सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या विज्ञान आणि संस्कृतीसाठी एकात्मिक व्यासपीठ म्हणून इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने केला सामंजस्य करार

Posted On: 13 AUG 2025 7:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 ऑगस्‍ट 2025

 

सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र(आयजीएनसीए) या स्वायत्त संस्थेने, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या लखनऊ येथील बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसायन्सेस या स्वायत्त संस्थेसोबत, नवी दिल्लीतील आयजीएनसीए येथे एक सामंजस्य करार केला.

हा सामंजस्य करार म्हणजे भारतातील विज्ञान आणि संस्कृती यांची सांगड घालण्यासाठी एकात्मिक व्यासपीठ प्रदान करण्याच्या दिशेने सुरु केलेला पहिला उपक्रम आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर देशाच्या वैज्ञानिक आणि सांस्कृतिक कामगिरीचे प्रदर्शन करणे हा यामागील उद्देश आहे.

सांस्कृतिक माहितीशास्त्रापासून ते भारतीय साहित्यापर्यंतच्या क्षेत्रांचा विस्तार करणे आणि समकालीन शिक्षणात पारंपारिक ज्ञान अंतर्भूत करण्याच्या उद्देशाने या प्रसंगी, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातर्फे आयोजित अकरा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी एक अभिमुखता कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. कुशल व्यावसायिकांना घडवणे, त्यांना व्यावहारिक प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कार्याच्या ठिकाणाचा अनुभव देणे, अभ्यासक, तज्ञ आणि चालत आलेल्या परंपरा यांचा मेळ घालण्याच्या उद्देशाने हे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.

या सामंजस्य करारावर डॉ. सच्चिदानंद जोशी आणि प्रा. महेश जी. ठक्कर यांनी स्वाक्षऱ्या  केल्या. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या संवर्धन विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. अचल पंड्या आणि बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसायन्सेसच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शिल्पा पांडे हे या सहकार्यासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आणि बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसायन्सेस यांच्यातील सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आंतरशाखीय संशोधन, संयुक्त कार्यक्रम आणि सामायिक कौशल्य या माध्यमातून विज्ञान आणि संस्कृती यांची सांगड घालणे असा आहे.  डिजिटायझेशन, शिक्षण आणि सागरी इतिहासातील हवामान बदलावरील प्रकल्प मौसमला पाठिंबा देण्यावर हा करार लक्ष केंद्रित करतो. या सहयोगामध्ये संशोधन, दस्तावेजीकरण, संवर्धन, संग्रहालय विकास, क्षेत्रीय कार्य, दृकश्राव्य नोंदी, संयुक्त प्रकाशने आणि संवर्धन आणि वारसा व्यवस्थापनातील प्रशिक्षण तसेच सार्वजनिक संपर्क यांचा समावेश असेल.  नाविन्यपूर्ण कार्यक्रमांद्वारे भारताच्या वारशाचे जतन करणे, अर्थाची उकल आणि सादरीकरण असे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे  राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण होईल.

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आणि  बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसायन्सेस यांच्यातील सामंजस्य करार हा विज्ञान आणि संस्कृतीला एकत्र आणण्यासाठी केलेला एक उल्लेखनीय प्रयत्न असल्याचे प्रा. महेश जी. ठक्कर यांनी सांगितले.  या उपक्रमाद्वारे, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याबद्दल जनजागृती वाढेल आणि तरुण पिढीला प्रेरणा मिळेल.

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र हे एका अशा जहाजासारखे आहे  ज्याचा फक्त एक तृतीयांश भाग पाण्यावरून दिसतो तर दोन तृतीयांश भाग पाण्याखाली असतो, जो अजूनही पूर्णपणे आकलन न झालेल्या  अथांग सांस्कृतिक भांडाराचे प्रतीक आहे, असे डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी यावेळी सांगितले. 

या सामंजस्य करारामुळे भारतीय संस्कृती, साहित्य आणि विज्ञानावर पुन्हा लक्ष केंद्रित केले जाईल, विज्ञान, संस्कृती आणि समाज यांच्यातील आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या संबंधांवर प्रकाश टाकला जाईल, असे डॉ. शिल्पा पांडे म्हणाल्या. या सहकार्यातून संपूर्ण भारतात  धोक्यात आलेल्या सांस्कृतिक परंपरांच्या संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हिमालयापासून कन्याकुमारीच्या किनाऱ्यापर्यंत माहितीपट, लेख आणि जागरूकता मोहिमा तयार केल्या जातील.

 

* * *

निलिमा चितळे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2156162)