संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लष्करप्रमुख,जनरल उपेंद्र द्विवेदी,यांनी संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या दृष्टीने आयआयटी मद्रास येथे ‘अग्निशोध’ संशोधन प्रकोष्ठाचे उद्घाटन केले

Posted On: 04 AUG 2025 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2025

संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलत, भारतीय लष्कराने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रास यांच्या सहकार्याने ‘अग्निशोध’ या नावाने भारतीय लष्कर संशोधन केंद्र (आयएआरसी) स्थापन केले आहे. या  संशोधन केंद्राचे आज लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या दोन दिवसीय चेन्नई दौऱ्याच्या निमित्ताने औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आले.

‘अग्निशोध’ ही लष्करप्रमुखांनी मांडलेल्या ‘रूपांतरणाच्या पाच स्तंभां’पैकी ‘आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञान समावेश’ या महत्त्वपूर्ण स्तंभाच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे. हे केंद्र शैक्षणिक संशोधन आणि लष्करी क्षेत्रातील प्रत्यक्ष गरजांमध्ये सुसंगतता साधून आधुनिक युद्धसज्जतेकडे भारतीय लष्कराच्या प्रवासाला गती देईल.

"ऑपरेशन सिंदूर – दहशतवादाविरोधातील नव्या लढाईमधले  पर्व" या विषयावर आयआयटी मद्रास येथे आयोजित कार्यक्रमात जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे एक महत्त्वपूर्ण आणि गुप्तचर-आधारित प्रतिसाद असल्याचे नमूद केले.युद्धाचे बदलते स्वरूप अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की,“भारतीय सशस्त्र दल पाचव्या पिढीच्या युद्धासाठी सज्ज आहे, जिथे संपर्कविरहित लढाई, धोरणात्मक वेग आणि मानसिक प्रभुत्व या गोष्टी केंद्रस्थानी असतील.”

"स्वदेशीकरण से सशक्तिकरण" या धोरणाअंतर्गत भारतीय लष्कराच्या आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेवर भर देत, त्यांनी विविध राष्ट्रीय तंत्रज्ञान मिशनखाली सुरू असलेल्या सहकार्यांची माहिती दिली.

‘अग्निशोध’ केंद्र लष्करी जवानांना अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, सायबर सुरक्षा, क्वांटम संगणन, वायरलेस संवाद, आणि मानवविरहित हवाई प्रणाली (यूएएस) यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये कौशल्यवृद्धी करून,लष्करातील तंत्रज्ञानसज्ज मनुष्यबळ निर्माण करण्यास महत्त्वपूर्ण योगदान देईल.

आपल्या चेन्नई भेटीदरम्यान जनरल द्विवेदी यांनी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (ओएटी) ला देखील भेट दिली. त्यांनी या वेळी प्रशिक्षण पायाभूत सुविधा, आधुनिक प्रशिक्षण तंत्र आणि भविष्यकालीन लष्करी नेत्यांना सध्याच्या आव्हानांसाठी तयार करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली.

ते म्हणाले की, भविष्यातील संघर्ष हे पारंपरिक शक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल साधून लढले जातील, "जेथे पारंपरिक सैनिकशक्तीला आता यंत्रमानव तंत्रज्ञानासोबत समांतर कार्य करावे लागेल."

त्यांनी भारतीय लष्कराच्या "परिवर्तनाचे  दशक" या संकल्पनेतील विविध सुधारणा आणि पुढाकारांबाबत कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली.


निलीमा चितळे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2152370)
Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi