संरक्षण मंत्रालय
नवी दिल्लीतील संयुक्त राष्ट्र महिला लष्करी अधिकारी अभ्यासक्रम 2025 मध्ये सहभागी झालेल्या जागतिक महिला शांती सैनिकांशी संरक्षण मंत्र्यांनी साधला संवाद
भारत लिंगभाव समानता वाढवण्यासाठी, सर्वसमावेशक नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शांततामय जगाची निर्मिती करण्यासाठी कायमच काम करतच राहील - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
महिला अधिकारी बदलाच्या मशाल वाहक आहेत, त्यांच्यामुळे शांती मोहिमांना मौल्यवान दृष्टीकोन आणि उपाययोजना लाभतात - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
Posted On:
22 AUG 2025 7:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये सुरू असलेल्या सुमारे दोन आठवड्यांच्या 'संयुक्त राष्ट्र महिला लष्करी अधिकारी अभ्यासक्रम (युएनडब्ल्यूएमओसी-2025)' या उपक्रमात सहभागी झालेल्या भारताच्या महिला अधिकाऱ्यांसह 15 देशांच्या महिला अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. हा अभ्यासक्रम विषयक उपक्रम संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या नेतृत्वाअंतर्गत संयुक्त राष्ट्र शांती केंद्राने आयोजित केला आहे. हा उपक्रम 18 ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीपर्यंत सुरू राहणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बहुआयामी मोहिमांमधील महिलांचा सहभाग अधिक प्रभावी असावा यादृष्टीने महिला लष्करी अधिकाऱ्यांची व्यावसायिक क्षमता वाढवणे हे या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे.

संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमांमध्ये सर्वात मोठे योगदान देणारा देश या नात्याने, भारत या मोहिमांमधील महिलांच्या सहभागाचा आणि त्यांच्या एकात्मिकरणाचा खंदा समर्थक असल्याचे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. या सोबतच संयुक्त राष्ट्र महिला लष्करी अधिकारी अभ्यासक्रमासारख्या उपक्रमांद्वारे महिला अधिकाऱ्यांना शांती प्रस्थापित करण्याच्या आव्हानात्मक परिस्थितीसाठी तयार केले जात असल्याचेही संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले.
भारत आपल्या सशस्त्र दलांमध्ये आणि शांती विषयक तुकड्यांमध्ये महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे अधिक बळकट करत असून, महिला अधिकाऱ्यांना नेतृत्व करण्याची आणि सेवा करण्याची समान संधी मिळेल याचीही सुनिश्चिती करत असल्याचे त्यांनी सांगितले. लिंगभाव समानता वाढवण्यासाठी, सर्वसमावेशक नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि केवळ शांती टिकवून न ठेवता, ती विविधता आणि समानतेमुळे अधिक समृद्ध होईल अशा जगाची निर्मिती करण्यासाठी भारत संयुक्त राष्ट्र तसेच सैनिकी योगदान देणाऱ्या देशांसोबत कायम करत राहील अशी ग्वाहीदेखील राजनाथ सिंह यांनी दिली.

