संरक्षण मंत्रालय
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये संरक्षण उत्पादन 1.51 लाख कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले
हा टप्पा भारताच्या मजबूत संरक्षण औद्योगिक पायाचे स्पष्ट सूचक: संरक्षण मंत्री
Posted On:
09 AUG 2025 3:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2025
2024-25 या आर्थिक वर्षात वार्षिक संरक्षण उत्पादन 1,50,590 कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. हा टप्पा मागील आर्थिक वर्षाच्या 1.27 लाख कोटी रुपयांच्या उत्पादनापेक्षा 18% अधिक वाढ दर्शवितो व आर्थिक वर्ष 2019-20 पासून झालेली 90% वाढ दर्शवितो. त्यावेळी हा आकडा 79,071 कोटी रुपये होता.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हे महत्त्वाचे यश संपादन केल्याबद्दल संरक्षण उत्पादन विभाग आणि सर्व भागधारकांनी म्हणजेच डीपीएसयू, सार्वजनिक क्षेत्रातील उत्पादक आणि खाजगी उद्योगांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक केले आहे. भारताच्या संरक्षण औद्योगिक पाया मजबूत होत असल्याचे हे स्पष्ट सूचक आहे, असे त्यांनी सांगितले.
संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (DPSUs) व इतर सार्वजनिक उपक्रमांचा एकूण उत्पादनात अंदाजे 77% वाटा होता, तर खाजगी क्षेत्राचा वाटा 23% होता. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये खाजगी क्षेत्राचा वाटा 21% वरून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 23% पर्यंत वाढला. यावरून देशाच्या संरक्षण परिसंस्थेत या क्षेत्राची वाढती भूमिका दिसून येते.
गेल्या दशकात दूरगामी सुधारणा, व्यवसाय सुलभतेत वाढ व स्वदेशीकरणावर धोरणात्मक लक्ष केंद्रित केल्यामुळे उद्योगातील सार्वजनिक तसेच खाजगी या दोन्ही विभागांनी वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण वाढ दर्शविली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये डीपीएसयू आणि खाजगी क्षेत्राचे एकूण उत्पादन अनुक्रमे 16% आणि 28% वाढले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णतेकडे सरकारच्या वाढत्या प्रयत्नांना हे विक्रमी यश अधोरेखित करते. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यावर आणि भारताच्या गरजा पूर्ण करणारे संरक्षण औद्योगिक संकुल निर्माण करण्यावर भर देण्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये संरक्षण निर्यात 23,622 कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. ही वाढ आर्थिक वर्ष 2023-24 च्या संरक्षण निर्यातीच्या आकडेवारीपेक्षा 2539 कोटी रुपयांनी किंवा 12.04% जास्त आहे, जी आधी 21,083 कोटी रुपये इतकी होती, हे लक्षात घेणे महत्वाचे ठरते.
शाश्वत धोरणात्मक पाठबळ, वाढता खाजगी सहभाग आणि विस्तारित निर्यात क्षमता यामुळे, भारताचे संरक्षण उत्पादन क्षेत्र येत्या काळात सतत गतीमान होण्यास सज्ज आहे.
* * *
शिल्पा नीलकंठ/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2154629)