शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या हस्ते दुबईमध्ये आयआयएम अहमदाबादच्या पहिल्या परदेशी शाखेची सुरुवात


आयआयएम अहमदाबादची दुबई शाखा ही शिक्षणाच्या जागतिकीकरणाच्या दिशेने एक मोठी झेप - धर्मेंद्र प्रधान

Posted On: 11 SEP 2025 10:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2025

भारतातील आघाडीची व्यवसाय शिक्षण संस्था असलेल्या अहमदाबाद इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादच्या - IIMA) पहिल्या परदेशी शाखेचे (campus) आज दुबईचे युवराज, उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री,शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उद्घाटन समारंभाला भारताचे  शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान  उपस्थित होते.

 

धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. आयआयएम अहमदाबादच्या दुबई शाखेचे उद्घाटन दुबईचे युवराज, महामहिम शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद  अल मकतूम यांच्या हस्ते होणे हा एक मोठा सन्मान असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पानुसार, भारताच्या शिक्षणाच्या जागतिकीकरणाच्या दिशेने ही एक मोठी झेप असल्याचेही त्यांनी सांगितले. आयआयएम अहमदाबादची दुबई शाखा भारतातील सर्वोत्तम गोष्टी जगासमोर घेऊन जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आज, दुबईने आयआयएम अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय शाखेला स्थान देऊन विचाराने भारतीय आणि स्वरुपाने जागतिक या मूल्याला एक आदर्श व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याचे ते म्हणाले. यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील ज्ञानाच्या क्षेत्रातील परस्पर सहकार्यात एक गौरवशाली अध्याय जोडल्याबद्दल युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचे आभार मानले.

यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी संयुक्त अरब अमिरातीचे उच्च शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधन कार्यवाहक मंत्री, डॉ. अब्दुल रहमान अब्दुल मन्नान अल अवार यांचीही भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांनी उच्च शिक्षणातील द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला आणि ज्ञान क्षेत्रविषयक दुवा अधिक बळकट करण्यावर तसेच ज्ञान, नवोन्मेष आणि संशोधन यांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा एक महत्त्वाचा भाग बनवण्यावर सहमती व्यक्त केली.

यानंतर, धर्मेंद्र प्रधान यांनी दुबईमधील मणिपाल विद्यापीठाच्या शाखेलाही भेट दिली, या भेटीदरम्यान त्यांनी सिम्बॉयसिस, बिट्स  पिलानी (BITS Pilani), एमआयटी (MIT), ॲमिटी (Amity) आणि इतर भारतीय उच्च शिक्षण संस्थांच्या प्राचार्यांसोबत गोलमेज चर्चा (roundtable discussion) केली.

धर्मेंद्र प्रधान यांनी संयुक्त अरब अमिरातीमधील 109 भारतीय अभ्यासक्रम (Indian Curriculum) असलेल्या शाळांच्या प्राचार्यांशी संवाद साधला. आखाती सहकार्य परिषदेतील  (GCC) इतर देशांमधील सीबीएसई (CBSE) शाळांचे आणि जगभरातील सर्व सीबीएसई शाळांचे प्राचार्य या बैठकीत आभासी पद्धतीने सहभागी झाले होते. यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी संयुक्त अरब अमिरातीमधील 12 शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि सर्जनशीलता वृद्धींगत करण्यासाठी अटल टिंकरिंग लॅब्स सुरू केल्या जाणार असल्याची घोषणा केली.

दुबईमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या एक पेड माँ के नाम 2.0 या मोहिमेअंतर्गत संयुक्त अरब अमिरातीचा राष्ट्रीय वृक्ष असलेल्या घाफ (Ghaf) वृक्षाचे रोपटेही लावले.

सोनाली काकडे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


  


(Release ID: 2165856) Visitor Counter : 2
Read this release in: English , Gujarati , Odia , Malayalam