रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वे आणि भारतीय स्टेट बँक यांच्यात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वाढीव विमा लाभांबाबत सामंजस्य करार — केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी
Posted On:
01 SEP 2025 7:52PM by PIB Mumbai
जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यापैकी एक असलेली भारतीय रेल्वे आणि सार्वजनिक क्षेत्रातली भारतातली सर्वात मोठी बँक असलेली भारतीय स्टेट बँक यांच्यात आज ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या समारंभाला रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष सी. एस. सेट्टी उपस्थित होते.

या कराराअंतर्गत, भारतीय स्टेट बँके मध्ये वेतन खाते असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विमा संरक्षणात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. अपघाती मृत्यूच्या प्रकरणात विमा लाभ एक कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. यापूर्वी, केंद्रीय सरकारी कर्मचारी गट विमा योजनेअंतर्गत गट अ, ब, आणि क कर्मचाऱ्यांसाठी अनुक्रमे 1 लाख 20 हजार रुपये, 60 हजार रुपये आणि 30 हजार रुपये इतके विमा संरक्षण उपलब्ध होते.

याशिवाय, स्टेट बँकेत केवळ वेतन खाते असलेल्या सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना आता कोणताही हप्ता किंवा वैद्यकीय तपासणीशिवाय नैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणात दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
स्टेट बँकेत सुमारे सात लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची वेतन खाती आहेत. त्यामुळे हा करार कर्मचारी कल्याणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, तसेच भारतीय रेल्वे आणि भारतीय स्टेट बँक यांच्यातील सकारात्मक आणि संवेदनशील भागीदारीचे प्रतीक आहे.

या करार अंतर्गत प्रमुख पूरक विमा लाभ पुढीलप्रमाणे आहेत :
विमान अपघात (मृत्यू) संरक्षण : 1 कोटी 60 लाख रुपये अधिक रुपे डेबिट कार्डवर अतिरिक्त 1 कोटी रुपयांपर्यंत
वैयक्तिक अपघात (पूर्ण कायमस्वरूपी अपंगत्व) संरक्षण : 1 कोटी रुपये
वैयक्तिक अपघात (अंशतः कायमस्वरूपी अपंगत्व) संरक्षण : 80 लाख रुपये
***
शैलेश पाटील / निखिलेख चित्रे/ परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2162941)
Visitor Counter : 2