माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकारतर्फे माध्यमांच्या प्रसाराचा ग्रामीण भागात विस्तार: वर्ष 2019 पासून 264 कम्युनिटी रेडिओ केंद्रे सुरु करण्यात आली, 6 नव्या दूरदर्शन वाहिन्यांची स्थापना आणि 17 विद्यमान वाहिन्यांचे अद्ययावतीकरण झाले


डीडी मोफत डिश सेवेतील वाहिन्यांची संख्या 104 वरुन 510 पर्यंत वाढवण्यात आली आणि यापैकी तब्बल 320 शैक्षणिक वाहिन्या आहेत; आकाशवाणी तसेच प्रसार भारतीचे ओटीटी ‘वेव्हज’ ने उपलब्धतेत केली वाढ

Posted On: 20 AUG 2025 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2025

वर्ष 2019 पासून आतापर्यंत भारतात 264 कम्युनिटी रेडिओ केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. देशात सध्या कार्यरत असलेल्या कम्युनिटी रेडिओ केंद्रांना आणखी सशक्त करुन त्यांना अद्ययावत स्वरूप देण्यासाठी आर्थिक वर्ष 2020-21 पासून आतापर्यंत 26 केंद्रांना आर्थिक मदत पुरवण्यात आली आहे.

वर्ष 2019 पासून आतापर्यंत 6 नव्या दूरदर्शन वाहिन्या सुरु करण्यात आल्या आहेत आणि आधीपासून कार्यरत असलेल्या 17 दूरदर्शन वाहिन्यांचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने वर्ष 2017 मध्ये कम्युनिटी रेडिओ केंद्रांच्या प्रभावासंदर्भात मूल्यांकन केले होते आणि 23 ऑगस्ट 2028 रोजी “भारतातील कम्युनिटी रेडिओ केंद्रांचा श्रोतृवर्ग, पोहोच आणि परिणामकारकता” या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

या अहवालातील माहितीनुसार, कम्युनिटी रेडिओ केंद्रांनी सामाजिक सहभागाची जोपासन करण्यात, स्थानिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यात आणि ग्रामीण तसेच दुर्गम भागात माहितीचे प्रसारण करण्यात प्रमुख भूमिका निभावली आहे. या अहवालासाठीची लिंक: https:// https://mib.gov.in/ministry/our-wings/broadcating-wing

दूरदर्शन केंद्रांसाठी, फेब्रुवारी 2019 मध्ये छत्तीसगडमधील रायगढ जिल्ह्यातील डाव्या कट्टरपंथीयांमुळे प्रभावित भागात जाहिरात अभियानावर आधारित प्रभाव मूल्यांकन अभ्यास राबवण्यात आला. आकाशवाणी रायगढ केंद्रातून प्रसारित जाहिराती/स्पॉट्स बाबत 73.5% श्रोत्यांमध्ये जागरुकता आढळून आली. सुमारे 67% श्रोत्यांपर्यंत आकाशवाणी रायगढ केंद्रातून प्रसारित जाहिराती/स्पॉट्स साप्ताहिक पातळीवर पोहोचत होते.

बहुविध मंचांच्या माध्यमातून सरकार ग्रामीण भागात माध्यमांची पोहोच विस्तारण्यासाठी आणि त्यात वैविध्य आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे:

  • डीडी मोफत डिश (फ्री टू एअर डायरेक्ट टू होम-डीटीएच)सेवा लक्षणीयरित्या वाढली- वर्ष 2019 मध्ये या सेवेच्या 104 वाहिन्या होत्या त्यात वाढ होऊन सध्या 510 वाहिन्या कार्यरत आहेत.
  • यामध्ये 92 खासगी वाहिन्या, 50 दूरदर्शन वाहिन्या आणि 320 शैक्षणिक वाहिन्यांचा समावेश आहे.
  • एफएम गोल्ड, रेनबो तसेच विविध भारतीसह आकाशवाणीच्या एकूण 48 वाहिन्या डीटीएच मंचावर उपलब्ध आहेत.
  • वर्ष 2024 मध्ये प्रसार भारतीने “वेव्हज” हा ओटीटीमंच सुरु केला. वेव्हज हा बहुशैली डिजिटल प्रसारण एकत्रीकरण मंच असून त्यात दूरदर्शन तसेच आकाशवाणीच्या जाळ्यातील वाहिन्या यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.

माहिती, शिक्षण, संस्कृती आणि बातम्या सर्वांना सुलभपणे उपलब्ध होण्यात हे मंच अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. शैक्षणिक कार्यक्रम प्रसारण आणि खासगी वाहिन्या यांच्या माध्यमातून हे मंच ग्रामीण तसेच दुर्गम भागात विशेष परिणामकारक ठरत आहेत.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

 
‍निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2158688)