वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारताच्या मत्स्य निर्यात क्षेत्राला मोठी चालना: युरोपीय महासंघाने 102 नव्या भारतीय आस्थापनांची यादी तयार केली
Posted On:
09 SEP 2025 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2025
भारतीय मत्स्योद्योग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा निर्णय घेत युरोपीय महासंघाने (ईयु) भारतातून ईयु सदस्य देशांना मत्स्य उत्पादनांची निर्यात करणाऱ्या आस्थापनांच्या यादीत 102 नव्या भारतीय मत्स्यसंबंधी आस्थापनांचा समावेश केला आहे. या लक्षणीय विस्तारातून भारतीय अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता हमी प्रणालींवरचा वाढता विश्वास दिसून येतो आणि भारतीय मत्स्य उत्पादने, विशेषतः मत्स्यशेतीतून मिळणाऱ्या कोळंबी आणि सीफॅलोपॉड्स(माकले, कटला मासा आणि ऑक्टोपस) यांची बाजारपेठ विस्तारण्याच्या दिशेने पुढे टाकलेले हे मोठे पाऊल ठरत आहे.
सदर निर्णयानंतर ईयु आणि केंद्र सरकार यांच्या दरम्यान अनेक बैठका झाल्या, ज्यामध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल तसेच वाणिज्य विभागातील अनेक ज्येष्ठ अधिकारी सहभागी झाले. निर्यात निरीक्षण मंडळातर्फे (ईआयसी)लागू करण्यात आलेल्या सशक्त भारतीय आधिकारिक नियंत्रण प्रणालींवरील विश्वास यामुळे अधिक दृढ झाला. निर्यात होणारी भारतीय मत्स्य उत्पादने कठोर आंतरराष्ट्रीय मापदंड, विशेषतः ईयुने आखून दिलेले मापदंड पूर्ण करत आहेत.
ठळक वैशिष्ट्ये:
- मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीसाठी ईयुने मंजूर केलेल्या निर्यातदारांच्या यादीत वर्ष 2025 मध्ये 102 नव्या आस्थापनांचा समावेश झाला.
- अन्न सुरक्षा, शोधनक्षमता आणि ईयु नियमांचे पालन याप्रती भारताच्या कटिबद्धतेचे यातून दर्शन घडते.
- उच्च दर्जाच्या मत्स्य उत्पादनांच्या विश्वसनीय पुरवठादार म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट झाले.
- निर्यातीच्या आकारमानाला चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल आणि परदेशी गंगाजळीमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा
उपरोल्लेखित घडामोडीमुळे सर्वात आकर्षक आणि गुणवत्तेच्या दृष्टीने संवेदनशील बाजारपेठांपैकी एक असलेल्या ईयुला भारतातून होणाऱ्या मत्स्योत्पादन निर्यातीत मोठी वाढ होईल अशी अपेक्षा आहे. नव्या आस्थापनांच्या समावेशामुळे, देशाच्या तटवर्ती राज्यांतील तसेच केंद्रशासित प्रदेशांतील निर्यातदारांना आता ईयु सदस्य देशांकडून येणाऱ्या मागणीचा लाभ घेणे, आस्थापनांकडून देऊ होणाऱ्या उत्पादनांमध्ये वैविध्य आणणे आणि व्यापारी संबंध बळकट करणे यासाठी अधिक चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत.
धोरणांचे सुलभीकरण, पायाभूत सुविधा विकास तसेच क्षमता निर्मिती यांच्या माध्यमातून निर्यातदारांना पाठबळ पुरवण्याप्रतीच्या कटिबद्धतेचा केंद्रीय वाणिज्य विभागाने पुनरुच्चार केला आहे. भारतीय मत्स्य उत्पादने आंतरराष्ट्रीय नियमांची पूर्तता करतील याची सुनिश्चिती करून घेण्यात आणि त्यायोगे, सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करून भारताची जागतिक स्थिती सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणे ईआयसी आणि ईआयएएस यापुढे देखील सुरु ठेवतील.
ही घडामोड एकूणच आशावादी वातावरणाशी तसेच दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या उत्पादन मापदंडांवर सुधारित विश्वासाशी सुसंगत आहे.
शैलेश पाटील/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2165109)
Visitor Counter : 2