दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित

Posted On: 23 AUG 2025 2:49PM by PIB Mumbai

 

अमेरिका प्रशासनाने 30 जुलै 2025 रोजी जारी केलेल्या कार्यकारी आदेश क्र. 14324 ची टपाल विभागाने नोंद घेतली आहे. या आदेशानुसार, 800 अमेरिकन डॉलर पर्यंतच्या  वस्तूंवरील शुल्कमुक्त  सवलत 29 ऑगस्ट 2025 पासून मागे घेतली जाणार आहे. परिणामी, किंमत काहीही असो, अमेरिकेसाठी पाठविण्यात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय टपाल वस्तूंवर त्या देशाच्या आयईईपीए ( आंतरराष्ट्रीय आपत्कालीन वित्तीय अधिकार  कायदा ) दररचनेनुसार सीमाशुल्क आकारले जाणार आहे. तथापि, 100 अमेरिकन डॉलर पर्यंतच्या  भेटवस्तूंना शुल्कातून सूट लागू राहील.

कार्यकारी आदेशानुसार, आंतरराष्ट्रीय टपाल नेटवर्कद्वारे मालवाहतूक करणारे परिवहन वाहक किंवा यूएससीबीपी ( अमेरिकन अबकारी आणि सीमा संरक्षण) मान्यताप्राप्त पात्र संस्था यांना टपाल पार्सलवरील शुल्क वसूल करून जमा करण्याची जबाबदारी आहे. यूएससीबीपी ने 15 ऑगस्ट 2025 रोजी काही मार्गदर्शक सूचना जारी  केल्या असल्या तरी पात्र संस्थांची नेमणूक तसेच शुल्क वसुली व रेमिटन्स यंत्रणा अद्याप स्पष्ट झालेली नाही. परिणामी, कार्यात्मक व तांत्रिक तयारीअभावी, अमेरिकेकडे जाणाऱ्या हवाई कंपन्यांनी 25 ऑगस्ट 2025 नंतर टपाल पार्सल स्वीकारण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर, टपाल विभागाने 25 ऑगस्ट 2025 पासून अमेरिकेसाठी जाणाऱ्या सर्व प्रकारच्या टपाल वस्तूंचे बुकिंग तात्पुरते स्थगित  करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पत्रे/दस्तऐवज व 100 अमेरिकन डॉलर पर्यंतच्या भेटवस्तू या अपवादात्मक श्रेणीत येतील व त्यांची नोंदणी सुरू राहील. या वस्तू यूएससीबीपी व यूएसपीएस कडून पुढील स्पष्टीकरण मिळेपर्यंत अमेरिकेला पाठविण्यात येतील.

टपाल विभाग या बदलत्या परिस्थितीवर सर्व संबंधित हितधारकांशी समन्वय साधत सतत लक्ष ठेवून आहे आणि सर्व सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

ज्या ग्राहकांनी अशा वस्तूंचे बुकिंग आधीच केले आहे, त्या  सद्यस्थितीत अमेरिकेला  पाठविता येणार नाही, ते ग्राहक टपाल शुल्क परत घेऊ शकतात. तसेच टपाल विभाग ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करून अमेरिकेला जाणारी पूर्ण टपाल सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करीत आहे,असे टपाल विभागाने कळवले आहे.

***

सुषमा काणे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2160153)