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2166495) Visitor Counter : 2