विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली स्टार्टअपशी निगडित अर्थव्यवस्थेची हाक, चंदीगढ विद्यापीठाच्या 'कॅम्पस टँक'चे उद्घाटन

Posted On: 06 SEP 2025 7:50PM by PIB Mumbai

 

भारताचा भविष्यातील विकास मजबूत औद्योगिक भागीदारीवर आधारित "स्टार्टअप लिंक्ड इकॉनॉमी" अर्थात स्टार्टअपशी निगडित अर्थव्यवस्थेवर अधिकाधिक अवलंबून असेल, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) तसंच भू-विज्ञान राज्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री, डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगतिले. ते चंदीगढ विद्यापीठाने आयोजित केलेल्या 'कॅम्पस टँक'च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. 'कॅम्पस टँक' हा तरुण उद्योजकांना उद्योग आणि गुंतवणूकदारांशी जोडण्याचा या क्षेत्रातील पहिलाच उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारने नाविन्यपूर्णता आणि उद्यमशीलतेसाठी अनुकूल परिसंस्था निर्माण केली आहे, मात्र स्टार्टअप्स टिकवून ठेवण्यासाठी उद्योगांशी तातडीने आणि महत्त्वपूर्ण संबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे, असे सिंह यावेळी म्हणाले. केवळ प्रतीकात्मक समर्थनापलीकडे जाण्याची गरज असल्याचे अधोरेखित करत सिंह पुढे म्हणाले की स्टार्टअप्स टिकवण्यासाठी उद्योगाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे, आम्ही उद्योग-संबंधित स्टार्टअप आणि स्टार्टअप-संबंधित अर्थव्यवस्थेसाठी आग्रही आहोत. 'स्टार्टअपशी निगडित अर्थव्यवस्था हा एक चांगला शब्दप्रयोग आहे.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी जागतिक स्तरावर भारताची वाढती प्रतिष्ठाही अधोरेखित केली. गेल्या एका दशकापेक्षा कमी कालावधीत भारत जागतिक नवोपक्रम निर्देशांकात ८१ वरून ३९ व्या स्थानावर पोहोचला आहे असेही ते म्हणाले. भारतातील जवळजवळ ६० टक्के नोंदणीकृत स्टार्टअप्स महिलांनी सुरु केली आहेत, हे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. महिला केवळ सहभागीच नाहीत तर मोठ्या प्रकल्पांचे नेतृत्वही करत आहेत याचेच हे निदर्शक आहे असे त्यांनी सांगितले. आदित्य एल१ आणि चांद्रयान-३ सारख्या राष्ट्रीय मोहिमांचे नेतृत्व महिला शास्त्रज्ञ करत आहेत. हे भारतातील वैज्ञानिक आणि स्टार्टअप परिसंस्थेचे सर्वसमावेशक स्वरूप दर्शवते, असे सिंह यावेळी म्हणाले. पेटंट दाखल करण्याच्या बाबतीतही भारताची प्रगती दिसून येत आहे, अलीकडची बहुतेक पेटंट भारतीय नवसंशोधकांनी दाखल केली आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

***

माधुरी पांगे / निखिलेश चित्रे / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2164440) Visitor Counter : 2