दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतात बेंगळुरूमध्ये 6G मानकीकरणाच्या पहिल्या  3GPP RAN बैठकीचे आयोजन


3GPP रिलीज 20 वर चर्चा जारी - जागतिक 6G संदर्भात मूलभूत तपशीलांची होणार आखणी

50 हून अधिक देशांमधील 1,500 हून अधिक प्रतिनिधींसह आतापर्यंतचा सर्वोच्च जागतिक सहभाग

बेंगळुरूमध्ये 3GPP या बैठका आयोजित केल्याने भारतीय संशोधक आणि कंपन्यांना भविष्यातील दूरसंचार क्षेत्राला आकार देण्यासाठी मिळणार थेट प्रवेश

Posted On: 26 AUG 2025 12:06PM by PIB Mumbai

 

भारत आणि जागतिक दूरसंचार समुदायासाठी ऐतिहासिक महत्त्वाच्या  3GPP रेडिओ ॲक्सेस नेटवर्क्स (RAN) वर्किंग समूहाच्या 5 बैठका - RAN1 ते RAN5 - 25 ऑगस्ट रोजी व्हाइटफील्ड, बेंगळुरू येथे प्रथमच आयोजित करण्यात आल्या आहेत. दूरसंचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाच्या (DoT) पाठिंब्याने आणि भारताच्या दूरसंचार मानक विकास सोसायटी (TSDSI) यांच्या संयुक्त सहकार्याने,अशा बैठका होत असून यात प्रथमच 3GPP रिलीज 20 अंतर्गत 6G मानकीकरणावर  चर्चा होत आहेत, त्याचबरोबर रिलीज 19 च्या मूलभूत आणि खुलासेवार तपशीलांना  अंतिम स्वरूप देण्यात आले आहे, जे 5G अत्याधुनिक उत्क्रांतीला चालना देईल. या बैठका दिनांक 29 ऑगस्ट 2025 पर्यंत सुरू राहतील.

TSDSI ने बेंगळुरूमध्ये 3GPP RAN  कार्यगट बैठकांचे हे आयोजन केले आहे.जागतिक संप्रेषण तंत्रज्ञानाचे भविष्य घडवण्यासाठी भारत सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकत, दूरसंचार विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी संपूर्ण संस्थात्मक आणि आर्थिक सहकार्य दिले आहे. 6G व्हिजनमध्ये सरकारच्या सततच्या सहभागाचे संकेत देणारे दूरसंचार विभागाचे एक शिष्टमंडळ (DoT delegation) बैठकांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहे.

TSDSI ही भारताची मान्यताप्राप्त मानक विकास संघटना (SDO) आहे आणि 5G आणि 6G सह मोबाइल संप्रेषण तंत्रज्ञानासाठी तपशील विकसित करण्यासाठी जबाबदार असलेली जागतिक संस्था, असून 3rd Generation Partnership Project (3GPP) च्या सात संघटनात्मक भागीदारांपैकी एक आहे. 3GPP जागतिक मोबाइल नेटवर्कचा तपशीलवार पाया तयार करतात आणि या चर्चासत्रांमधील भारताचा सक्रिय सहभाग भविष्यातील दूरसंचार तंत्रज्ञानाला आकार देण्याच्या देशाच्या वाढत्या इच्छेला आणखी बळकटी देईल.

बेंगळुरूतील या बैठका ही भारतीय भागधारकांसाठी एक महत्त्वाची संधी आहे. जागतिक 3GPP चर्चासत्रे  भारतात प्रथमच होत आहेत, ज्यामुळे देशांतर्गत संशोधक, कंपन्या आणि शैक्षणिक संस्था देखील स्थानिक पातळीवर यात  सहभागी होऊ शकतील,थेट अनुभव मिळवू शकतील आणि आंतरराष्ट्रीय प्रवासात  अडचणींशिवाय अर्थपूर्ण योगदान देऊ शकतील. हे समावेशक व्यासपीठ भारतीय संस्थांना रिअल-टाइममध्ये जागतिक घडामोडींशी जुळवून घेण्यास आणि 6G मानकीकरणाच्या प्रयत्नांमध्ये योगदान देण्यास सक्षम करेल.

भारतात 3GPP आणल्याने जागतिक मानक-सेटिंग गतिशीलतेमध्ये बदल दिसून येतो, जिथे भारतासारखे उदयोन्मुख तंत्रज्ञान नेते वाढत्या प्रमाणात प्रभावशाली भूमिका बजावतात. या कार्यक्रमामुळे उद्योग-शैक्षणिक सहकार्यात वाढ होईल, देशांतर्गत नवोपक्रमांना चालना मिळेल आणि जागतिक दूरसंचार मानक परिसंस्थेत प्रमुख योगदानकर्ता म्हणून भारताचे स्थान मजबूत होईल अशी अपेक्षा आहे.

***

सोनल तुपे / संपदा पाटगावकर / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2162744) Visitor Counter : 2