नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘वॉटरवेज टू वंडर : अनलॉकिंग क्रूझ टुरिझम’ परिषदेचे मुंबईत 18 ऑगस्ट रोजी आयोजन

Posted On: 16 AUG 2025 3:23PM by PIB Mumbai

 

मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (आय डब्लू ए आय) आणि भारतीय बंदर संघ  (आय पी ए) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वॉटरवेज टू वंडर : अनलॉकिंग क्रूझ टुरिझम’  या परिषदचे सोमवार, 18 ऑगस्ट रोजी मुंबईत आयोजन करण्यात येणार आहे. भारतातील क्रूझ पर्यटनाच्या क्षमतेचा शोध घेणे, धोरणात्मक उपक्रम, सर्वोत्तम पद्धती आणि वाढीसाठीच्या धोरणांवर चर्चा करणे हा या परिषदेचा उद्देश आहे.

या परिषदेत भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रतिनिधी तसेच इतर भागधारकांची   भाषणे, सादरीकरणे आणि समूह चर्चा आयोजित करण्यात येतील. क्रूझ पर्यटन विकासासाठी धोरणात्मक दृष्टीकोन व धोरणात्मक भुमिका, वाढीसाठी धोरणात्मक व नियामक साधने, सांस्कृतिक व किनारी पर्यटन प्रवास, क्रूझ टर्मिनल्सची सर्वोत्तम पद्धती, स्मार्ट टर्मिनल संचालन आणि हरित बंदर धोरणे या महत्त्वाच्या  विषयावर या परिषदेत चर्चा होणार आहे.

या परिषदेत बंदरे, नौकानयन व जलमार्ग मंत्रालयाने स्थापन केलेल्या एन ए व्ही आय सी  या विशेष कक्ष   सेल 4 च्या सादरीकरणातून पर्यटन आणि फेरीबोटी  यांची यशस्वी कामगिरी तसेच सुधारणांचा आढावा घेण्यात येणार आहे. हा कक्ष समुद्र, नदी व दीपगृह पर्यटन तसेच फेरीबोटी यावर लक्ष केंद्रित करतो. कार्यक्षम व शाश्वत महासागर व नदी क्रूझ सर्किट्स विकसित करून भारताला जागतिक क्रूझ पर्यटन केंद्र बनविणे हे या कक्षाचे ध्येय आहे.

भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष तसेच एन ए व्ही आय सी सेल 4 चे नोडल अधिकारी तथा भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी विजय कुमार यांचे या परिषदेत बीज भाषण होणार आहे. 

अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण ही भारत सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत अग्रगण्य संस्था असून देशातील जलवाहतुकीच्या विकासावर लक्ष केंद्रित करते. नदी क्रूझ पर्यटनाला प्रोत्साहन देणे, शाश्वत पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित संचालन आणि नियामक सुधारणा यावर भर देऊन कार्यक्षम जलवाहतूक प्रणाली विकसित करण्यात या प्राधिकरणाने महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे.

दुपारपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात उद्योगतज्ज्ञांची समूह चर्चा देखील आयोजित करण्यात आली आहे.

इंडिया मेरीटाइम वीक 2025  या विषयावरील सादरीकरणाने या परिषदेचा समारोप होईल. ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या आयएमडब्ल्यू  2025 या कार्यक्रमात सागरी क्षेत्रातील प्रगती, संधी आणि सहकार्य यांचे सादरीकरण होणार असून, देशांतर्गत वृद्धी  व आंतरराष्ट्रीय सहकार्याला यातून चालना मिळणार आहे.

***

निलिमा चितळे/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2157188)