कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी वितरित केला जाणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी इथे होणार वितरण

Posted On: 30 JUL 2025 4:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2025 

 

प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा पुढचा हप्ता 2 ऑगस्ट रोजी वितरित केला जाणार आहे. केंद्रिय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत  योजनेचा लाभ सुनिश्चित करण्या संदर्भात  बैठक घेण्यात आली. पीएम किसान निधी वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वाराणसी इथे होणार आहे. 

राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि गांव पातळीवरील शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी करुन घेण्याच्या सूचना केंद्रिय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आणि देशव्यापी मोहीम म्हणून हा कार्यक्रम आयोजित करावा असे आवाहन केले.  

किसान विज्ञान  केंद्रांना (केव्हीके) निर्देश देताना चौहान म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली  शेतकऱ्यांना 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. प्रत्येक हप्ता दर चार महिन्यांनी दिला जातो. या प्रक्रियेत केव्हीके महत्त्वाची भूमिका बजावतात. कार्यक्रमाची आधीच तयारी करा असे आवाहन करुन, थेट लाभ हस्तांतरणाची हमी देणारा तसेच जनजागृती मोहीम असलेला हा कार्यक्रम एखाद्या उत्सवासारखा व अभियानासारखाही साजरा केला जावा असे चौहान म्हणाले.   

2 ऑगस्टच्या या कार्यक्रमात सक्रियतेने सहभागी होण्याचे आवाहन केंद्रिय मंत्र्यांनी शेतकऱ्यांना केले. ही योजनेचा लाभ घेण्याची आणि शेतकरी विकास योजनांची माहिती जाणून घेण्याचीही संधी आहे असे त्यांनी सांगितले.   

कार्यक्रमाची माहिती व्यापक स्तरावर प्रसारित करण्यासाठी कृषी सखी, ड्रोन दीदी, बँक सखी, पशु सखी, विमा सखी आणि ग्राम पंचायतींचे सरपंच या स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या लोकांची मदत घ्या अशी सूचना चौहान यांनी अधिकाऱ्यांना केली. आताच्या दिवसांमधे शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी खरीप पिकांबाबतची चर्चा प्रभावी ठरेल असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सर्वांच्या  सहभागानिशी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने राबविला जाईल अशी ग्वाही चौहान यांनी दिली.

2019 मध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून 19 हप्त्यांच्या माध्यमातून 3.69 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. 20 व्या हप्त्यांतर्गत 20,500 कोटी रुपये 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. 

 

* * *

निलिमा चितळे/सुरेखा जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2150176)