आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डेंग्यू आणि हिवतापाच्या प्रतिबंधासाठी राज्यांच्या उपाययोजनांना गती देण्याच्या दृष्टीने केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी सद्यस्थितीचा आढावा घेतला
आगामी महिन्यांमध्ये सतर्क राहण्याचा सर्व मुख्यमंत्र्यांना सल्ला, प्रतिबंधात्मक उपायांची व्याप्ती वाढवण्यासोबतच डेंग्यू आणि हिवतापाच्या नियंत्रणासाठी जनजागृती करण्याचे आवाहन
राज्ये , केंद्रशासित प्रदेशांना 20 दिवसांच्या आत उपाययोजना व जनजागृती वाढविण्याच्या सूचना
देशातील हिवतापाचे प्रमाण कमी करण्यात भारताला मोठे यश, 2030 पर्यंत हिवतापाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट
Posted On:
11 SEP 2025 9:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2025
केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी 10 सप्टेंबर 2025 रोजी एका बैठकीत देशातील डेंग्यू आणि हिवताप (मलेरिया) या आजारांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. राज्यांनी सुरू केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्याच्या उद्देशाने हा आढावा घेण्यात आला. या बैठकीला केंद्रिय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीत नड्डा यांनी डेंग्यू व हिवताप नियंत्रणाच्या कामातील प्रमुख समस्या आणि सद्यस्थिती जाणून घेतली. प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय आणखी तीव्र करण्याचे आवाहन त्यांनी राज्यांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि समुदायांना केले. विशेषतः अधिक जोखमीच्या काळात सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी तसेच डासांमुळे होणाऱ्या या आजारांचे प्रमाण कमी करण्यात मिळविलेले यश कायम राखण्याचे आवाहन त्यांनी केले.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना याबाबत सल्ला दिला आहे. यामध्ये आगामी काळात सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपायांची व्याप्ती वाढविण्याचे तसेच डेंग्यू आणि हिवतापाच्या प्रभावी नियंत्रणासाठी जनजागृती उपक्रम वाढविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या आजारांवर मात करण्यासाठी तत्काळ समन्वयाने कृती करण्याची गरज आहे या मुद्द्यावर नड्डा यांनी भर दिला. राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून आढावा घ्यावा आणि 20 दिवसांत कृती आराखडा तयार करावा अशी सूचना त्यांनी केली. महानगरपालिका, पंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी जनजागृती मोहीम तीव्र करावी. केंद्र सरकारच्या अखत्यारितील रुग्णालयांसह सर्व रुग्णालयांनी पुरेसा औषधसाठा, निदान सुविधा, रुग्णांसाठी खाटा उपलब्ध असल्याची खातरजमा करावी तसेच परिसर डासमुक्त राहील याकडे लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी केल्या.
अलीकडे झालेल्या पावसामुळे साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होत असल्याने, राज्ये आणि स्थानिक संस्थांना कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढवण्यास सांगितले गेले आहे. समुदाय सहभाग आणि वैयक्तिक संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कठोर उपाययोजना अंमलात आणणे आणि सामाजिक माध्यमांद्वारे जनजागृती करणे सुरूच राहील.
डेंग्यूच्या परिस्थितीचे बारकाईने अवलोकन करण्यासाठी आणि आगाऊ तयारी सुनिश्चित करण्यासाठी विशेष करून दिल्ली आणि एनसीआर परीसरासाठी एक उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मलेरियाविरूद्ध दोन हात करण्यात,भारताने लक्षणीय प्रगती केली आहे,असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अधोरेखित केले. 2015 ते 2024 दरम्यान देशात मलेरियाच्या प्रकरणांमध्ये 78% पेक्षा आणि मलेरियाशी संबंधित मृत्यूंमध्ये जवळजवळ 78% घट झाली आहे. शिवाय, 2022-24 दरम्यान 160 जिल्ह्यांमध्ये मलेरियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही,आणि तीन राज्ये वगळता 33 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील वार्षिक परजीवी घटना निर्देशांक (एपीआय) एकपेक्षाही कमी झाला आहे.
भारत सरकारने मलेरिया निर्मूलनासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत, ज्यात मलेरिया निर्मूलनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना (2023-27), रिअल-टाइम देखरेखीसाठी एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन प्लॅटफॉर्मची (IHIP) अंमलबजावणी, आशादिदींना (ASHA)वाढीव प्रोत्साहने, दीर्घकाळ टिकणाऱ्या कीटकनाशक जाळ्यांचे (LLINs) मोठ्या प्रमाणात वितरण, प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांसाठी पुनर्प्रशिक्षण आणि "शून्य मलेरिया" दर्जा प्राप्त करणाऱ्या जिल्ह्यांची दखल यांचा समावेश आहे. भारताने 2030 पर्यंत मलेरिया निर्मूलनाचे ध्येय ठेवले आहे.
नड्डा यांनी नमूद केले, पावसाळ्यात आणि मान्सूननंतरच्या काळात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा उद्रेक होण्याचा धोका सर्वाधिक असतो. राष्ट्रीय डेंग्यू नियंत्रण धोरणानुसार राज्यातील, वेक्टर-जनित आजारांवर केंद्रांद्वारे पाळत ठेवणे, रुग्ण व्यवस्थापन, वेक्टर नियंत्रण, आंतर-क्षेत्रीय समन्वय आणि सामुदायिक जागरूकता यावर लक्ष केंद्रित करून उपाययोजना राबविल्या जात आहेत.
भारत सरकारने 869 पाळत ठेवणारी सेंटिनेल रुग्णालये आणि 27 एपेक्स रेफरल लॅबोरेटरीज द्वारे मोफत चाचणी सुविधा देऊन निदान क्षमता देखील मजबूत केली आहे. 2025 मध्ये (आतापर्यंत),5,520 हून अधिक डेंग्यू आणि 2,530 चिकनगुनिया निदान साधनांचे संच राज्यांना पुरवण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक उपायांना गती देण्यासाठी देशव्यापी मोहिमेचा भाग म्हणून कठोर उपाययोजना करत अनेक सार्वजनिक उपक्रम, उदाहरणार्थ डेंग्यू विरोधी महिना (जुलै) आणि राष्ट्रीय डेंग्यू दिन (16 मे )पाळणे आणि विश्व डेंग्यू दिनाच्या दिवशी (30 जानेवारी ) इंडिया गेटवर रोषणाई करणे हाती घेतले आहेत.
सोनाली काकडे/सुरेखा जोशी/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2165847)
Visitor Counter : 2