कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ चा दुसरा टप्पा सुरू होणार
रबी पिकांसाठी 16 दिवसीय मोहीम 3 ते 18 ऑक्टोबर दरम्यान
‘राष्ट्रीय कृषी परिषद — रबी अभियान 2025 ’ दिल्लीत 15 आणि 16 सप्टेंबरला होणार
राज्यांच्या कृषी मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दोन दिवसीय परिषदेत रबी पिकांवर चर्चा
Posted On:
13 SEP 2025 5:41PM by PIB Mumbai
‘विकसित कृषी संकल्प अभियान’ च्या पहिल्या टप्प्याच्या प्रचंड यशानंतर, दुसरा टप्पा केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणार आहे. पूर्वी ही मोहीम खरीप पिकांवर केंद्रित होती, आणि आता रबी पिकांसाठी देशभरातील कृषी शास्त्रज्ञ या मोहिमेद्वारे गावांना भेट देतील, शेतकऱ्यांची भेट घेतील, आवश्यक माहिती देतील, त्यांच्या समस्या ऐकतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘लॅब टू लँड’ या घोषवाक्याची पूर्तता करण्यात महत्वाची भूमिका बजावतील. मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून, 15 सप्टेंबरपासून नवी दिल्लीतल्या पुसा परिसरात दोन दिवसीय ‘राष्ट्रीय कृषी परिषद — रबी अभियान 2025’ आयोजित करण्यात येत आहे.
रबी पिकांसाठीची ही दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद कृषी तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, धोरण निर्माते आणि देशभरातील राज्य सरकारांच्या वरिष्ठ प्रतिनिधींना सामाईक व्यासपीठ उपलब्ध करुन देईल. त्या ठिकाणी रबी 2025 -26 च्या पेरणी हंगामाशी संबंधित तयारी, उत्पादन लक्ष्य आणि धोरणांवर सखोल चर्चा होईल. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान असतील. या प्रसंगी अनेक राज्यांच्या कृषी मंत्र्यांसह, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव, आयसीएआरचे महासंचालक आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि राज्यांमधील इतर अधिकाऱ्यांचा सहभाग असेल.
केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या निर्देशानुसार रबी परिषद पहिल्यांदाच दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेत शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याच्या आणि कृषी तसेच रबी हंगामाच्या पिकांशी संबंधित आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टिकोनातून विविध विषयांवर चर्चा होईल. पहिल्या दिवशी, केंद्रीय आणि राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांमध्ये रबी पिकांशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होईल16 सप्टेंबरला सर्व राज्यांचे कृषी मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री आणि राज्य मंत्री यांच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान आणि बियाणे शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यावर सखोल आढावा आणि विचारमंथन होईल.
या कार्यक्रमात विविध विषयांवर समांतर तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात येईल. तज्ज्ञ, शास्त्रज्ञ व राज्यांचे प्रतिनिधी आपली सादरीकरणे करतील आणि खुल्या चर्चेतून व्यावहारिक उपाय शोधले जातील. खालील विषयांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल :
हवामान लवचिकता, मृदा आरोग्य व संतुलित खतांचा वापर — उत्तम मृदा व्यवस्थापन व संतुलित पोषण यावर भर.
उच्च प्रतीचे बियाणे, खते, कीटकनाशके व कृषि मागोवा प्रणाली — अचूक कृषि इनपुट्स व डिजिटल देखरेख.
बागायती क्षेत्राचे विविधीकरण — उत्पन्न वाढ व निर्यात क्षमतेवर केंद्रित धोरणे.
परिणामकारक विस्तार सेवा व कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके) यांची भूमिका — शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञान व ज्ञानाची देणगी.
केंद्र प्रायोजित योजनांचे समन्वयन — योजनांची अधिक चांगली सांगड व राज्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण.
नैसर्गिक शेती — कमी खर्चिक व पर्यावरणपूरक पद्धती.
पिकांचे विविधीकरण, विशेषत: डाळी व तेलबिया यावर भर — रब्बी हंगामात डाळी व तेलबिया पिकांचे क्षेत्रफळ व उत्पादन वाढविण्याच्या धोरणांद्वारे आत्मनिर्भरता व पोषण सुरक्षा.
रब्बी पिकांच्या काळातील खत उपलब्धतेची स्थिती — वेळेवर पुरवठा व वितरण व्यवस्थेचा आढावा.
एकात्मिक शेती पद्धती.
परिषदेत विविध राज्यांतील यशोगाथा व उत्कृष्ट पद्धती सामायिक केल्या जातील जेणेकरून त्यांची अंमलबजावणी इतर राज्यांमध्ये करता येईल. याशिवाय हवामान अंदाज, खत व्यवस्थापन, कृषि संशोधन व तांत्रिक हस्तक्षेप यांसंबंधित विषयांवर तज्ज्ञ आपले विचार मांडतील.
ही परिषद रब्बी 2025-26 हंगामासाठी कृती आराखडा व उत्पादन धोरणे ठरविण्यास मार्गदर्शक ठरणार असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शाश्वत कृषि प्रणाली सुनिश्चित करणे आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सातत्याने पावले उचलत आहे. शेतकरी बंधू-भगिनींचे उत्पन्न वाढविण्यास सरकार कटिबद्ध आहे. पंतप्रधानांच्या ‘लॅब टू लँड’ या दृष्टीकोनातूनच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह यांनी खरीप हंगामासाठी विकसित कृषि संकल्प अभियान सुरू केले, ज्याअंतर्गत त्यांनी 29 मे ते 12 जून 2025 दरम्यान विविध राज्यांतील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.
मागीलप्रमाणेच यावेळीही देशातील शेतकरी बंधू-भगिनी या अभियानाबद्दल अत्यंत उत्साही व आशावादी आहेत. पुन्हा एकदा अशी अपेक्षा आहे की हे अभियान केवळ सैद्धांतिक मर्यादेत न राहता प्रत्यक्ष कार्यक्षमतेकडे नेईल, ज्यामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांपर्यंत पोहोच साध्य होईल आणि कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल.
***
निलिमा चितळे / निखिलेश चित्रे / गजेंद्र देवडा / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2166368)
Visitor Counter : 2