संरक्षण मंत्रालय
जम्मू आणि पंजाबमधील पूरपरिस्थितीला भारतीय हवाई दलाने दिला झटपट प्रतिसाद
Posted On:
27 AUG 2025 7:29PM by PIB Mumbai
उत्तर पंजाब आणि जम्मू प्रदेशात भारतीय हवाई दलाची जलद पूर मदत कार्यवाही
जम्मू प्रदेश आणि उत्तर पंजाबमध्ये सततच्या पावसामुळे होत असलेली पाणीपातळीतील वाढ आणि विनाशकारी पूर यांच्या पार्श्वभूमीवर व्यापक मदत आणि बचाव मोहिमा राबवून भारतीय हवाई दल ( आयएएफ ) राष्ट्रसेवेप्रति आपली वचनबद्धता दाखवत आहे.
भारतीय हवाई दलाच्या बचावकार्य संबंधित सामग्रीची जलदगतीने तैनाती
हेलिकॉप्टर ताफा सक्रीय: उत्तर क्षेत्रातील जवळच्या तळांवरून पाच एमआय-17 हेलिकॉप्टर्स आणि एक चिनूक हेलिकॉप्टर तातडीने सेवेत दाखल करण्यात आले, ज्यामुळे जास्तीत जास्त बचाव क्षमता आणि कार्यान्वयन व्याप्ती सुनिश्चित झाली. बचाव कार्यात सामील होण्यासाठी अतिरिक्त हेलिकॉप्टर्स सज्ज ठेवण्यात आली आहेत.
वाहतूक विमानांचे सहाय्य: परिसरात सुरू असलेल्या बचाव कार्यांसाठी आवश्यक साहित्य आणि प्रशिक्षित कर्मचारी पुरविण्यासाठी मदत आणि बचाव साहित्याने भरलेले भारतीय हवाई दलाचे एक सी-130 वाहतूक विमान आणि एनडीआरएफ पथक जम्मूला पोहोचले. बचावकार्यात सामील होण्यासाठी अतिरिक्त वाहतूक विमाने सज्ज ठेवण्यात आली आहेत.
बचाव मोहिमा
अखनूर क्षेत्र, जम्मू: समन्वय आणि कार्यक्षमतेचे एक उत्तम उदाहरण म्हणून 12 लष्करी जवान आणि 11 बीएसएफ जवानांना पूरग्रस्त भागातून सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले, ज्यात बीएसएफच्या 3 महिला हवालदारांचा समावेश आहे. आव्हानात्मक परिस्थितीत सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी आयएएफ वचनबद्ध आहे.
पठाणकोट क्षेत्र, पंजाब: पूरपरिस्थिती तीव्र होत असताना आयएएफच्या हेलिकॉप्टरने 46 अडकलेल्या नागरिकांना यशस्वीरित्या बाहेर काढले. याशिवाय स्थानिक समुदायांना मदत करण्यासाठी 750 किलोग्रॅमहून अधिक आवश्यक मदत साहित्य हवेतून टाकण्यात आले.
डेरा बाबा नानक क्षेत्र: एका अत्यंत महत्त्वपूर्ण मोहिमेत गंभीरपणे प्रभावित झालेल्या डेरा बाबा नानक भागातून 38 लष्करी जवान आणि 10 बीएसएफ जवानांना बाहेर काढत त्यांना वाचवण्यात आले. धोकादायक परिस्थितीतही भारतीय हवाई दलाचा जलद प्रतिसाद आणि व्यावसायिकता यांचे हे प्रतिबिंब आहे. बाधित कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी अतिरिक्त मोहिमा सुरू आहेत.
भारतीय हवाई दलाने लष्कर, बीएसएफ, एनडीआरएफ आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या निकट सहकार्याने केलेल्या तातडीच्या कृतींमुळे असंख्य जीव वाचवले आहेत आणि सर्वाधिक बाधितांना मदत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रगत हवाई उपकरणे आणि अत्यंत कुशल कर्मचाऱ्यांच्या तैनातीमुळे प्रतिकूल हवामानात जलद, सुरक्षित स्थलांतर घडवता आले तसेच मदत कार्यक्षमतेने पोहोचवता आली.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात राष्ट्र आणि नागरिकांप्रति असलेल्या आपल्या अढळ वचनबद्धतेची पुष्टी करून भारतीय हवाई दल बदलत्या परिस्थितीत पुढील मोहिमा हाती घेण्यास सज्ज आहे.



***
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2161396)