माहिती आणि प्रसारण मंत्रालय
IICT मुंबई आणि स्टार्टअप ॲक्सलरेटर प्लॅटफॉर्म वेव्हएक्स (WaveX) यांनी AVGC-XR स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी 'मीडिया टेक इनक्युबेटर' चा केला प्रारंभ; 7 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत
Posted On:
30 AUG 2025 7:48PM by PIB Mumbai
वेव्हएक्स (WaveX) या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या स्टार्टअप ॲक्सलरेटर कार्यक्रमाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (IICT) सोबत मिळून एक विशेष मीडिया टेक स्टार्टअप इनक्युबेटर सुरू करण्याची घोषणा केली आहे. वेगाने विकसित होत असलेल्या प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात उच्च-क्षमतेच्या उद्योगांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हा इनक्युबेटर AVGC-XR क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी एक विशेष समर्पित जोपासनाकारक परिसंस्था उपलब्ध करेल, ज्यामध्ये ऑडिओ, व्हिज्युअल, कॉमिक्स, गेमिंग आणि एक्सटेंडेड रिॲलिटी यांचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गत सरकार आणि मीडिया युनिटच्या भागीदारीच्या माध्यमातून संरचित मार्गदर्शन, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, धोरणात्मक सल्ला आणि वास्तविक जगातील चाचणीच्या संधी दिल्या जातील. यामुळे स्टार्टअप्सना प्रभावीपणे विस्तार करण्यास आणि त्यांचे व्यावसायीकीकरण करण्यास मदत होईल.
हा इनक्युबेटर दोन टप्प्यांच्या मॉडेलवर काम करेल
- सक्रिय टप्पा (Active Phase): व्यवसायाचे मॉडेलिंग, उत्पादन विकास, पिचिंग, ब्रँडिंग, निधी उभारणी आणि मीडिया नियमनामध्ये गहन पाठबळ; तसेच OTT, VFX, VR, गेमिंग, ॲनिमेशन, प्रकाशन आणि पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये सँडबॉक्स चाचणीच्या संधी.
- निष्क्रिय टप्पा (Passive Phase): वेव्हज् बझार (Waves Bazaar) द्वारे जागतिक प्रदर्शन, हलक्या-फुलक्या मार्गदर्शनावर लक्ष केंद्रित करणे, गुंतवणूकदार संलग्नता आणि उद्योग संघटना.
या कार्यक्रमात सह-कार्य अवकाश (co-working spaces), AV/डिजिटल लॅब, होस्टिंग सर्व्हर्स, हाय-स्पीड LAN/वाय-फाय, AWS/गुगल क्लाउड क्रेडिट्स आणि नजीकच्या भविष्यात इंडिया AI कंप्युट सेवा यांसारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. कार्यक्रमांमध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट, ऍमेझॉन इत्यादी जागतिक अग्रणींद्वारे मास्टरक्लासेस तसेच केंद्रित बूटकॅम्प्स, पॉलिसी क्लिनिक्स आणि गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्यासाठी सत्रे आयोजित केली जातील. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली वेव्हएक्स (WAVEX) त्रैमासिक आढाव्यांसह कार्यक्रमाच्या प्रशासनावर देखरेख ठेवेल. पहिल्या तुकडीसाठी IICT कॅम्पसमध्ये 15 स्टार्टअप्सची निवड केली जाईल. यासाठी दरमहा रु.8500 + GST शुल्क आकारले जाईल.
पहिल्या तुकडीसाठी अर्ज 7 सप्टेंबर 2025 पर्यंत खुले आहेत. इच्छुक स्टार्टअप्स wavex.wavesbazaar.com वर लॉग इन करून, डॅशबोर्डवर जाऊन, "Register for Incubation" निवडून, अर्ज भरून, आवश्यक तपशील देऊन, त्यांच्या पसंतीचे इनक्युबेटरचे ठिकाण निवडून आपला अर्ज ऑनलाइन दाखल करू शकतात.
***
सुषमा काणे / शैलेश पाटील / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2162379)
Visitor Counter : 21