अर्थ मंत्रालय
विशिष्ट परिस्थितींमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता युपीएस योजनेतून एनपीएस योजनेमध्ये एकदाच, एक-दिशा स्थित्यंतर उपलब्ध
Posted On:
04 SEP 2025 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2025
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिनांक 24.01.2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या वैध अधिसूचना क्र. F. No. FX-1/3/2024-PR अन्वये पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकात्मिक निवृत्तीवेतन योजना (युपीएस) अधिसूचित केली.
ज्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय (युपीएस) निवडलेला आहे, मात्र काही विशिष्ट परिस्थितीमुळे त्यांना परत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये (एनपीएस) सहभागी व्हायचे आहे अशांसाठी केंद्रीय वित्तीय सेवा विभागाने दिनांक 25.08.2025 रोजी कार्यालयीन निवेदन क्र. 1/3/2024-PR जारी करून, निवृत्तीवेतन योजनेमध्ये असे एकदाच आणि एकदिशा स्थित्यंतर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
- युपीएस मध्ये समाविष्ट पात्र कर्मचारी केवळ एकदाच एनपीएसमध्ये समाविष्ट होऊ शकतात मात्र तेथून ते पुन्हा युपीएसमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत.
- अशा प्रकारचे स्थित्यंतर निवृत्त व्हायच्या किमान एक वर्ष आधी अथवा स्वेच्छानिवृत्तीच्या तीन महिने आधी, यापैकी जे लागू असेल तेव्हा करता येऊ शकेल.
- शिक्षा म्हणून नोकरीतून काढून टाकणे, बडतर्फ करणे किंवा सक्तीची सेवानिवृत्ती देणे अशा प्रकरणी अथवा जेथे शिस्तभंगाची कारवाई चालू आहे अथवा विचाराधीन आहे अशा वेळी सदर स्थित्यंतराच्या सुविधेला परवानगी दिली जाणार नाही.
- निर्धारित वेळेत स्थित्यंतराचा पर्याय न निवडणारे कर्मचारी युपीएसमध्येच राहतील.
- ज्या कर्मचाऱ्यांनी एनपीएसमध्येच राहण्याचा पर्याय निवडला असेल त्यांना 30 सप्टेंबर 2025 नंतर युपीएसचा पर्याय निवडता येणार नाही.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीपश्चात आर्थिक सुरक्षिततेचे नियोजन करण्यासाठी माहितीपूर्ण निवडीचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. कर्मचारी आधी युपीएसचा पर्याय स्वीकारून, नंतरच्या काळात एनपीएसमध्ये प्रवेश करण्याचा पर्याय राखून ठेवू शकतात.
टीप: एनपीएसमध्ये समाविष्ट असलेले विद्यमान पात्र कर्मचारी तसेच आधी निवृत्त झालेले कर्मचारी यांना युपीएसचा पर्याय निवडण्यासाठीची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे.
* * *
निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2163916)
Visitor Counter : 2