संरक्षण मंत्रालय
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी संरक्षण मंत्रालयाचा भारतीय गुणवत्ता परिषदेसोबत करार
Posted On:
27 AUG 2025 11:45AM by PIB Mumbai
सेवेत गुणवत्ता-माजी सैनिकांसाठी सन्मान या संकल्पनेला बळकटी देत, संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाने काल 26 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारतीय गुणवत्ता परिषदे (क्युसीआय) सोबत एक सामंजस्य करार केला. या कराराचा उद्देश 63 लाखाहून अधिक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पेन्शन, आरोग्यसेवा, पुनर्वसन आणि कल्याण सेवा अधिक बळकट करणे हा आहे.
या सामंजस्य करारानुसार, भारतीय गुणवत्ता परिषद माजी सैनिक कल्याण विभागाला डिजिटल मूल्यमापन, परिणाम मूल्यांकन आणि पुराव्यांवर आधारित धोरण शिफारशी करण्यास सहाय्य करेल. माजी सैनिक कल्याण विभाग संबंधित राज्य सरकार, जिल्हा सैनिक मंडळे, सशस्त्र दलांचे मुख्यालय आणि पॅनेलमध्ये समाविष्ट रुग्णालयांसोबत माहीती उपलब्धता आणि समन्वय सुनिश्चित करेल. यामुळे आरोग्यसेवा वितरण बळकट होईल, माजी सैनिकांसाठी पुनर्रोजगार आणि उद्योगसंधी वाढतील, तसेच राज्य आणि जिल्हा सैनिक मंडळांच्या संस्थात्मक चौकटींना बळ मिळेल.
या सामंजस्य करारावेळी माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव, डॉ. नितीन चंद्र यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म, कृत्रिम बुद्धिमत्ता अनुप्रयोग आणि सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून सेवा पोहोच आणि कार्यक्षम वितरण याचे महत्त्व अधोरेखित केले. भारतीय गुणवत्ता परिषद सहकार्य प्रणालीच्या कार्यक्षमतेसाठी, क्षमता मोजणीसाठी आणि योजनांमध्ये पुराव्यांवर आधारित सुधारणा सुनिश्चित करण्यास मदत करेल.
या सामंजस्य करारावर माजी सैनिक कल्याण विभागाचे सह-सचिव डॉ. पी.पी शर्मा आणि भारतीय गुणवत्ता परिषदेचे महासचिव चक्रवर्ती कन्नन यांनी स्वाक्षरी करत देवाणघेवाण केली. समारंभात माजी सैनिक कल्याण विभाग, माजी सैनिक योगदान आरोग्य योजना, केंद्रीय सैनिक मंडळ, सेवा मुख्यालये, राष्ट्रीय रुग्णालय आणि आरोग्य सेवा पुरवठादार मान्यता परिषद (एनएबीएच) आणि भारतीय गुणवत्ता परिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
***
शैलेश पाटील/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2161382)