कोळसा मंत्रालय
कोळसा मंत्रालय 4 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईत कोळसा आणि लिग्नाइट खाणींसाठी स्टार रेटिंग पुरस्कार सोहळा आयोजित करणार
Posted On:
03 SEP 2025 11:24AM by PIB Mumbai
कोळसा मंत्रालय 4 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे कोळसा आणि लिग्नाइट खाणींसाठी प्रतिष्ठित स्टार रेटिंग पुरस्कार सोहळा आयोजित करणार आहे. या कार्यक्रमात भारतातील कोळसा आणि लिग्नाइट खाणींना त्यांच्या कार्यात्मक उत्कृष्टता, पर्यावरणीय योगदान, सुरक्षितता आणि सामुदायिक विकासातील अपवादात्मक कामगिरीसाठी सन्मानित करण्यात येईल.
या समारंभाला केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील तर केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे यांची देखील उपस्थिती असेल. कोळसा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, कोळसा सार्वजनिक उपक्रमांचे प्रतिनिधी आणि उद्योगातील भागधारक देखील या मेळाव्यात सहभागी होतील.
कोळसा मंत्रालयाने स्थापन केलेली स्टार रेटिंग प्रणाली, कोळसा आणि लिग्नाइट खाणींच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेते. जबाबदार खाणकाम पद्धतींना प्रोत्साहन देणे, उद्योग मानके वाढवणे आणि या क्षेत्रातील शाश्वत वाढ सुनिश्चित करणे हा यामागचा उद्देश्य आहे.
मंत्रालय खाणींचे मूल्यांकन एका संरचित आणि व्यापक चौकटीद्वारे करते ज्यामध्ये सात मॉड्यूल समाविष्ट आहेत. खाणकाम कार्यप्रणाली, पर्यावरणीय मापदंड, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि सर्वोत्तम पद्धती, आर्थिक कामगिरी, पुनर्वसन, कामगार-संबंधित अनुपालन आणि सुरक्षा असे हे सात मॉड्यूल आहेत. खाणींना भूमिगत, ओपनकास्ट आणि मिश्रित या तीन श्रेणींमध्ये फाइव्ह स्टार ते नो स्टार या प्रमाणात रेटिंग दिले जाते.
2023-24 मूल्यांकन वर्षासाठी, स्टार रेटिंग मूल्यांकनात सहभागी होण्यासाठी एकूण 383 खाणींची निवड करण्यात आली आहे. यापैकी 42 खाणींना 93% पेक्षा जास्त गुण मिळवून प्रतिष्ठित पंचतारांकित रेटिंग मिळाले आहे. त्यापैकी 4 खाणींनी प्रथम क्रमांक, 3 खाणींनी द्वितीय क्रमांक आणि 6 खाणींनी तृतीय क्रमांक मिळवला आहे, तर 29 खाणींना अचिव्हर्स पुरस्कार मिळाला आहे.
स्टार रेटिंग पुरस्कार सोहळ्यात नव्याने तयार केलेल्या सीसीओ (कोळसा नियंत्रक संघटना) वेबसाइटचे त्याच्या परस्परसंवादी डॅशबोर्डसह लाँचिंग आणि कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज (सीसीयूएस) वरील हॅकेथॉनसाठी पुरस्कारांचे सादरीकरण देखील केले जाईल. याव्यतिरिक्त, या प्रसंगी कोळसा काढून टाकलेल्या खाणींचा पुनर्वापर करण्यासाठी एक हरित वित्तपुरवठा चौकट, एआरटीएचए आणि जबाबदार आणि शाश्वत खाण बंद करण्यासाठी एक व्यापक व्यवसाय मार्गदर्शक, एल.आय.व्ही.ई.एस. चे प्रकाशन केले जाईल.
स्टार रेटिंग पुरस्कारांची ही आवृत्ती कोळसा क्षेत्रातील समर्पण आणि नवोन्मेषाचा उत्सव आहे. यामुळे शाश्वत खाण पद्धती, ऊर्जा सुरक्षा आणि समुदाय कल्याणासाठी मंत्रालयाची वचनबद्धता अधोरेखित होते. या खाणींना मिळालेल्या मान्यतामुळे सर्वोत्तम पद्धतींचा व्यापक अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि भारतातील जबाबदार आणि भविष्यासाठी तयार असलेल्या कोळसा खाण उद्योगाचे स्वप्न बळकट होईल.
***
सोनल तुपे / हेमांगी कुलकर्णी / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2163297)
Visitor Counter : 2