अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
वर्ल्ड फूड इंडिया 2025 च्या चौथ्या आवृत्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Posted On:
12 SEP 2025 8:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2025
जागतिक स्तरावरील खाद्यपदार्थ महोत्सव, वर्ल्ड फूड इंडिया 2025 च्या चौथ्या आवृत्तीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6:00 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे. या उद्घाटन समारंभाला केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान देखील उपस्थित राहणार आहेत.
केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया मंत्रालयाने आयोजित केलेला वर्ल्ड फूड इंडिया 2024 कार्यक्रम 25 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान होणार आहे.
वर्ल्ड फूड इंडियाच्या मागील आवृत्त्यांच्या उल्लेखनीय यशानंतर यंदाची चौथी आवृत्ती देखील एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून उदयाला येईल, जी धोरणकर्ते, औद्योगिक जगतातील नेतृत्व, उद्योजक, गुंतवणूकदार, संशोधक आणि इतर भागधारकांना भारतातील जलद गतीने वाढणाऱ्या अन्न प्रक्रिया परिसंस्थेत जोडण्यासाठी, सहयोग करण्यासाठी आणि संधी शोधण्यासाठी एकत्र आणेल. या कार्यक्रमात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शक सहभागी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे हे जागतिक अन्न परिसंस्थेचे सर्वात व्यापक प्रदर्शन बनेल.
या वर्षी, न्यूझीलंड आणि सौदी अरेबिया यांना भागीदार देश म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर जपान, युएई, व्हिएतनाम आणि रशिया हे फोकस देश म्हणून सहभागी होतील. त्यांच्या सहभागामुळे भागीदारी अधिक दृढ होऊन, ज्ञानाचे आदानप्रदान होईल तसेच अन्नप्रक्रिया क्षेत्रातील व्यापार आणि गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होतील.
या कार्यक्रमात उच्चस्तरीय ज्ञानाधारित सत्रे आणि पॅनल चर्चा यांचा अंतर्भाव असून त्यामध्ये जागतिक विचारवंत, धोरणकर्ते आणि उद्योगजगतातील तज्ञ सहभागी होणार आहेत. अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग, यंत्रसामग्री, शीत साखळी आणि संबंधित उद्योगांमधील नवीनतम नवकल्पना, तंत्रज्ञान आणि उपायांवर प्रकाश टाकणारे क्षेत्रीय प्रदर्शन, धोरणात्मक भागीदारी आणि सहकार्य निर्माण करण्यासाठी डिझाइन केलेले B2B अर्थात व्यवसाय ते व्यवसाय आणि B2G म्हणजे व्यवसाय ते सरकार अशा प्रकारच्या नेटवर्किंग संधी यांचा देखील समावेश असेल.
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2166140)
Visitor Counter : 2