रेल्वे मंत्रालय
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भावनगर येथे व्यापारी, उद्योजक आणि प्रतिष्ठित नागरिकांसोबत साधला 'विकसित भारत संवाद'
वंदे भारत ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आणि जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली रेल्वेगाडी आहे: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
Posted On:
03 AUG 2025 8:40PM by PIB Mumbai
गुजरातमध्ये भावनगर येथील इस्कॉन फर्न येथे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यापारी, उद्योजक आणि प्रतिष्ठित नागरिकांसोबत 'विकसित भारत संवाद' या कार्यक्रमात संवाद साधला. या कार्यक्रमात कामगार आणि रोजगार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन बंभानिया यांचीही विशेष उपस्थिती होती.

कोविड-19 महामारीनंतर जागतिक अर्थव्यवस्थांच्या विकासाचा दर घटला असताना, भारताने मात्र आपल्या विकासाच्या दरात सातत्याने वाढ पाहिली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी इतर देशांच्या तुलनेत भारताच्या मजबूत आणि सतत वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली, भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आला आहे, आणि 31 मार्च 2025 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचे मूल्य 331 लाख कोटी रुपये झाले आहे.

भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा आणि क्षमता अधोरेखित करताना मंत्र्यांनी स्वदेशी बनावटीच्या उत्पादनाबद्दलही माहिती दिली. वंदे भारत ट्रेनच्या वैशिष्ट्यांवर त्यांनी भर देत त्यांनी सांगितले, की ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आणि जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली गाडी आहे. विकसित भारताची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
मंत्री पुढे म्हणाले की, एक काळ असा होता, जेव्हा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात भारताची कोणतीही ओळख नव्हती. मात्र, गेल्या दशकभरात 150 अब्ज डॉलर्सच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासह, भारत एक मोठे केंद्र म्हणून उदयाला आला आहे . एवढेच नाही, तर आता सेमीकंडक्टर क्षेत्रातही भारत जागतिक स्तरावर आघाडीवर आहे.

'विकसित भारत संवाद' कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, स्थानिक उद्योजक आणि नागरिकांनी मंत्र्यांसोबत भावनगरच्या समस्या आणि पायाभूत सुविधांच्या गरजांबद्दल चर्चा केली. एफटीआर संबंधी प्रश्नाला उत्तर देताना वैष्णव यांनी भविष्यात एफटीआरशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही, असे आश्वासन दिले.
वैष्णव यांनी भावनगरमध्ये कंटेनर पोर्टविकसित करण्याची घोषणाही केली, ज्यामुळे या प्रदेशाच्या विकासासाठी सरकारची कटिबद्धता दिसून येते.

कामगार आणि रोजगार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी नमूद केले की, 'विकसित भारत संवाद' या कार्यक्रमाचे आयोजन भावनगरच्या विकासासाठी सरकारने उचललेली विविध पावले तसेच विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने भारताच्या प्रवासाच्या संदर्भात भविष्यातील धोरणे आणि योजनांची माहिती नागरिकांना देण्यासाठी करण्यात आले होते.
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन बंभानिया यांनी रेल्वे मंत्र्यांचे, भावनगरच्या लोकांच्या वतीने, या भागातील सुधारित रेल्वे सुविधांसाठीच्या विविध मागण्या स्वीकारल्याबद्दल आणि त्या पूर्ण केल्याबद्दल आभार मानले.
***
निलिमा चितळे/शैलेश पाटील/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2152005)