पंचायती राज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंचायत प्रतिनिधींचा 79व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभाग; ग्रामीण भारताच्या भावनेचे दर्शन


पंचायत प्रतिनिधींच्या सत्कार समारंभात ‘सभासार’ च्या प्रारंभामुळे पंचायतींचा कृत्रिम बुद्धिमत्ता युगात प्रवेश

Posted On: 15 AUG 2025 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2025

 

यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या ‘नया भारत’ या संकल्पनेनुसार, लोकशाहीच्या आजच्या महत्त्वाच्या सोहळ्यात देशभरातून सुमारे 210 सरपंच, पंचायत प्रमुख आणि ग्राम प्रधान यांसारख्या निवडक पंचायत प्रतिनिधींनी विशेष अतिथी म्हणून लाल किल्ल्यावरील 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभाग घेतला. त्यांनी परिधान केलेल्या विविध पारंपरिक पोशाखांमुळे ग्रामीण भारताची संस्कृती आणि भावनेचे दर्शन घडले, यासोबतच प्रशासनाच्या तिसऱ्या स्तरावर असलेली ताकदही दिसून आली. राष्ट्रनिर्मितीमध्ये या सगळ्यांचे योगदान मोठे असून, लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी आपल्या भाषणात त्यांच्या या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेखही केला.

2025 च्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या, आत्मनिर्भर पंचायत, विकसित भारत की पहचान या विशेष कार्यक्रमात, या विशेष अतिथींचा दिल्ली येथे सत्कारही करण्यात आला. पंचायती राज तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय (FAHD) मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह, तसेच पंचायती राज तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल या समारंभाला उपस्थित होते. यासोबतच पंचायत राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह देशभरातील 425 हून अधिक प्रतिनिधी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या समारंभात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाधारीत ‘सभासार’ या एका डिजीटल प्रणालीचे अनावरणही करण्यात आले. या प्रणालीच्या माध्यमातून ग्रामसभा आणि इतर पंचायत बैठकांच्या ‘ऑडिओ- व्हिडिओ रेकॉर्डिंग’ मधून स्वयंचलितपणे बैठकीचे इतिवृत्त (Minutes of Meeting-MoM) तयार केले जाते. यासोबतच ग्रामोदय संकल्प पत्रिका या ई-प्रकाशानाची 16 वी आवृत्ती देखील या निमित्ताने प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीत पंचायत सक्षमीकरण, स्थानिक प्रशासन आणि नवनिर्मिती यासंबंधीच्या माहिती, यशोगाथा आणि प्रेरणादायक अनुभवांचा समावेश आहे. पंचायती राज संस्थांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण अशी या ग्रामोदय संकल्प पत्रिकेच्या 16 व्या आवृत्तीची संकल्पना आहे.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2156980)