संरक्षण मंत्रालय
भारत - थायलंड संयुक्त लष्करी सराव मैत्री - XIV ला मेघालय येथे प्रारंभ
प्रविष्टि तिथि:
02 SEP 2025 4:44PM by PIB Mumbai
भारत-थायलंड संयुक्त लष्करी सराव मैत्री-XIV च्या 14 व्या आवृत्तीला आज मेघालयातील उमरोई येथील संयुक्त प्रशिक्षण नोड (जेटीएन) येथे एका भव्य उद्घाटन समारंभाने सुरुवात झाली. हा सराव 1 ते 14 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित केला जात आहे. हा द्विपक्षीय सराव दोन्ही देशांमधील लष्करांमधील आदानप्रदान कार्यक्रमाचा एक भाग असून भारतीय लष्कर आणि रॉयल थाई आर्मी यांच्यातील सहकार्य, आंतरपरिचालन क्षमता आणि परस्पर सामंजस्य वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. या सरावाची 13 वी आवृत्ती थायलंडमधील टाक प्रांतातील फोर्ट वाचिरप्राकन येथे आयोजित करण्यात आली होती.
120 जवानांचा समावेश असलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीचे प्रतिनिधित्व मद्रास रेजिमेंटची बटालियन करत आहे. 53 जवानांचा समावेश असलेल्या रॉयल थाई आर्मीच्या तुकडीचे प्रतिनिधित्व 14 व्या इन्फंट्री ब्रिगेडची पहिली इन्फंट्री बटालियन करत आहे.
हा संयुक्त सराव संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या सातव्या अध्याय अंतर्गत निम -शहरी भूभागात कंपनी स्तरावरील दहशतवादविरोधी कारवायांवर केंद्रित असेल. दोन आठवड्यांच्या या कार्यक्रमात सामरिक कवायती, संयुक्त नियोजन, विशेष शस्त्र कौशल्ये, शारीरिक तंदुरुस्ती आणि छापे टाकण्याची मोहीम यांचा समावेश आहे. या सरावाचा शेवट 48 तासांच्या प्रमाणीकरण सरावाने होईल, जो वास्तववादी परिचालन परिस्थितीचे अनुकरण करेल.
2006 मध्ये सुरू झालेला मैत्री सराव हा भारत आणि थायलंडमधील महत्त्वाचा संयुक्त प्रशिक्षण सराव आहे. सध्याची आवृत्ती द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक बळकट करते आणि या प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षिततेप्रति दोन्ही सैन्यांची सामायिक वचनबद्धता प्रतिबिंबित करते.

***
माधुरी पांगे / सुषमा काणे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2163145)
आगंतुक पटल : 35