युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
कारगिल विजय दिवसाच्या 26 व्या स्मरण दिनानिमित्त केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि संजय सेठ यांच्या उपस्थितीत ‘कारगिल विजय दिवस पदयात्रेचे आयोजन
Posted On:
26 JUL 2025 3:41PM by PIB Mumbai
1999 सालच्या कारगिल युद्धातील भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या 26 व्या स्मरण दिनानिमित्त, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत ‘मेरा युवा भारत’ या उपक्रमांतर्गत आज कारगिलमध्ये द्रास येथे 'कारगिल विजय दिवस पदयात्रा काढण्यात आली. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत 3 हजारपेक्षा जास्त युवा स्वयंसेवक, माजी सैनिक, सैन्यदलाचे कार्यरत जवान, हुतात्मा जवानांचे कुटुंबीय आणि नागरिक सहभागी झाले.

एकतेचे दर्शन घडवणारी ही पदयात्रा हिमाबस पब्लिक हायस्कूलच्या मैदानापासून ते भीमबेट येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयापर्यंतच्या सुमारे दीड किलोमीटर मार्गावरून काढण्यात आली. या पदयात्रेदरम्यान जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखच्या समृद्ध पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले, ज्यामुळे या प्रदेशाची एकता आणि सांस्कृतिक समृद्धता दिसून आली.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया म्हणाले, कारगिल हे केवळ एक ऐतिहासिक स्थळ नसून, ते एक भारताच्या जाज्वल्य आत्मबलाची आणि अदम्य राष्ट्रभावनेची सजीव साक्ष आहे. आपल्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी भारत दृढनिश्चयी, एकवटलेला आणि अढळ राहतो, हे कारगिलची भूमी अधोरेखित करते. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी तरुणांच्या उत्साहाचे कौतुक करत सैन्य दलाच्या बलिदानाचे स्मरण करून दिले. विद्यार्थ्यांनी कारगिलच्या वीरांकडून प्रेरणा, शिस्त आणि देशभक्तीची भावना आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी केले.

पदयात्रेनंतर, मेरा भारतच्या शंभर युवा स्वयंसेवकांसह दोन्ही मंत्रीमहोदय कारगिल युद्धस्मारकाच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दीर्घ पल्ल्याची दुचाकी स्वारी पूर्ण करणाऱ्या शक्ती उद्घोष फाउंडेशनच्या 26 महिला दुचाकीपटूंचा यावेळी मांडवीया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात राष्ट्रभक्ती आणि पर्यावरण संवर्धन यांच्यातील नाते अधोरेखित करण्यासाठी ‘एक पेड़ माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत प्रतीकात्मक वृक्षारोपणही करण्यात आले. पदयात्रेपूर्वी, मेरा भारत द्रास यांच्या वतीने परिसरातील गावांमध्ये निबंध लेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आणि ‘युवा संवाद’ अशा विविध उपक्रमांद्वारे तरुणांना आणि परिसरातील नागरिकांना एकत्रित करण्यात आले.


***
माधुरी पांगे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2148906)