यंदा आयोजित संयुक्त राष्ट्र महिला लष्करी अधिकारी अभ्यासक्रम-2025 या उपक्रमात आर्मेनिया, डीआर काँगो, इजिप्त, आयव्हरी कोस्ट, केनिया, किर्गिज प्रजासत्ताक, लायबेरिया, मलेशिया, मोरोक्को, नेपाळ, सिएरा लिओन, श्रीलंका, टांझानिया, उरुग्वे आणि व्हिएतनाम या देशांसह भारताच्या 12 भारतीय महिला अधिकारी आणि पाच प्रशिक्षणार्थी सहभागी झाल्या आहेत. या सगळ्यांच्या वैविध्यपूर्ण सहभागमुळे हा अभ्यासक्रम प्रशिक्षण आणि देवाणघेवाणीसाठी एक चैतन्यमयी आंतरराष्ट्रीय व्यासपीठच ठरला आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 15 देशांमधील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीला संयुक्त राष्ट्रांचे प्रतिबिंब, एकात्मता आणि सहकार्याच्या चिरंतन भावनेचे प्रतीक, असे वर्णन केले. तुम्ही परिवर्तनाचे मशालवाहक आहात, तुमची निष्ठा केवळ शांती टिकवण्यात महत्त्वाची ठरत नाही, तर ती जागतिक सुरक्षेच्या पूर्ण संरचनेला बळकटी देते. भारत तुमच्या योगदानाचा अभिमान बाळगतो आणि तुमच्या प्रवासात खंबीरपणे सोबत उभा आहे, असे ते अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले.
शांतता राखण्याच्या मोहिमांमध्ये महिला अधिकाऱ्यांचा सहभाग वाढवण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या दृष्टिकोनाबद्दल बोलताना, राजनाथ सिंह म्हणाले की, ही वचनबद्धता मोहिमांना अधिक प्रभावी, समावेशक आणि शाश्वत बनवण्यासाठी महिला शांतिसैनिक आवश्यक आहेत या मान्यतेतून निर्माण होते. महिला अधिकारी शांतता मोहिमेसाठी अमूल्य दृष्टिकोन ठेवतात. त्या अनेकदा स्थानिक समुदायांमध्ये, विशेषतः महिला आणि मुलांमध्ये, ज्यांचे आवाज संघर्षाने विस्कळीत झालेले आहेत त्यांची त्या पुनर्बांधणी करतात, त्यांच्याशी अधिक खोलवर विश्वास निर्माण करतात. त्यांची उपस्थिती लैंगिक हिंसाचार रोखते, मानवतावादी साहाय्य सहज मिळावे आणि स्थानिक पातळीवर लिंग-समानतेला बळकटी मिळावी, यासाठी त्यांचे योगदान प्रभावी ठरते. शिवाय, महिला शांती सैनिक शक्तिशाली आदर्श म्हणून काम करतात, स्थानिक महिला आणि मुलींना शांतता आणि सुरक्षिततेमध्ये सक्रिय सहभागी म्हणून पाहण्यास प्रेरित करतात, असे ते म्हणाले. शांतिसैनिक क्षेत्रातील भारताचा अनुभव महिला अधिकाऱ्यांचे सामर्थ्य आणि क्षमतांवरील विश्वास अधोरेखित करतो, असे सिंह यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमादरम्यान, संरक्षण मंत्र्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या जर्नल 2025 - 'ब्लू हेल्मेट ओडिसी:75 इयर्स ऑफ इंडियन पीसकीपिंग' - हीरक महोत्सवोत्तर जयंती आवृत्तीचे अनावरण केले. या स्मरणिकेत संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमधील भारताची परंपरा, नवकल्पना आणि भविष्यातील दृष्टीकोन नोंदविण्यात आला आहे. शांतिसैनिकांच्या निळ्या हेल्मेटविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आकाशाप्रमाणे, संयुक्त राष्ट्रांचे शांती सैनिक संरक्षण आणि सुरक्षिततेची भावना देतात आणि महासागराप्रमाणे ते सीमा आणि संस्कृती ओलांडून संबंध निर्माण करतात. या कार्यक्रमास लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

युनायटेड नेशन्स विमेन मिलिटरी ऑफिसर्स कोर्स (यूएनडब्लूएमओसी -2025) च्या अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा, निर्वासित व अंतर्गत विस्थापित लोक, नागरी संरक्षण, आचारसंहिता व शिस्त, संघर्षाशी संबंधित लैंगिक हिंसा आणि संघर्षातील बालसुरक्षा यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्र, परराष्ट्र मंत्रालय, आंतरराष्ट्रीय संस्थाचे प्रतिनिधी, भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. तसेच संयुक्त राष्ट्रांसाठी नामनिर्दिष्ट केलेल्या पायदळ बटालियनकडून क्षेत्रीय प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले असून, त्यामुळे व्यावहारिक आकलन अधिक सखोल होण्यास मदत होणार आहे.
शैलेश पाटील/राज दळेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2159936)