सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार सोहळा 2025
Posted On:
02 SEP 2025 4:10PM by PIB Mumbai
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. आंबेडकर फाउंडेशनने आज नवी दिल्ली येथे डॉ. आंबेडकर राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार सोहळ्याचे यशस्वीरित्या आयोजन केले. मान्यताप्राप्त राज्य/केंद्रीय मंडळे आणि परिषदांद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांमध्ये अव्वल स्थान मिळविणाऱ्या अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना आणि मान्यताप्राप्त राज्य/केंद्रीय मंडळे आणि परिषदांद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांमध्ये अव्वल स्थान मिळविणाऱ्या अनुसूचित जाती (एससी) वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यासाठी हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.

2021-22 आणि 2022-23 या वर्षांसाठी एकूण 29 राज्य/केंद्रीय मंडळे आणि परिषदांना विचारात घेण्यात आले. 22021-22 या सत्रात दहावीच्या एकूण 367 विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यापैकी 22 अव्वल क्रमांकावर होते आणि बारावीच्या एकूण 563 विद्यार्थ्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले, त्यापैकी 49 अव्वल होते. 2022-23 सत्रासाठी, दहावीच्या एकूण 198 विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, ज्यात 17 जण अव्वल होते आणि बारावीच्या एकूण 362 विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आला, त्यापैकी 29 जण अव्वल होते.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री आणि डॉ. आंबेडकर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. वीरेंद्र कुमार कार्यक्रमाला उपस्थित होते. आपल्या भाषणात, डॉ. वीरेंद्र कुमार यांनी शिक्षण आणि सामाजिक न्याय क्षेत्रात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावर प्रकाश टाकला आणि शिक्षण, शिष्यवृत्ती, फेलोशिप आणि कल्याणकारी योजनांद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर वंचित समुदायांच्या सक्षमीकरणासाठी सरकारच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.

रामदास आठवले आणि बी. एल. वर्मा यांनी पुरस्कार विजेत्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आणि समाजातील सर्व घटकांना, विशेषतः उपेक्षितांना, दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या लोकाभिमुख उपक्रमांवर भर दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली समानता, बंधुता, प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाची मूल्ये पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार योजनेअंतर्गत, फाउंडेशनने माध्यमिक शिक्षण मंडळासाठी मान्यताप्राप्त प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना आणि वरिष्ठ माध्यमिक शिक्षण मंडळातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान केले.
पुरस्कार खालीलप्रमाणे एकवेळ अनुदान स्वरूपात प्रदान करण्यात आले.
1. सर्वाधिक गुण मिळविणारा विद्यार्थी 60,000/- रुपये
2. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गुण मिळविणारा विद्यार्थी 50,000/- रुपये
3. तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गुण मिळविणारा विद्यार्थी 40,000/- रुपये
याव्यतिरिक्त, पहिल्या तीन क्रमांकामध्ये एकही मुलगी नसल्यास सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनीला विशेष पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारांमध्ये मान्यता आणि प्रोत्साहन म्हणून 60,000/- रुपयांचे एक वेळचे रोख पारितोषिक होते.
या वर्षीच्या समारंभात देशभरातील पुरस्कार विजेते, पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि मान्यवरांचा सहभाग होता. शिक्षण आणि सक्षमीकरणाद्वारे समतापूर्ण आणि समावेशक समाज निर्माण करण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाचा भाग म्हणून, दरवर्षी असे उपक्रम आयोजित करण्यास मंत्रालयाने सहमती दर्शवली.
बाबासाहेबांच्या "शिक्षित करा, आंदोलन करा, संघटित व्हा" या आवाहनाला अनुसरून एकता, समानता आणि उत्कृष्टतेच्या शोधाचा जोरदार संदेश देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
***
माधुरी पांगे / वासंती जोशी / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2163174)
Visitor Counter : 6