संरक्षण मंत्रालय
‘डीआरडीओ’ कडून प्रलय क्षेपणास्त्र उड्डाणाच्या सलग दोन चाचण्या यशस्वी
Posted On:
29 JUL 2025 5:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जुलै 2025
डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने काल 28 आणि आज 29 जुलै, 2025 रोजी ओडिशा किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून प्रलय क्षेपणास्त्र उड्डाणाच्या सलग दोन यशस्वी चाचण्या घेतल्या. या क्षेपणास्त्र प्रणालीचा कमाल आणि किमान पल्ला क्षमता निश्चित करण्यासाठी ‘वापरकर्ता मूल्यांकन’ चाचण्यांचा (यूजर इव्हॅल्यूएशन) भाग म्हणून या उड्डाण चाचण्या घेण्यात आल्या. क्षेपणास्त्रांनी अचूकपणे इच्छित मार्गाचे अनुसरण केले आणि चाचणीची सर्व उद्दिष्टे पूर्ण करून अगदी सूक्ष्मातील सूक्ष्म अचूकतेसह लक्ष्य बिंदू गाठला. प्रलय उपग्रहाच्या उपप्रणालीने अपेक्षेनुसार सर्व कामगिरी पार पाडली. यासंबंधी पडताळणी एकात्मिक चाचणी श्रेणी (आयटीआर) द्वारे तैनात केलेल्या विविध ‘ट्रॅकिंग सेन्सर्स’ द्वारे ग्रहण केलेली चाचणीचा डेटा म्हणजे माहिती वापर करून करण्यात आली. ज्यामध्ये नियुक्त केलेल्या प्रभाव बिंदूजवळ असलेल्या जहाजावर तैनात केलेल्या उपकरणांचा समावेश आहे.

प्रलय हे स्वदेशी पद्धतीने विकसित केलेले ‘सॉलिड प्रोपेलेंट क्वासी-बॅलिस्टिक’ क्षेपणास्त्र आहे, जे उच्च अचूकता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक मार्गदर्शन आणि दिशादर्शन वापरते. हे क्षेपणास्त्र विविध लक्ष्यांचा अचूक भेद करण्यासाठी अनेक प्रकारची ‘वॉरहेड’ म्हणजे युध्दासाठी वापरावयाची साधने वाहून नेण्यास सक्षम आहे. ही प्रणाली आरसीआय म्हणजेच रिसर्च सेंटर इमारतने इतर डीआरडीओ प्रयोगशाळांच्या सहकार्याने विकसित केली आहे यामध्ये संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, प्रगत प्रणाली प्रयोगशाळा, शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास स्थापना, उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा, संरक्षण धातुकर्म संशोधन प्रयोगशाळा, टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळा, संशोधन आणि विकास स्थापना (अभियंते) आणि आयटीआर इत्यादींचा सहभाग आहे. तसेच या क्षेपणास्त्राच्या निर्मितीमध्ये - भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इतर अनेक उद्योग आणि एमएसएमईंचा सहभाग आहे.
‘प्रलय’ च्या उड्डाण चाचण्यांचे डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्करातील वापरकर्त्यांचे प्रतिनिधी तसेच उद्योग प्रतिनिधी यांनी निरीक्षण केले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी डीआरडीओ, सशस्त्र दल आणि संबंधित उद्योगांचे कौतुक केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे क्षेपणास्त्र शत्रूच्या धोक्यांविरुद्ध सशस्त्र दलांना अधिक तांत्रिकदृष्ट्या बळ देईल, असे ते म्हणाले.
संरक्षण संशोधन आणि विकास सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी ‘प्रलय’ निर्माण करणा-या टीमचे अभिनंदन केले आणि सांगितले की, या टप्प्यातील पहिल्या उड्डाणाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्यामुळे नजीकच्या भविष्यात सशस्त्र दलांमध्ये या प्रणालीचा समावेश होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
* * *
सोनाली काकडे/ सुवर्णा बेडेकर/ दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2149814)