संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्लीत गगनयात्री - ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, ग्रुप कॅप्टन पी.बी. नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन आणि ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप यांना गौरवण्यात आले
Posted On:
24 AUG 2025 3:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2025
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 24 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात गगनयान या इस्रोच्या पहिल्या अंतराळ उड्डाण मोहिमेचा भाग असलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, ग्रुप कॅप्टन पी.बी. नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन आणि ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप यांचा सत्कार केला. संरक्षणमंत्र्यांनी या प्रसंगी बोलताना “देशाचे रत्न” आणि “राष्ट्रीय आकांक्षांचे प्रवर्तक” असे या चार गगनयात्रींचे वर्णन केले.
अंतराळ क्षेत्रातील भारताचे वाढते अस्तित्व अधोरेखित करताना राजनाथ सिंह म्हणाले, "आम्ही अंतराळाकडे केवळ संशोधनाचे क्षेत्र म्हणून पाहत नाही, तर उद्याच्या अर्थव्यवस्थेचे, सुरक्षेचे, उर्जेचे आणि मानवतेचे भविष्य म्हणून पाहतो. आम्ही पृथ्वीच्या पलीकडे अंतराळाच्या नवीन सीमांपर्यंत सातत्याने प्रगती करत आहोत. आपण चंद्रापासून मंगळापर्यंत आपली उपस्थिती आधीच नोंदवली आहे आणि आज, देश गगनयानसारख्या मोहिमांसाठी पूर्णपणे सज्ज आहे".

संरक्षणमंत्र्यांनी ही कामगिरी केवळ तंत्रज्ञानदृष्ट्या महत्त्वाचा टप्पा नसून आत्मनिर्भर भारताचा एक नवीन अध्याय असल्याचे म्हटले. "भारत आज जगातील आघाडीच्या अंतराळ शक्तींमध्ये अभिमानाने उभा आहे. आपला अंतराळ कार्यक्रम प्रयोगशाळा आणि प्रक्षेपण वाहनांपुरता मर्यादित नाही. तो आपल्या राष्ट्रीय आकांक्षा आणि जागतिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. चांद्रयानापासून ते मंगळयानापर्यंत, आपण हे दाखवून दिले आहे की मर्यादित संसाधने असूनही, असीम इच्छाशक्तीमुळे सर्वात आव्हानात्मक उद्दिष्टे देखील उल्लेखनीय कामगिरीत रूपांतरित होऊ शकतात," असे ते म्हणाले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नमूद केले की, अंतराळाशी संबंधित संचार उपग्रह असो, हवामान निरीक्षण असो किंवा आपत्ती व्यवस्थापन असो या अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग आज देशातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक शेतात सेवा पुरविण्यासाठी होत आहे. भारत अंतराळ प्रवासात मागे राहू शकत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. येत्या काळात अंतराळ खाणकाम, अंतराळात खोलवर संशोधन आणि ग्रहीय संसाधने मानवी संस्कृतीचा मार्गच बदलून टाकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचे यशस्वी अंतराळ मोहिमेबद्दल अभिनंदन करताना, सिंह यांनी त्यांच्या दृढनिश्चय व धैर्याचे कौतुक केले. हे धैर्य भारताच्या आत्म्याचे प्रतिक असून ते संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाचा स्रोत असल्याचे त्यांनी नमूद केले. अडीच वर्षांचे प्रशिक्षण केवळ अडीच महिन्यात पूर्ण करून, ग्रुप कॅप्टन शुक्ला यांनी आपली वैयक्तिक निष्ठा व भारतीय जनतेची चिकाटी सिध्द केली. त्यांचे हे अद्भुत यश केवळ तांत्रिक कामगिरी नाही, तर विश्वास आणि त्यागाचा संदेश आहे. हा केवळ भारताचा अभिमान नाही, तर संपूर्ण मानवजातीच्या प्रगतीचा पुरावा आहे, असे ते म्हणाले. शुक्ल हे नागरी-सैन्य एकात्मतेचे प्रतिक आहेत, असे सिंह यांनी त्यांचे वर्णन केले. त्यांनी भारतीय हवाई दलाचा गणवेश परिधान केला असला तरी, त्यांचा अंतराळ प्रवास हा केवळ सशस्त्र सेना किंवा भारतापुरता मर्यादित नव्हता, तर संपूर्ण मानवजातीचे प्रतिनिधित्व करणारा होता. त्यांच्या या ऐतिहासिक मोहिमेतून नागरी क्षेत्राला दिलेले योगदान कायम इतिहासात नोंदले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अंतराळवीरांना शारीरिक, मानसिक, भावनिक आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या तयार करण्याचे महत्व अधोरेखित करताना, राजनाथ सिंह यांनी इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिनने या प्रशिक्षणात निभावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा विशेष उल्लेख केला. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे त्या संस्थेच्या यशाचे झगमगते प्रतीक आहेत, असे ते म्हणाले.
* * *
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2160314)